कला म्हणजे काय? 41
''धर्मातील सिध्दांत जितक्या सत्यतेने मांडले जातात, तितक्याच सत्यतेने व जोरदारपणे, तितक्याच नि:शंकपणे 'सत्यं शिवं सुंदरं'ची त्रयी वामगर्टनने मांडली आहे व ही त्रयी आपणही सत्य मानून चाललो आहोत. हे तिन्ही शब्द जणू समानार्थकच आहेत असे समजून घेण्याची सवय, असे मानण्याची सवय आपणांस लागली आहे. परंतु ही सवय जरा दूर करून क्षणभर हे शब्द खरोखर काय आहेत, या शब्दांचा वास्तविक काय अर्थ, या शब्दांनी कोणता भाव मनांत जागृत होतो.
टीप :- टॉलस्टॉयने वरच्या प्रकरणांतील पुढे दिलेला उतारा मागून काढून टाकला होता. टॉलस्टॉय पुष्कळवेळा प्रकरणेच्या पुन्हा लिहून काढी व कधी कधी इतका त्यांत फेरबदल करी की जणू ती प्रकरणे नवीनच होत. पुढे दिलेला उतारा टॉलस्टॉयने वरच्या प्रकरणांतून जरी वगळला तरी तो उतारा महत्त्वाचा आहे व जगासमोर तो असला पाहिजे. हे जर आपण पाहू तर या तिन्ही शब्दांना एकत्र बसविणे, त्यांना एकरूप मानणे, त्यांची एके ठिकाणी मोट बांधणे हे किती काल्पनिक, भ्रामक व अवथार्थ आहे ते आपणांस समजून येईल. या तिन्ही शब्दांतील भाव अत्यंत भिन्न आहेत, त्यांतील अर्थ समान नसून काहीसा परस्पर विरोधीच आहे हे दिसून येईल.
सत्य, शिव व सुंदर या तिन्ही कल्पनांना एकाच सिंहासनावर एकाच चौरंगावर बसविण्यात येते. या तिन्ही कल्पना जणू मुलभूत आहेत, अध्यात्मिक आहेत अशा दृष्टीने त्यांच्याकडे पाहिले जाते; हीच दृष्टी घेऊन विवरण करण्यात येते. परंतु वास्तविक अशी स्थिती नाही.
साधुत्व-शिवत्व हे चिरंतन असे मानवी जीवनाचे परमोच्च मध्येय आहे. साधुत्व म्हणजे काय याची कल्पना जरी काहीही केली तरी इतके निश्चित आहे की मानवी जीवनाचा जे सत् आहे, जे साधु आहे, जे शिव आहे त्याकडे जाण्याचा अविरत प्रयत्न सुरू आहे. मानवी जीवनाची ईश्वराकडे जाण्यासाठी सारखी धडपड आहे. साधुत्व म्हणजेच ईश्वरत्व.
साधुत्व-शिवत्व हीच एक मुलभूत, पायाभूत अशी आध्यात्मिक भावना आहे. आपल्या सर्व जाणिवेचे सार यांतच आहे. शिवत्व ही एक अशी कल्पना आहे की बुध्दीने तिची नीट व्याख्या करता येणार नाही.
शिवत्वाची व्याख्या दुस-या कशाने करता येत नाही, परंतु हे शिवत्व मात्र दुस-या सर्वांच्या व्याख्या ठरवीत असते.
आणि सौंदर्य? जर केवळ शब्द उधळायचे नसतील, जे मनात आपण समजतो तेच सांगावयाचे असेल, शब्दाने जो भाव मनात येतो तोच बोलून दाखवायचा असेल तर ''जे सुखविते ते सौंदर्य'' असेच म्हटले पाहिजे. सौंदर्याचा विचार व शिवत्वाचा विचार हे एक तर नाहीतच, उलट ते परस्परविरोधी असे आहेत. त्यांची समान वसति असणे शक्य नाही. प्रकाश व अंधार अशी ही जोडी आहे. कारण शिवत्व हे बहुधा नेहमी विकारांवर विजय मिळविण्यात असते, तर सौंदर्य हे त्या विकारांच्या मुळांशी असते.