कला म्हणजे काय? 79
शाळांतून, या कलागृहांतून एकच गोष्ट शिकविण्यात येईल व ती म्हणजे इतर कलावानांनी ज्या भावना अनुभविल्या व कलेच्याद्वारा दिल्या, त्याच आपणही त्याच पध्दतीने द्यावयाच्या! या धंदेवाईक शाळांतून कलेचा धंदा कसा करावा हे मात्र शिकविण्यात येईल. सत्कलेच्या प्रसारास व निर्मितीत अशी शिकवण मदत तर नाहीच करीत, उपकारक तर नाहीच होत, उलट अपायकारक व हानिकारकच होते. असत्कलेच्या व दांभिक कलेच्या प्रसाराने खरी सत्कला समजण्याची लोकांत असलेली स्वयंभू शक्ती मारून टाकण्याचे काम मात्र अशा शिकवणुकीमुळे होत असते.
साहित्यविषयक कलाशिक्षणांत भाराभार पाने लिहून कशी रचना करावी ते शिकविण्यात येते. एखाद्या विषयाचा विचार केलेला असो वा नसो; त्या विषयासंबंधी काही सांगण्याची आतून प्रेरणा असो वा नसो; त्या विषयावर लिहावयास लावतात आणि ते पुन्हा कसे लिहावयाचे? विख्यात म्हणून मानल्या गेलेल्या ग्रंथकारांच्या कृतींप्रमाणे ते हुबेहूब वठले पाहिजे. अशी ही अनुकरणे शाळांतून व कलागृहांतून शिकविण्यात येत असतात.
चित्रकलेतही तोच प्रकार. समोर आकृती ठेवावयाच्या, आदर्श ठेवावयाचे, त्या बरहुकूम काढावयाचे. विशेषत: नग्न शरीरे काढावयास शिकावयाचे, (जी आपण पहात नाही व सत्कला कधीही रंगवू इच्छित नाही, चितारू पाहात नाही). पूर्वीच्या नावाजलेल्या चित्रकारांनी जसे रंगविले व रेखाटले तसेच सारे करावयास लावावयाचे. चित्रांनासुध्दा साहित्याप्रमाणे विषय देतात. पूर्वीच्या चित्रकारांच्या कृतीत जसे विषय असतील, तत्सम विषयच ठेवण्यात येत असतात.
रशियन कलावान ब्रायलाव्ह याने कला म्हणजे काय हे एकदा थोडक्यात सांगितले होते. त्याचा तो अर्थपूर्ण उद्गार मी अन्यत्र दिलाच आहे. परंतु येथेही तो दिल्याशिवाय माझ्याने राहवत नाही. या कलागृहांतून काय शिकविले जाणे शक्य आहे व काय शिकविणे अशक्य आहे हे ब्रायलाव्हच्या उद्गारांवरून पटकन लक्षात येईल. ब्रायलाव्ह त्याच्या विद्यार्थ्याने काढलेल्या एका चित्रांत फेरफार करीत होता, त्याचे चित्र माधुरीत होता, बरोबर करीत होता. दोनचार जागी ब्रायलाव्हने स्पर्श केला, कुंचला मारला आणि ते मृतचित्र सजीव दिसू लागले. त्या चित्रांत प्राण आला, कला आली. विद्यार्थ्यांपैकी एक म्हणाला, ''तुम्ही फारसे काही नाही केले. येथे जरा फरक केलात, तेथे जरा बदल केलात. सारे चित्र तर आहे तसेच आहे.'' तेव्हा तो गुरू म्हणाला, ''हे थोडे येथे, थोडे तेथे, याचा आरंभ झाला म्हणजेच कलेचा आरंभ झाला. थोडे येथे, थोडे तेथे करता येऊ लागले म्हणजेच कला कळू लागली, हातात येऊ लागली. या लहान लहान गोष्टींतच सारी कला आहे.'' ब्रायलाव्हचा हा उद्गार सर्व कलांना लागू आहे; विशेषत: संगीतांत तर फारच लागू आहे. संगीताने भावनास्पर्श व्हावयास असल्या बारीकसारीक गोष्टींची फार जरूर असते. तान जरा लांबविली किंवा वाढविली तर लगेच निराळा परिणाम होतो. आवाज जरा हलका करताच किंवा जरा चढवताच निराळा परिणाम होतो. ताल, तान व आवाज यांतील लहान लहान बदलाने परिणामत: विलक्षण बदल होत असतो. या तिन्ही गोष्टींच्या नीट प्रमाणबध्दतेने संगीत हृदयस्पर्शी होते. आवाज जरूरीपेक्षा वाढवला किंवा जरूरीपेक्षा कोमल केला, तान जरूरीपेक्षा ताणली किंवा जरूरीपेक्षा आखडली, तर भावनास्पर्श संपुष्टात येतो. हृदय समरस होत नाही; संगीतांत समरसता तात्काळ होते. एक लकेर मारल्याबरोबर, एक सुर उच्चारताच तन्मयता होते. परंतु यासाठी संगीततज्ञाला बारीकसारीक गोष्टी, लहानसान गोष्टी नीट लक्षात घ्याव्या लागतात. चित्रकलेतही तेच, थोडा अधिक प्रकाश, थोडी अधिक छाया, थोडे उंच, खाली, थोडे लांब, थोडे आंखूड, थोडे डावीकडे, थोडे आंखूड, थोडे डावीकडे, थोडे उजवीकडे-असे फरक केल्याने तेच चित्र बेडौल दिसेल किंवा डौलदार दिसू लागेल. नाटयकलेतील हावभाव व बोलणे-चालणे यांसही हाच नियम लागू आहे. पात्राचे बोलणे जरा जोरदार, जरा कोमल, जरा गंभीर, जरा ठसकेबाज, जरा सावकाश, जरा जलद असे केल्याने सारा नूर बदलून जातो. तसेच काव्यांत थोडे गाळणे, थोडे जोडणे, थोडी अधिक अतिशयोक्ती, थोडी पुनरुक्ती असे करा की तेच काव्य निराळे दिसू लागते.