कला म्हणजे काय? 43
प्रकरण आठवे
(ही सौंदर्यविषयक मीमांसा कोणी मानिली, कोणी उपयोगांत आणिली? खरी कला ही सर्व मानवजातीस जरूर आहे; आपली वरच्या वर्गाची कला बहुजन समाजाच्या दृष्टीने फारच खर्चिक, समजण्यास कठीण व अपायकारक अशी आहे; कलाक्षेत्रांतील श्रेष्ठत्ववाद.)
महापुरुषाच्या हृदयांत ज्या परमोच्च व उत्कृष्ट अशा भावना उत्पन्न होतात त्या बहुजनसमाजास देणे हे जर कलेचे मध्येय मानले, यासाठी हा कलाव्यापार आहे असे जर गृहीत धरले, तर मग काही शतके (मंदिरी चर्चवरची श्रध्दा उडाल्यापासून तो आजपर्यंत) ह्या कलेवाचून मानवी समाज कसा राहिला? असा हा महत्त्वाचा जो कलाव्यापार त्याशिवाय समाज कसा जगला, कसा टिकला? अशा उदात्त कलेच्या अभावी, केवळ सुखप्रद असा जो क्षुद्र कलात्मक व्यापार तो पत्करून मानवी समाज कसा स्वस्थ बसला?
या प्रश्नाचे उत्तर देताना एक चूक नेहमी करण्यात येत असते व ती सुधारली पाहिजे. आपली कला हीच काय ती खरी व्यापक जागतिक कला-जगांत अन्यत्र जणू कोठे थोर कला नाहीच-असेच मानण्याची चूक आपण सदैव करीत असतो. इंग्रज व अमेरिकन लोकांस ऍंग्लोसँक्सन जात सर्वश्रेष्ठ अशी वाटते; जर्मन लोकांस टयूर्टेनिक जात सर्वश्रेष्ठ वाटते; फ्रेंचांन गॅलोलॅटिक जात सर्वश्रेष्ठ वाटते व रशियनास स्लाव्ह जात सर्वश्रेष्ठ वाटते. आपरास ही घातुक व फार वाईट अशी सवय लागली आहे. त्याचप्रमाणे आपल्या कलेबद्दल जेव्हा आपण बोलू लागतो, तेव्हा आपली कला हीच काय ती एक खरी कला, हीच सर्वोत्कृष्ट व सर्वश्रेष्ठ असे नि:शंकपणे आपण मानीत असतो. परंतु खरे पाहू गेले असता आपली कलाच काय ती या जगात फक्त असते असे नाही. बायबल हे एकच काय ते जगांतील धर्मपुस्तक, असे ज्याप्रमाणे पूर्वी मानण्यात येत असे, तसेच हेही मानणे होय. आपल्या कलेशिवाय जगांत दुसरी कला आहेच, परंतु आपर जी आपली कला म्हणून मानतो, ती सर्व ख्रिस्ती राष्ट्रांना तरी व्यापून आहे का? सा-या जगाचा प्रश्न दूरच राहू दे. जी ख्रिस्ती लोकसंख्या जगातील लोकसंख्येचा अल्प भाग आहे, अशा ख्रिस्ती लोकांना तरी आपल्या कलेने कोठे व्यापिले आहे? ज्यू लोकांची, ग्रीक किंवा ईजिप्शियन् लोकांची कला राष्ट्रीय होती असे बोलणे योग्य व रास्त होते. तसेच भारतीय कला, चिनी, जपानी कला असे आजही म्हणता येईल, म्हणणे योग्य होईल. कारण या राष्ट्रांतील कला राष्ट्रांतील सर्व लोकांना व्यापून राहिली आहे. राष्ट्रांतील सर्व लोक त्या कलेचा आस्वाद घेतात. सर्व जनता त्या कलेची भागीदार आहे. पहिल्या पीटरच्या कारकीर्दीपर्यंत सर्व रशियाला व्यापणारी अशी कला रशियांतही होती. सर्व युरोपांत तेराव्या चौदाव्या शतकापर्यंत सर्व लोकांची अशी कला होती. परंतु ज्या वेळेपासून वरच्या वर्गातील लोकांची मंदिरी धर्मावरची श्रध्दा उडाली व ख्रिस्ताची शिकवणही त्यांनी अंगिकारली नाही, त्या वेळेपासून ख्रिस्तीराष्ट्रांची कला असे आपणांस बोलता येणे अशक्य झाले. ख्रिस्तीराष्ट्रांतील वरच्या धर्महीन लोकांची कला वेगळीच झाली. युरोपममध्ये दोन कला झाल्या. सामान्य जनतेची कला व वरच्या वर्गाची कला. श्रेष्ठांची कला व सामान्यांची कला. सुख हे ध्येय मानणा-या कलेचा उदय व विकास होत असता, ख-या थोर सत्कलेवाचून मानवजात कशी राहिली या प्रश्नाचे उत्तर देताना, सर्व मानवजात सत्कलेवाचून उपाशी मरत होती असे समजता कामा नये. फक्त युरोपांतील ख्रिस्तीधर्माचे हे जे वरिष्ठ वर्ग-तेच त्या सत्कलेवाचून होते. सुख देणारी कला त्यांच्यातच फक्त होती. हे युरोपमधील वरचे वर्ग म्हणजे मानवसिध्दांतातील एक बिंदू होय. हा लहानसा बिंदूही फार शतके नाही तर नवयुगापासून आतापर्यंत म्हणजे ३।४ वर्षेच सत्कलेशिवाय राहिला आहे.