कला म्हणजे काय? 133
खरोखरच हे एक सुंदर पुस्तक आहे. ही रमणीय कलाकृति आहे. जो जो कोणी वाचलीत तो हेच म्हणेल. ही कादंबरी प्रसिध्द होऊन तीन वर्षे झाली. रशियातही ती Messenger of Europe या मासिकातून प्रसिध्द झाली; परंतु या कादंबरीकडे कोणी लक्ष दिले नाही. तिची वास्तपुस्त कोणी घेतली नाही. कित्येक जर्मन साहित्यसेवकांना त्यांच्याच भाषेतील या कादंबरीबद्दल विचारिले, परंतु ते म्हणतात व्हॉन पॉलेझ याचे नांव आम्ही ऐकले आहे. परंतु त्याची ही कादंबरी आम्ही वाचलेली नाही. त्या साहित्यसेवकांनी झोलाने लिहिलेली एक ओळही वाचल्याशिवाय सोडली नसेल. झोलाच्या झाडून सा-या कादंब-या, किल्पिंगच्या सा-या गोष्टी, इब्सेनची सारी नाटके, तशीच मॅटलिकची सारे यांनी वाचलेले होते. परंतु ही गोड कादंबरी त्यांनी वाचलेली नव्हती.
वीस वर्षांपूर्वी इंग्लंडमधील टीकाकार मॅब्यु आर्नोल्ड याने ''टीकेचा हेतू'' या विषयावर एक चांगला निबंध लिहिला होता. तो त्यांत म्हणतो, ''टिकेचा हेतू काय हे टिकाकाराच्या नीट ध्यानांत असावे. जे जे लिहिले गेलेले असेल, ते मग कोठेही व केव्हाही लिहिलेले असो... त्यामध्ये जे अत्यंत महत्त्वाचे व अत्यंत चांगले असे असेल ते वाचकांना दाखवून द्यावयाचे, वाचकांचे लक्ष त्याच्याकडे वेधून घ्यावयाचे, त्यांना त्याच्याकडे जावयास लावावयाचे हा टिकेचा प्रधान हेतू आहे.''
आज वर्तमानपत्रे, मासिके, जाहिराती यांचा नुसता पूर आलेला आहे. अशा काळांत तर वरच्या प्रकारच्या टिकेची नितांत आवश्यकता आहे. सुशिक्षित युरोपियनांची भावी संस्कृति अशा मार्गदर्शन टिकेवर अवलंबून आहे. अशा टिकेला जर समाजांत स्थान व अधिकार असेल तरच भावी संस्कृति टिकेल.
''अति झाले व हसू आले'' ही म्हण सर्वत्र खरी आहे. कोणतीही वस्तू प्रमाणाबाहेर पिकू लागली की धोका आलाच. प्रमाणांत सारी शोभा. वस्तूंची निपज हे साध्य नसून साधन आहे. कशीतरी निपज वाढविणे हे ध्येय नाही. परंतु आज साधनालाच साध्य समजून लोक चालले आहेत व म्हणून भीती वाटते. लिहिणे हे साधन असून साध्य नव्हे.
लांब जाण्यासाठी गाडीघोडी, निवा-याला जागा असावी म्हणून घरदार, शरीरांतील शक्ति रहावी म्हणून अन्न या वस्तू जीवनास उपयोगी आहेत. परंतु ह्या साधनांनाच मनुष्य जेव्हा साध्य मानू लागतो, ही साधने खूप जवळ ठेवण्यातच जेव्हा त्याला पुरुषार्थ वाटू लागतो, जितके स्वत:चे घोडे असतील, जितकी स्वत:ची घरे असतील, जितकी स्वत:ची शेतेभाते असतील, जितके स्वत:चे कपडेलत्ते असतील, तितके चांगले, असं जेव्हा मनुष्याला वाटू लागते, तेव्हा ह्या उपयोगी वस्तूच निरुपयोगी होतात. एवढेच नव्हे तर अनर्थावह होतात. आजच्या युरोपमधील सुखवस्तू लोकांत पुस्तकनिर्मितीबद्दल हाच प्रकार झाला आहे. अशिक्षित जो बहुजनसमाज त्याच्या हितार्थ छापण्याची कला उपयुक्त आहे.. नि:संशय उपयोगाची आहे. परंतु सुखवस्तू लोकांत अज्ञान व भिकार समजुती पसरवण्याचे आज ते मुख्य साधन होऊन बसले आहे, प्रकाश न येता छापखान्यातून अंधारच अधिक बाहेर पडत आहे.
मी म्हणतो ही गोष्ट सिध्द करावयास नको, ती सहज समजून येईल. पुस्तके, नियतकालिके, मासिक, वृत्तपत्रे यांचे पैसा हे ध्येय झाले आहे. पैसेमिळविण्याचे हे धंदे आहेत. ही पत्रे, ही मासिके, या माला यशस्वी रीतीने चालवता याव्यात, त्यातून भरपूर कमाई व्हावी, म्हणून जास्तीत जास्त गि-हाईक पाहिजे. परंतु गि-हाईक भरपूर मिळण्यासाठी त्यांना रुचेल तेच लिहिले पाहिजे. लोकांच्या रुचीला वळण लागण्याऐवजी, लोकांच्या रुचीलाच मान देण्यात येतो. छापखान्यांतून छापलेले खपले म्हणजे झाले. म्हणून या सर्व लिखणांतून हीन, नीच व अश्लील गोष्टीच मांडण्यात येतात, हलकट व बाष्कळ गोष्टीच बाहेर पडतात. जशी मागणी तसा माल हा आज साहित्यातील दंडक आहे. छापखानेवाल्यानां हे साध्यही होते व शक्यही होते. कारण बहुजनसमाजाच्या ज्या रुचि आहेत, अभद्र रुचि आहेत, असल्याच अमंगळ व हीन रुचि ज्यांच्या आहेत असे लेखनपटू लोकही समाजात आजकाल भरपूर आहेत. या लेखकांतील फारच थोडे उदात्त व उदार भावनांनी प्रेरित झालेले असतात. फारच थोडयांचीरुचि शुध्द व सात्त्वि असते. छापण्याची सोय व प्रसार, मागणीप्रमाणे पुरवठा ही साहित्यातील बाजारीवृत्ती, त्यामुळे खिशांत जमा होणारा भरपूर पैसा यामुळे दिवसेंदिवस लिखाणांच्या कच-याचे ढीग समाजासमोर ओतले जात आहेत, आणि या पुस्तके व मासिके यांच्या पर्वतांच्यामुळे प्रकाश पलीकडेच अडकून बसला आहे. सत्यज्ञानाच्या भेटीच्या मार्गातील हे साहित्यपर्वत म्हणजे अनुल्लंघनीय अडथळे होत.