कला म्हणजे काय? 9
पुरातन धर्मांतील गोष्टींसंबंधीं जशी दशा असते, तशीच स्थिति आज सौंदर्याच्या कल्पनेबद्दलहि झाली आहे. सौंदर्य हा शब्द सर्वांना समजतो, त्यांतील अभिप्रेत अर्थ सर्वांना कळतो, असें गृहीतच धरण्यांत येत असतें. परंतु खरी वस्तुस्थिति अशी आहे कीं आज हया घटकेपर्यंत तरि निदान हया शब्दाचा अर्थ कोणालाहि समजलेला नाहीं. अद्याप पावेतों हया शब्दाचा अर्थ निश्चित झालेला नाहीं. सौंदर्यमीमांसेवर गेल्या शें दीडशें वर्षांत पुस्तकांचे पर्वत रचिले गेले. परंतु तरीहि अजून सौंदर्य म्हणजे काय हा प्रश्न अनिर्णीत व अनिश्चित असाच आहे. हा प्रश्न अद्याप सुटला नाहीं. १७५० सालीं बामगर्टन यानें अर्वाचीन सौंदर्यशास्त्राचा पाया घातला. तेव्हांपासून मोठमोठे रथी, अतिरथी, महारथी हया विषयावर लिहीत आहेत. तथापि स्थिति आहे तीच आहे. लिहिल्या जाणा-या प्रत्येक नवीन ग्रंथांत सौंदर्याची नवीनच व्याख्या दिलेली दिसून येते. अगदीं अलीकडचें मी वाचलेलें पुस्तक म्हणजे जुलियस मिथाल्टर हयाचें होय. हें पुस्तक लहानसेंच आहे, परंतु बरें आहे. हया पुस्तकाचें नांव “सौंदर्याचें कोडें ” असें आहे. सौंदर्य म्हणजे काय-हया प्रश्नाची आजची स्थिति काय आहे-तें हया पुस्तकाच्या नांवावरुनच दिसून येईल. दीडशें वर्षे मोठमोठे गाढे पंडित चर्चा करीत आहेत, विचार करीत आहेत. तरीहि सौंदर्य म्हणजे काय-हें अद्याप कोडेंच राहिलें आहे. जर्मन पंडित ते आपल्या पध्दतीनुरुप उत्तर देत असतात. त्यांच्यांतहि पुन्हां शंभर प्रकार असतातच, इंग्लंडमधील सौंदर्यमीमांसक हे विशेषत: शारीरसौंदर्यपंथी आहेत. हर्बर्ट स्पेन्सर, ग्रँट ऍलन व यांच्या संप्रदायांतील इतर जरी बाहय सौंदर्यावर भर देतात तरी आपआपल्यापरी त्यांच्यांत मतभेद आहेतच. गायो, टेन व त्यांचे फ्रेंच अनुयायी हे तिसरेंच लिहितात. आणि हया लोकांना त्यांच्या पूर्वी होऊन गेलेल्या अनेक लेखकांची उत्तरें पुन्हां माहीत होतींच ! बामगर्टन, काँट शलिंग, शिलर, फिक्टे, विंकेलमन, लेसिंग, हेगेल, शौपेनहार, हार्टमन, शास्लर कोझिन, लेव्हेक व इतर शेंकडों विचारवंतांचीं उत्तरें अर्वाचीनांस माहीत असूनहि पुन्हां हा गोंधळच दिसून येत आहे !
विचार केल्याशिवाय बोलणा-यांना सौंदर्यशब्द व त्यांतील अर्थ म्हणजे सोपी व सरळ गोष्ट वाटते. परंतु हया शब्दाची व्याख्या करुं गेलें असतां गेल्या दीडशें वर्षातील नाना देशांतील व नाना पंथांतील अनेक तत्त्वज्ञान्यांनी चर्चा करुनहि कांही प्रकाश पडला आहे असें दिसत नाहीं. असा हा विलक्षण शब्द आहे. असे आहे, कोणता अर्थ सामावून राहिला आहे ? ज्या सौंदर्यावर कलेचें अस्तित्व अवलंबून आहे, तें सौदर्य म्हणजे काय ?
रशियन भाषेंत कॅसोटा हा सौंदर्यवाचक शब्द आहे. या शब्दाचा अर्थ पाहूं गेलें असतां “जें दृष्टीला सुखवितें तें ” असा आहे. अलीकडे रशियन भाषेंत ‘कुरुप नृत्य’ ‘सुंदर संगीत’ असे शब्दप्रयोग जरी करण्यांत येत असतात, तरी ते कानाला बरे वाटत नाहींत; अभिजात व ख-या रशियन भाषेला ते प्रयोग साजेसे आहेत असें वाटत नाही. परदेशीय भाषा ज्याला अवगत नाहींत, असा एखादा सामान्य रशियन मनुष्य घ्या. ज्यानें आपलें शेवटचें उरलेलें अंगावरचें वस्त्रहि दुस-याला दिलें, त्यानें मोठें सुंदर वर्तन केलें, किंवा ज्यानें दुस-याला लुबाडिलें त्याचें वर्तन फार कुरुप होतें, किंवा एकाद्यानें गाणें म्हटलें तें फार सुंदर होतें-हे वाक्यप्रचार त्या साध्या रशियन माणसास समजणार नाहीत. जें डोळयांना आनंदवितें, सुखवितें, तें सुंदर एवढेंच त्याला माहीत असतें.
रशियन भाषेत अमुक एक कृत्य उदार आहे म्हणून चांगलें किंवा अमुक कृत्य अनुदार आहे म्हणून वाईट असें म्हटलें जाईल. संगीत हें आनंद देणारें म्हणून चांगले किंवा आनंद न देणारें म्हणून वाईट असें म्हटलें जाईल. परंतु हें संगीत कुरुप आहे व हे संगीत सुरुप आहे, हे कृत्य सुंदर व हे कृत्य सुंदर नाही अशी भाषा वापरण्यात येणार नाही.