कला म्हणजे काय? 65
कलेचे हेच तर मुख्य काम आहे. जी गोष्ट मुद्दे वगैरे मांडूनही समजवून देता येणार नाही, जे बुध्दिवादाने, तर्काने, वादविवादाने पटवून देता येणार नाही, ते कला हृदयाच्या द्वारा पटकन् समजावून देते; जे बुध्दीच्या दारांतून शिरत नाही, हृदयाच्या द्वारा कला आत शिरकावते; जो प्रकाश बुध्दीला ग्रहण करवत नाही, त्या प्रकाशाने कला सारे हृदय भरून टाकिते. पुष्कळ वेळा उत्कृष्ट कलाकृती पाहणारा मनुष्य म्हणतो. ''माझ्या मनात अगदी हेच होते. ह्या भावना मला माहीत होत्या; मला त्या प्रकट करता येत नव्हत्या, दुस-याला समजावून देता येत नव्हत्या.''
जी कला थोर आहे, त्या कलेचे रूप सदैव असेच असते. एकदम हृदयाला जाऊन भिडणे हाच तिचा विशेष असतो. इलियड व ओडेसी, आयझॅक, जोसेफ व जॅकोव यांच्या गोष्टी; हिब्य्रू धर्मग्रंथ; बायबलांतील कथा; भगवान बुध्दाचे चरित्र; वेदांतील सूक्ते-ह्या सर्वांतून थोर व उदात्त भावना मिळतात व त्या आजही सर्वांना समजतात. आपण शिकलेले असू वा नसू. त्या भावनांचा अनुभव आजही आपणांस येतो. प्राचीन लोकांना यांतील भावना जितक्या समजत, तितक्याच आज आपणांसही समजतात. ते प्राचीन लोक आजच्या मजुरांपेक्षाही कमी शिकलेले असतील, परंतु त्यांनाही त्या भावना समजत असत व आपणांसही आज त्या चटका लावतात. पुष्कळ वेळा लोक दुर्बोधत्वाबद्दल बोलतात. परंतु धर्म्य अनुभूतीतून वाहणा-या भावना देणारी ती खरी कला असे जर असेल तर मानवाचा ईश्वराशी जो संबंध त्या संबंधावर उभी असलेली ती भावना कशी समजणार नाही? अशी भावना देणारी कला सर्वांना समजलीच पाहिजे, आणि समजतेही; कारण प्रत्येकाचा परमेश्वराशी संबंध एकच असतो. तो वेगवेगळा नसतो; म्हणून मंदिरे, मंदिरांतील मूर्ती यांचा अर्थ बहुजनसमाजाला समजत असे. थोर व उदात्त भावना, निर्मळ व व्यापक भावना समजण्यास शिक्षणाचा अभाव किंवा बुध्दीची अप्रगल्भता आड येत नाही. उलट पुष्कळ वेळा संस्कारहीन मिळालेले भाराभर शिक्षण त्यामुळे मात्र या थोर भावना समजण्यास अडचण येते. थोर व भव्य अशी कलाकृती समजण्यास कठिण असेल, परंतु कोणाला? साध्या सरळ शेतक-याला नाही, ज्याची रूची विकृत झालेली नाही अशा मजुराला नाही; त्यांना जे परमोच्च आहे ते पटकन् समजते, त्यांचे डोळे भरतात, हात जोडले जातात, हृदय उचंबळते. परंतु जे पंडित असतात, लिखत-पढतवाले व मोठमोठे किताबवाले असतात; धर्महीन, सद्भावहीन अशा विकृत रूचीचे जे असतात, त्यांना ती सत्कला समजणे जड जाते. आज आपल्या समाजात हा पदोपदी अनुभव येत आहे. ख-या थोर व उच्च भावना आज मुळीच समजेनाशा झाल्या आहेत. मला असे लोक माहीत आहेत की जे स्वत:ला प्रगल्भ व सुसंस्कृत असे समजतात; परंतु शेजा-यावर प्रेम करा या वाक्यांतील काव्य त्यांना समजत नसते. त्यागांतील, पावित्र्यांतील व निरपेक्ष प्रेमांतील काव्य आपणांस नाही बुवा समजत'' असे ऐटीने व प्रौढीने उलट ते सांगत असतात!
अशा पढतमूर्खांना, अशा काही मूठभर बिघडलेल्या लोकांना विश्वव्यापक सत्काल नाही कदाचित् समजणार; परंतु साध्या सरळ अशा बहुजनसमाजाला ती समजणार नाही असे कधीही होणार नाही.
आमची कला फार उच्च दर्जाची आहे म्हणून बहुजनसमाजाला ती समजत नाही, असे आजचे कलावान् नेहमी सांगत असतात. परंतु वस्तुस्थिती निराळीच आहे. आता उलट असे म्हटले पहिजे की तुमची कला हीन आहे म्हणून त्यांना समजत नाही. तुमची कला ही कलाच नाही. ''आमच्या कलेचा हृदयांत अनुभव यावयास, प्रथम ती बुध्दीने समजून घ्या'' (म्हणजे तिची हळूहळू सवय लावून घ्या) हे जे आजकाल सांगण्यात येत असते व असे सांगणे पुष्कळजण योग्यही मानतात. त्यावरून आजची कला ही असत्, असंग्राहक व हीन अशी आहे; अथवा ती कलाच नाही, ही गोष्ट निरपवाद सिध्द होत आहे. ह्यांच्या कलेच्या कलाहीनत्वाचे, कलेच्या अभावत्वाचे हेच उत्कृष्ट गमक आहे.