कला म्हणजे काय? 61
काही काही चित्रकार इतके दाट रंग देतात की, हे चित्र आहे का शिल्प आहे ते समजत नाही. तिसरे एक चित्र पाहिले. माणसाचे एक तोंड काढलेले होते. त्या मुखवटयासमोर एक ज्वाळा होती व काळे काळे पट्टे होते. हे काळे पट्टे म्हणजे जळवा असे मला मागून सांगण्यात आले.
एकंदरीत सारी चित्रे एकाच ठरीव साच्याची, कशीतरी रेखाटलेली, रंगाने गिचमिडलेली अशी होती. काही चित्रांच्या कडा काळया रंगाने भरलेल्या होत्या.''
१८९४ मधील ही हकीगत आहे. अद्याप तीच परिस्थिती आहे. परिस्थितीत बदल नाही. उलट ही प्रवृत्ती वाढतच आहे.
नाटकांतही हीच रड. कोणाच्या नाटकांत एक शिल्पकार असतो; (इन्सेनचे ''मास्टर बिल्डर'') पूर्वीचे त्याचे उच्च हेतू विफळ झालेले असतात. एका घराच्या छपरावर तो चढतो. हे घर व हे छप्पर त्यानेच बांधलेले असते. डोके खाली करून तो उडी घेतो. दुस-या एखाद्या नाटकांत (इब्सेनचे Little Eyolf) एखादी बाई असते. ती जरा गूढ वृत्तीची आहे. पूर्वी ती उंदीर व घुशी पकडीत असे. एक सुंदर काव्यमय मूल तिला वेड लावते. काहीतरी अज्ञात कारणाने त्या मुलाचा तिला फार लळा लागतो. शेवटी ते मूल समुद्रतीरी नेऊन समुद्रांत ती बुडविते! कोणा एखाद्याच्या नाटकांत समुद्रकिना-यावर आंधळयांची मालिका बसलेली असते. (मॅटर्लिकचे Les Aven) व ते आंधळे, कां ते कोणास माहीत, तीच गोष्ट पुन: पुन्हा उच्चारीत असतात. कोणाच्या नाटकांत कसली तरी एक घंटा असते; ती सरोवरांत उघडते व तेथे वाजते. (हॉप्टमनचे Die Versunkene Clocker).
जी कला इतर सर्व कलांपेक्षा सर्वांना समजण्यासारखी असावयाला हवी, त्या संगीताचीही अशीच दशा झाली आहे. एखादा तुमच्या ओळखीचा, प्रसिध्द असा संगीतज्ञ पियानोवर बसतो व वाजवू लागतो. ही कोणा नवीन कलावानाची रचना आहे. किंवा ही स्वत: माझी आहे, वगैरे ते आधी सांगतो. ते चमत्कारिक मोठयाने होणारे आवाज ऐकू येऊ लागतात. श्रम करणा-या त्या बिचा-या बोटांचे मात्र कौतुक करावेसे वाटते. ''जे आवाज निघत आहेत, त्यांतून आत्म्याची धडपड प्रकट करण्यांत येत आहे.'' असे त्या संगीतज्ञाची मुद्रा सांगत असते. परंतु ऐकणा-याला उचंबळून येत नाही. आत्म्याच्या धडपडीऐवजी बोटांची धडपड मात्र दिसते. हृदयांत हलत नाही, भावना भरून येत नाहीत. ते सारे कंटाळवाणे वाटू लागते. हा कार्यक्रम केव्हा एकदा संपतो असे होते. वेळ कितीतरी झाला असे वाटते. कारण लक्षच लागत नसते. अल्फन् सोकार याचे शब्द अशावेळी आठवतात. ''जे लवकर संपेल, ते पुष्कळ काळ टिकेल.'' परंतु हे संगीत लवकर संपत नाही व लगेच जणू मरत असते. आपणाला सारे अर्थहीन गूढ असे वाटते. कदाचित् तो कलावान् आपली परीक्षा तर नसेल पहात. तो सारखी बिजलीसारखी बोटे नाचवितो. त्या बोटांचा नाच पाहून तरी आपण टाळया मारू असे त्याला वाटत असते. परंतु तो शेवटी हसतो व म्हणतो ''तुम्हाला मी फसवू पहात होतो. परंतु तुम्ही फसला नाहीत, फसून टाळया दिल्या नाहीत; शेवटी सारे जेव्हा खलास होते, तेव्हा तो घामाघूम झालेला दिसतो; क्षुब्ध व अस्वस्थ झालेला दिसतो. त्याची छाती जोराने खालीवर होत असते; पियानोवरून उठताना आपणांस आता टाळया मिळतील, आपली स्तुति होईल, अशी त्याला अपेक्षा असते, अशा असते. आपणाला मग कळून येते की हा मनापासून वाजवीत असावा!
जलसे होतात त्या सर्वांत हेच प्रकार. वॅग्नर, बर्लिऑझ, ब्रॅहॅम्स आणि अगदी अलीकडचा म्हणजे रिचर्ड स्ट्रॉस-यांचे भाग मधूनमधून संगीतात मिसळलेले असतात. शिवाय इतरही असे हजारो संगीतज्ञ असतात, जे न थांबता सारखे गाणी व गीते प्रसवत असतात, नवीन संगीते तयार करीत असतात.
कादंब-या व लघुकथा-यांच्यामध्ये तरी दुर्बोधता आणणे अशक्य आहे असे वाटत होते. परंतु याही बाजूला ही साथ पसरलीच आहे.