कला म्हणजे काय? 139
हे म्हणणे बरोबर आहे. अत्यंत सत्य अशी ही गोष्ट आहे. स्त्रियांच्या इतके पुरुषांना करता येणार नाही. गर्भधारणा करणे, मुले वाढविणे, त्यांचे संगोपन करणे, बाळपणी त्यांना शिक्षण देणे... ह्या गोष्टीच पुरुषांना करता येणार नाही, असे नव्हे तर जे जे म्हणून थोर व सुंदर आहे, हृदय व उदार आहे, प्रेमळ व गोड आहे, मंगल व पवित्र आहे, जे जे देवाजवळ घेऊन जाणारे आहे, ते पुरुषापेक्षा स्त्रीलाच अधिक साधते. पुरुषाला हे तितके साधत नाही. ते सारे त्या अबलेलाच शक्य असते. प्रेम करण्याचे काम, ज्याच्यावर प्रेम करावयाचे त्याच्यासाठी सर्वस्व त्याग, त्याची मनोभावे सेवा, हे सारे स्त्रियाच करू जाणत. स्त्रियांनी फारच सहजपणे व अत्यंत चांगल्या रीतीने हे करून दाखविले आहे, करून दाखवीत आहेत व करून दाखवतील. ज्याच्यावर प्रेम करावयाचे त्याच्यासाठी सर्वार्पण करण्याची, सर्व विसरून जाण्याची अतुलशक्ति जर स्त्रियांजवळ नसती, ह्या शक्तीचा प्रभाव व्यवहारांत, संसारांत पदोपदी जर त्यांनी दाखलवला नसता तर या जगाचे काय झाले असते? या पुरुषांचे काय झाले असते? स्त्रिया डॉक्टर नसतील, वकील नसतील; तरीही चालेल; परंतु माता, सखी, सहचरी, सुखदु:खांत भाग घेणारी, सदैव हात देणारी, पदराने अश्रू पुसणारी, अशी स्त्री जर समाजांत नसेल, पुरुषांत जे जे कांही चांगले आहे त्यावर प्रेम करणारी स्त्री जर जगांत नसेल, तर जग कसे जगेल? अशा स्त्रियांशिवाय जगात जगणे म्हणजे ते मरणच होय. ते जगणे कठिणच होईल. ख्रिस्ताला मेरी व मॅगडेलेनशिवाय जगावे लागले असते; फ्रॅन्सिस ऑफ असिसी ह्याला क्लेअर मिळाली नसती; हद्दपार केलेल्या डिसेंब्रिस्ट लोकांबरोबर त्यांच्या पत्न्या गेल्या नसत्या; डुकोबार लोकांना सत्यासाठी मरावयास प्रोत्साहन देणा-या बायका मिळाल्या नसत्या आणि दारूबाज पतींना प्रेम देणा-या, त्यांची काळजी घेणा-या, त्यांच्यासाठी रात्रीच्या रात्री घरी वाट पाहणा-या, दुबळया व पतित पतीसही धीर देणा-या, आधार देणा-या, ज्या पतितांना समाजाकडून धिक्कृत केले गेले, त्यांना गोड हृदयांतून बाहेर पडलेल्या कळकळीच्या शब्दांची इतर लोकांपेक्षा जास्तच जरूर असते, अशा प्रेममय सांत्वनाची अधिकच आवश्यकता असते, अशांना ते सांत्वन देणा-या, हात देणा-या लाखो स्त्रिया समाजात ज्या आहेत त्या नसत्या तर या समाजाचे काय झाले असते? ते प्रेम कुनिवर असो वा ख्रिस्तावर असो. ते प्रेम म्हणजे अबलांचे बळ आहे. ते बळ फार भव्य, दिव्य व घोर आहे. या बळाची जागा दुसरे कोण ते बळ बळकावणार? या प्रेमबळाच्या जागेवर दुसरे कोणते बळ येऊन बसणार?
पुष्कळशा सुशिक्षित स्त्रीपुरुषांना हा स्त्रियांचा प्रश्न सतावीत आहे, गुंगवीत आहे, परंतु हा प्रश्नच मुळी चुकीचा आहे. हा प्रश्न फोल आहे. (आणि जे फोल व निस्सार असते, तेच पुष्कळ वेळा गुंगवून टाकीत असते.)
स्त्रियांनी स्वत:ची सुधारणा करून घेऊ नये का? त्यांनी आपले हक्क मिळवून घेऊ नये का? ह्या प्रश्नांहून अधिक न्याय्य व अधिक योग्य कोणता प्रश्न आहे?
परंतु स्त्रीचे जे नियतकर्म आहे त्यामुळेच पुरुषापेक्षा तिचे कार्यक्षेत्रही निराळे आहे. पुरुषाचे जे पूर्णतेचे ध्येय तेच स्त्रीचे असू शकणार नाही. आपले ध्येय कशात आहे हे आपणांपैकी कोणालाच माहीत नाही, असे गृहीत धरू या, परंतु काही झाले तरी पुरुषाचे पूर्णतेचे ध्येय हे स्त्रीचे असू शकणार नाही एवढे खास. परंतु तेच पुरुषी ध्येय प्राप्त करून घेण्यासाठी या सुधारलेल्या स्त्रियांचे सारे मूर्खपणाचे प्रयत्न चालले आहेत. हे वेडेचाळे आहेत, हे अहितकर आहे. या असल्या प्रयत्नांमुळे स्त्रियांचा स्वत:चाच घोटाळा उडून राहिला आहे. त्या गोंधळल्या आहेत.
डार्लिंग ही गोष्ट लिहिताना अशा नवनारीची कल्पना चेकॉव्हच्या मनांत कदाचित अंधुकपणे असावी असे भीतभीत म्हणावेसे वाटते.