कला म्हणजे काय? 117
भविष्यकालीन कलेचा विषयही, माझ्या कल्पनेप्रमाणे, कलेच्या आजच्या विषयापेक्षा संपूर्णपणे निराळा असेल. ज्या भावना सर्वांच्या नाहीत, त्या प्रकट करण्यात कला कमीपणा मानील. अशा असंग्राहक भावना देणारे विषय कलाविषय म्हणून समजण्यात येणार नाहीत. खोटे कलाभिमान व देशाभिमान, जीवनाचा कंटाळा, नैराश्ये, आडयता, रंगेलपणा, ऐषआराम, सुखविलास-इत्यादि विषयांच्या भावना विशेषत: श्रमहीन लोकांच्याच जीवनांत आढळून येत असतात. मानवांस स्वाभाविक व आवश्यक जो श्रम, त्या श्रमापासून ज्यांनी मुद्दाम स्वत:ची मुक्तता व सोडवणूक करून घेतलेली असते, अशा लोकांनाच असल्या निर्जीव व रोगट भावना सुचतात. असल्या भावना भावी कला प्रकट करणार नाही. आजच्या काळातील ज्या श्रेष्ठ धार्मिक भावना, ज्या थोर दार्मिक प्रवृत्ति त्यांचेच चित्र भावी कला रंगवील. कारण थोर धर्ममय भावना सर्वांना समजतात, ज्यांचे जीवन कृत्रिम नाही अशा सर्वांच्या हृदयांना त्या उंचबळवतात.
ज्यांना भविष्यकालीन कलेचे विषय व भविष्यकालीन कलेच्या भावना समजत नाहीत व समजू शकणार नाहीत, ज्या भावनांशी त्यांची कधी गाठ पडली नाही, ज्यांच्याशी त्यांची तोंडओळखदेखील नाही असे जे वरच्या वर्गातील लोक, त्यांना भविष्यकालीन कलेचा विषय दरिद्री वाटतो. श्रीमंत लोकांच्या कृत्रिम जीवनातच त्यांना विविधता दिसून येते. ते तुच्छतेने विचारतात, ''काय हो, शेजा-यावर प्रेम करा, बंधुभाव ठेवा अशा ख्रिस्ताच्या शिकवणीत काय नवीन आहे? यात काय तुम्ही सांगणार, काय रंगविणार?'' ज्या धर्मभावनांचा अखिल मानवजातीला अनुभव येत असतो, त्या त्यांना तुच्छ व शिळया वाटतात! परंतु वरच्या वर्गातील लोक व त्यांचे कलावान् जरी असे उपहासाने म्हणत असले तरी आजच्या काळातील नवीन भावना ह्या धर्मसंभवच असणार यात शंका नाही. ज्या भावना सर्वास अनुभवता येतात त्याच प्रेमाच्या व बंधुभावाच्या भावना उग्रांच्या कलेस नवीन अशा वाटणार. ख्रिस्ताच्या शिकवणीपासून उत्पन्न होणा-या भावना अनंत रूपांनी व अनंत प्रकारांनी उभ्या आहेत. या मानवैक्याची, या विश्वबंधुत्वाची काही लोकांना कल्पनाच नसते. ते म्हणतात '' बायबलातील प्रसंग पुन्हा पुन्हा काव्यात मांडणे, चित्रात रंगविणे, म्हणजेच हे ख्रिस्ताचे मानवैक्य ना?'' असे नाही. त्या पूर्वीच्या तत्त्वांचा, किंवा गोष्टींचा केवळ पुनरुच्चार करणे म्हणजे मानवैक्य नव्हे, म्हणजे बंधुभाव नव्हे. ख्रिस्ताची शिकवण हृदयात बिंबवून ख्रिस्ताच्या शिकवणीचे अंजन डोळयात घालून मग जीवनांतील अत्यंत सामान्य, अत्यंत क्षुद्र अशा रोजच्याच वस्तूंकडे, रोजच्याच संबंधाकडे पहा. तुम्हाला निराळीच सृष्टी दिसेल. नाविन्यहीन व नीरस गोष्टी नव्यानवलाईच्या व रसपूर्ण दिसतील. आणि त्या तशा पाहून अनुभूत व अनपेक्षित अशा अत्यंत उत्कट व सतेज भावना हृदयात भरभरून येतील.
विवाहीत जोडप्याचे परस्पर संबंध, आईबापाचे मुलांशी व मुलांचे आईबापाशी संबंध, मनुष्याचे समाजाशी संबंध, राष्ट्राराष्ट्रांचे संबंध, मालमत्ता व जमीनजुमला यांच्याबद्दलच्या कल्पना, श्रीमंत व गरिबी यांच्याबद्दलची कल्पना, सुख व श्रम यांच्याबद्दलच्या समजुती, माणसांचे पशुपक्ष्यांशी व वृक्षवनस्पतींशी असणारे संबंध, स्वत:चे संरक्षण, परकीयांच्या स्वा-या यांच्याबद्दलचे विचार-ह्या एकंदर सर्व गोष्टी जुन्याच नाहीत का? सृष्टीच्या आरंभापासून ह्या गोष्टी चालत आलेल्या आहेत; परंतु ख्रिस्ताने दिलेल्या शिकवणुकीच्या दृष्टीने या सर्व संबंधांकडे, या सर्व गोष्टींकडे पहा. तुमच्या हृदयात शेकडो प्रकारच्या नवीन, संमिश्र अशा भावना, बळवान व जोरदार भावना उत्पन्न झाल्याशिवाय राहणार नाहीत.
त्याचप्रमाणे जे विराट जीवन. सर्वांना मोकळे आहे, त्या जीवनातील साध्या व सरळ भावना, त्यासंबंधींचाही कलाविषय संकुचित न वाटता विस्तृत व विशालच होत आहे असे दिसून येईल. आपल्या पूर्वीच्या कलेत काही अपवादात्मक सुखस्थितीत असणा-या लोकांच्याच भावना प्रकट केल्या जात असत व त्या प्रकट करण्यातही कृत्रिमता व दुर्बोधता मुद्दाम राखण्यात येत; कारण त्या गूढ रीतीने प्रकट करण्यातच सारी मौज आहे असे कलाशास्त्र सांगत असे. त्या पूर्वीच्या कलेत लोककलेचा अनंत प्रांत व मुलांच्या कलेचा प्रांत अजिबात वगळला गेला होता. विनोद, गंमती, कोडी, म्हणी, ओखाणे, गीते, गर्भे, नाच, मुलांचे खेळ, नकला इत्यादि विषय भारदस्त नाहीत, ते कलेला योग्य नाहीत असे पूर्वी समजण्यात येत असे.