कला म्हणजे काय? 74
ज्याला थोडीफार बुध्दी आहे, त्याला चित्र व शिल्प या शाखांत भराभरा नकली कला निर्माण करता येईल. ते फारच सोपे काम आहे. रेखाटणे, रंगवणे, समोरचे पाहून काढणे ह्या गोष्टी त्याला येत असाव्यात. विशेषत: नग्न शरीरे काढण्याचा त्याने जास्त अभ्यास करावा. या सामुग्रीने सिध्द झाल्यावर त्या कलावीराला चित्रे रंगविता येतील, पुतळे करता येतील. दंतकथांतील, धार्मिक गोष्टींतील, इतिहासातील किंवा कल्पनेतील काहीही त्याने रंगवावे. प्रतीकवादी व्हावे वा प्रतिबिंबवादी व्हावे. सारे त्याला साधेल किंवा वर्तमानपत्रात जे लिहिलेले असेल, त्याला अनुरूप चित्रे काढावी. राज्याभिषेक, संप, तुर्की-ग्रीक लढाई, दुष्काळ, निवडणुकी, शस्त्रास्त्रयोजना किंवा स्वत:ला जे सुंदर वाटेल ते रंगवावे. नग्न स्त्रियांपासून तो तांब्या-पितळेच्या किंवा चिनीमातीच्या भांडयांपर्यंत काहीही त्याने रंगवावे किंवा घडवावे.
संगीतात्मक नकली माल तयार करावयास इतकीही साधनसामुग्री नको. कलेला आवश्यक अशी वस्तू जी भावना तिचे नावनिशाणही येथे नसले तरी चालते. परंतु या कलेत इतर कोणत्याही कलेपेक्षा (अर्थात नृत्यकला वगळून) शारीरिकश्रम जास्त असतो. स्नायूंना फार कष्ट पडतात. संगीतात्मक तयारीस आधी कोणत्या तरी वाद्यावर बोटे भराभरा फिरविण्यास शिकले पाहिजे. ह्या कलेतील तज्ज्ञांची बोटे जितकी भरभर फिरत असतील, तितकी भरभर आपली बोटे फिरतील इतका अभ्यास करावा. नंतर पूर्वीच्या काळांत सामुदायिक संगीत कसे तयार करीत त्याचा अभ्यास करावा. नाना रागांची मिश्रणे शिकावी, तंत्र चांगले अभ्यासावे, वादनाचे परिणाम कसे घडवून आणावयाचे ते शिकले पाहिजे. निरनिराळया वाद्यांचे मेळ कसे बसवायचे ते माहीत हवे. अशा थोडयाफार गोष्टी शिका म्हणजे मग भराभरा चिजा तुम्हाला निर्माण करता येतील व त्या वाजविता येतील. संगीत बैठकीचे असो, जलशांतील असो, नाटकांतील असो, कुठलेही असो. वाटेल त्याचे विषय घ्यावे व त्यांना निश्चित असे स्वत: स्वरूप द्यावे. त्याचे निरनिराळे भाग पाडावे. स्वत:च्या लहरीस आले तर केवळ सुरांच्या मेळांचेच संगीत बनवावे. नको विषय नको काही. तोमतनमनच चालवावे. धाडिड दिडडीट धपटधपट चालवावे.
अशा प्रकारचा आज सर्व कलाक्षेत्रांतून नकली व भावनाहीन कलांचा बाजार भरला आहे. माल भरपूर आहे, आगाऊच तयार आहे. मागणीप्रमाणे बनवूनही देण्यात येतो. या मालाचा उठावही होत आहे. माल पडून नाही. कला म्हणून या मालाचे स्वागत होत आहे, कौतुक केले जात आहे.
वरच्या वर्गातील कला लोककलेपासून, व्यापक अशा विश्वकलेपासून अलग झाल्याचे जे दुष्परिणाम, त्यांतील हा तिसरा दुष्परिणाम होय. ख-या कलाकृतीऐवजी नकली कला रूढ झाल्या. अस्सलांचे स्थान नक्कल पटकावून बसली!