कला म्हणजे काय? 14
लॉर्ड केम्सहोम (१६९६ ते १७८२) यांच्या मतें जें सुखकर आहे तें सुंदर आहे. जे सुखवितें तें सौंदर्य होय. सौंदर्य म्हणजे रुचि. ख-या रुचीचें प्रमाण काय? ज्या रुचीत-ज्या सुखद अनुभूतीत-थोडया वेळात बहुविध भावनांचा अनुभव मिळतो, ती खरी रुचि होय, ज्या अनुभवांत जोर आहे, विविधता आहे, विपुलता आहे व सर्वांगीणपणा आहे, ती रुचि होय. कलेचा उत्कृष्ट नमुना तो ज्याच्यामुळे असा अनुभव येतो.
बर्क (१७२९ ते १७९७) : याने ''भव्य व सुंदर ह्यांच्या संबंधीच्या ज्या कल्पना-त्यांच्या उत्पत्तिसंबंधी शास्त्रीय मीमांसा'' असे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकात तो म्हणतो भव्य व सुंदर निर्माण करणे हा कलेचा हेतू आहे. आत्मसंरक्षण व समाज या दोन कल्पनांतून भव्य व सुंदर यांच्या कल्पना निघाला आहेत. मळांशी जाऊन पाहता असे दिसून येईल की व्यक्तिद्वारा जाति कायम रहावी ह्यासाठी कला हे साधन उत्पन्न झाले. भव्य व सुंदर ह्यांच्या कल्पना जातिसाति त्यांची साधने आहेत. अग्न, किल्लेकोट, लडाया इत्यादींनी आत्मसंरक्षण होते; संभोग, परस्पर सहकार्य व प्रसार यांमुळे समाज टिकतो. स्वसंरक्षणार्थ जे झगडे होतात त्यातून भव्यतेच्या कल्पना निघतात व परस्पर सहकार्य, संभोग रतिभाव ह्यांतून सौंदर्याची निर्मिती. होते.
१८ व्या शतकातील इंग्लंडममध्ये कलेच्या व सौंदर्याच्या ह्या अशा व्याख्या आहेत.
ह्याच काळात फ्रान्समध्ये पेरीअँड्री, बॅटो, डिडरो, डी आल्म्बर्ट आणि व्हाल्टेअर हेही येतात.
पेरी अँड्री (१७४१) : याच्या मते, सौंदर्य हे तीन प्रकारचे असते. दैवी सौंदर्य, सहज सौंदर्य व कृत्रिम सौंदर्य.
बॅटो (१७१३-१७८०) हा म्हणतो, ''सृष्टिसौंदर्याचे अनुकरण करणे म्हणजे कला होय. आनंद देणे हा कलेचा हेतु.'' डिडरोचेही असेच मत आहे.
सुंदर काय हे आपली रुचि ठरविते - असे इंग्रज पंडितांप्रमाणेच फ्रेंच पंडितांचेही म्हणणे आहे. रुचीचे नियम ठरविता येणार नाहीत. रुचीचे वैचित्र्यच रहाणार-असे ते कबूल करतात. डी आल्म्बर्ट व व्हाल्टेअर ह्यांची मते याच प्रकारची आहेत.
याच काळातील इटॅलियन सौंदर्यसमीक्षक पॅगेनो याचे म्हणणे असे की, ''सृष्टीत सर्वत्र विखुरलेले जे र्सांदर्य आहे, ते एकत्र करणे हे कलेचे काम आहे. सृष्टीतील हे सौंदर्य पाहण्याची शक्ती म्हणजेच रुचि. सृष्टीतील हे विखुरलेले सौंदर्य एकत्र आणून ते एकेठायी संपूर्णपणे प्रगट करणे म्हणजे कलाप्रतिभा. सौंदर्य हे साधुत्वासह सदैव असते. किंबहुना दृश्य साधुता-प्रगट साधुता म्हणजेच सौंदर्य. सौंदर्य म्हणजे मूर्त शिवत्व. साधुता म्हणजे आंतर सौंदर्य व सौंदर्य म्हणजे बहि:साधुता.''
दुस-या इटॅलियन पंडितांचे म्हणणे बर्कसारखे आहे. मुरेटोरी व विशेष करून स्पेलेटी हे बर्कपंथी आहेत. समाजसातत्य व आत्मरक्षा यांची जी इच्छा त्या इच्छेंतून उत्पन्न होणा-या ज्या अहंभावयुक्त संवेदना त्या म्हणजे कला होय.
डच लेखकांत ह्या काळात हेम्स्टरहुइस हा प्रमुख आहे. जर्मन सौंदर्य-मीमांसकांवर-विशेषत: गटेवर-याच्या मतांचा परिणाम झाला आहे. तो म्हणतो, ''ज्याने पुष्कळ सुख मिळते ते र्सांदर्य होय. अत्यंत थोडया अवकाशात जे जास्तीत जास्त संवेदना देऊ शकते, तेच पुष्कळ सुखही देऊ शकते. सौंदर्याचा उपभोग ही मनुष्याला मिळणारी सर्वांत मोठी अनुभूति होय. सौंदयोंपभोगांतच थोडक्या कालावधीत अधिकांत अधिक संवेदना मनुष्यास अनुभवता येतात.''