कला म्हणजे काय? 57
मर्मरध्वनी चालाला आहे. हा ध्वनी मृदु, ताजा व नवीन आहे. चिंवचिंव, गंगूं चालले आहे. हा आवाज जणू त्या तृणाचा श्वासोच्छ्वास आहे. हे कोमळ हळुवार रडणे तृणाच्या श्वासोच्छ्वासासमान आहे. वाहणा-या पाण्याखालचे खडे, कसे असतात ते? कसे नाचत असतात!
हा जीव झोपेत असल्यासारखा कण्हत आहे, गा-हाणे करीत आहे, विव्हळत आहे. हे विव्हळणे, ही वेदना, हा शोक आपणांस का बरे आहे? माझ्यात व तुझ्यात? हळुवार व कोमल गीत उच्चारले जात आहे, स्तोत्र म्हटले जात आहे. दवबिंदू हलकेच पडत आहेत.
झाडांकडे जाणारे मृदुस्वर, कोमल रडणे-हे सारे काय आहे? कोणता आहे यात अर्थ? काही कळत नाही, वळत नाही. सारे कोडे. याच संग्रहांतील आणखी एक गान पहा.
''या भूतलावर सर्वत्र अनंत मंदता पसरली आहे. अनिश्चित व लहरी हिमकण वाळूप्रमाणे चमचम करीत आहेत.
तांबडट आकाशांत कोणत्याच प्रकारची झकाकी व झळाळी नाही. तो चंद्र क्षणांत जिवंत आहे असे वाटते तर दुस-या क्षणीच मेला असे वाटत आहे.
ते भुरेभुरे अंधुक असे ओकवृक्ष शेजारच्या जंगलात हालत आहेत. जणू अभ्रांप्रमाणे तेही कोठे चालले आहेत. मधूनमधून धुके पडत आहे.
दुष्काळात जणू सापडलेल्या कावळयांनो! भुकेने वखवखलेल्या व हडकलेल्या लांडग्यांनो! जेव्हा प्रखर व तीव्र असे वारे वाहतात, तेव्हा तुमचे काय बरे होत असेल?
सर्वत्र एकप्रकारची अनंत मंदता आहे. अनिश्चित हिमकण वाळूप्रमाणे चमकत आहेत.''
लालसर आकाशात चंद्र मेल्यासारखा व जिवंत कसा काय दिसतो? बर्फ हे वाळूप्रमाणे कसे चमकत होते? हे शक्य आहे? हे सारे गाणे निरर्थक आहे, एवढेच नव्हे, तर काहीतरी भावना देण्याच्या ढोंगाखाली, काहीतरी शब्दचित्र वठवून देण्याच्या मिषाने हे गाणे, अयोग्य उपमा व अयोग्य शब्द यांच्या मालिका देऊ पहात आहे!
या कृत्रिम व दुर्बोध कवितांखेरीज, दुस-या काही समजतील अशा आहेत; परंतु त्या कवितांतील भाव फार हीन स्वरूपाचा आहे. त्या कवितांचे रंगरूप एकंदरीत फार वाईट आहे. La Sagesse या नावाखाली असलेल्या सर्व कविता अशाच आहेत. देशभक्ती व रोमन कॅथलिक धर्मासंबंधी काही भावना या कवितांत प्रकट केलेल्या आहेत. परंतु त्यातही जोर, उत्कटता नाही. भावनांची खळबळ नाही, तेज नाही, जिव्हाळा नाही. उदाहरणार्थ ही एक कविता पहा.
''माझी माता मेरी, हिच्याशिवाय दुस-या कुणाचेही चिंतन मी करू इच्छित नाही. मेरी ज्ञानमूर्ति आहे, क्षमामूर्ति आहे. आमच्या फ्रान्सची तीच खरी माता. आमच्या राष्ट्राचा मान अखंड राहील अशी तिच्यापासून आम्ही अपेक्षा करतो.''
अशाच प्रकारच्या कविता या संग्रहात आहेत.