कला म्हणजे काय? 28
प्रकरण पाचवे
(सौंदर्यावर न उभारलेल्या अशा कलेच्या व्याख्या; टॉलस्टॉयची व्याख्या; कलेची व्याप्ति, तिचे महत्त्व व आवश्यकता; कलेतील सदसताचा पूर्वीच्या लोकांनी, प्राचीनांनी कसा निवाडा केला.)
सौंदर्याच्या कल्पनेमुळे सारा घोंटाळा झाला. ती सौंदर्याची कल्पना बाजूला करून कला म्हणजे काय ते पाहू या. सौंदर्याची कल्पना वगळून कलेच्या अत्यंत व्यापक अशा नवीन व्याख्या पुढीलप्रमाणे आहेत.
(१) (अ) कला हा व्यापार सर्व प्राणिमात्रांत दिसून येतो. संभोगेच्छा व क्रीडोत्सुकता यातून कला निर्माण झाली आहे. (शिलर, डार्विन्, स्पेन्सर).
(ब) या व्यापारांत आपल्या मज्जातंतूस एक प्रकारचे सुखावह उत्तेजन मिळत असते. (ग्रँड ऍलन)
ही व्याख्या उत्क्रांतीवाद व शरीरशास्त्र यांवर उभारली आहे.
(२) मानवाला ज्या भावनांचा अनुभव येतो, त्या भावना रेखा, रंग, हावभाव, ध्वनि, शब्द इत्यादींच्या साहाय्याने बाहेर प्रकट करणे म्हणजे कला होय (व्हेरॉन).
ही प्रायोगिक व्याख्या आहे. आणि सर्वात अलीकडची म्हणजे सलीची व्याख्या पुढीलप्रमाणे आहेः
(३) चिरंतन वस्तु निर्माण करणारी किंवा एखाद्या घडणा-या कृत्याची प्रतिकृती करणारी, श्रोत्याला किंवा प्रेक्षकाला निर्हेतुक सुखसंवेदना देणारी व ते कर्म होत असतां, ती कृति निर्माण होत असतां स्वतः कलावानाचा सुध्दा अभूतपूर्व आनंद देणारी ती कला होय.
सौंदर्यावलंबी आणि गूढ व आध्यात्मिक अशा कलेच्या व्याख्यापेक्षा या वरील व्याख्या जरी निःसंशय श्रेष्ठ असल्या, तरी त्या अगदी बरोबर आहेत असे नाही. या व्याख्याहि सदोषच आहेत. पहिली उत्क्रांतितत्त्वावर व शरीरज्ञानावर उभारलेली जी व्याख्या, ती कलेचा उगम शोधते, परंतु कलेच्या व्यापारासंबंधी ती काहीच बोलत नाही. यासाठी ही व्याख्या बरोबर नाही, मुद्देसूद नाही. आपणास कलेचा उगम शोधावयाचा नसून तिचा व्यापार पहावयाचा आहे.
दुसरी ऍलनची व्याख्या. मानवी शरीरावर जो परिणाम होतो, त्यावर तो उभारलेली आहे. परंतु ही व्याख्याही बरोबर नाही. ही व्याख्या अतिव्याप्त आहे. या व्याख्येच्या कक्षेत इतरही मानवी व्यापार येऊ शकतील. मज्जातंतूस सुखावह व उत्तेजन देणारे दुसरेही कलाभिन्न प्रकार असू शकतील. ज्याप्रमाणे सुंदर कपडे करणे, अत्तरें तेले निर्माण करणे, एवढेच नव्हे तर सुंदर खाद्यपेये निर्माण करणे या गोष्टींचा कलेत काही पंडित अंतर्भाव करीतात, तसेच ऍलनच्या व्याख्येच्या बाबतीतही होण्याचा संभव आहे.
भावप्रदर्शन म्हणजे कला ही व्हेरॉनची व्याख्याही सदोष आहे. कारण एखादा मनुष्य स्वतःच्या भावना रेखा, रंग, हावभाव, ध्वनि, शब्द इत्यादीच्या द्वारा प्रकट करील, परंतु त्याच्या दुस-यावर परिणाम होईलच असे नाही; त्या भावना दुस-यांच्या हृदयांतही उचंबळतीलच असे काही नाही. असे जे परिणामहीन, दुस-याच्या हृदयाला स्पर्श न करणारे भावनाविष्करण - त्याला कला म्हणून मानता येणार नाही.
सलीची व्याख्याही अतिव्याप्तीच्या दोषाने दूषित झालेली आहे. वस्तु किंवा कृति निर्माण करण्यात कर्त्याला, त्याचप्रमाणे अनेक श्रोत्यांना व प्रेक्षकांना निर्हेतुक असा आनंद झाला पाहिजे असे तो म्हणतो. परंतु जादुगाराच्या नकला किंवा शक्तीचे खेळ किंवा असेलच इतर प्रकार ह्यांनीही ते करणा-याला व पाहणा-याला निर्हेतुक सुख संवेदना प्राप्त होतील. परंतु ह्या व्यापारांना कलात्मक व्यापार असे म्हणता येणार नाही. शिवाय अशा पुष्कळ गोष्टी आहेत की ज्याच्या निर्मितीने निर्माणकर्त्यास किंवा पाहणा-यास सुख होत नसते, तरीही त्या निर्मितीस आपण कला म्हणून संबोधितो. उदाहरणार्थ, काव्यांतील निराशेने भरलेले व हृदयास पाझर फोडणारे प्रसंग त्यांनी सुखसंवेदना होत नसते - तरी ते कलात्मक आहेत असे म्हणता येणे शक्य असते.