कला म्हणजे काय? 130
''तुम्ही जर गंभीरपणे विचार कराल तर तुम्हाला असे दिसून येईल की आजच्या या दुर्दैवी व दु:खी जगाला सर्वांत भयंकर असा जर कोणता शाप भोवत असेल तर तो आजच्या बडबडया मूर्ख लोकांचा होय. भूतकाळातील थोर थोर लोकांची वाणी यांच्या कोलाहलामुळे मुळीच ऐकू येत नाही. प्राचीन ऋषिमुनींची ती धीरगंभीरवाणी, जीवनाला कृतार्थ करणारी ती संतवाणी या काकांच्या कलकलाटापुढे ऐकू येईल तर शपथ. फार त्रास झाला आहे या लोकांचा. साडेसातीच जणू आली आहे जगाला. छापण्याची कला निघाली, त्यामुळे हे सारे सोपे झाले आहे. या पोकळ पंडितांना आपण कांही तरी छापून प्रसिध्द करावे असे वाटते व त्यांना ते सहज करता येते. छापून निघणे म्हणजे स्वर्ग असे त्यांना वाटते. त्यात त्यांच्या अहंकाराचे तपण होते, समाधान होते. एक काळ असा होता की वाचनीय असे एक पुस्तक लिहावयास एक वर्ष तरी लागत असे. त्या काळात पुस्तकांची निवड करण्याची जरूर पडत नसे. परंतु आज एका आठवडयांतच अनेक ग्रंथ लिहून काढतात, एवढेच नव्हे तर त्यावर गबर होतात! या ओठावरच्या पोकळ शब्दांनी, तोंडातील या फेसाने या लोकांची पोटेही चांगली भरतात, चैन करायलाही त्यांना मिळते. आपल्या भिकार पुस्तकांनी जनतेत असत्य व खोटया कल्पना यांचे पीक भरपूर येत असते. जिकडेतिकडे घाणीचा बुजबुजाट झाला आहे. ज्याप्रमाणे एखाद्या झाडावर किडेच किडे होतात तसे समाजवृक्षावर हे असत्याचे किडे भरभरून राहिले आहेत. म्हणून आज आपले पहिले काम आहे ते हे की या सा-या कच-यातून, या सर्व मूर्ख बडबडीतून जी थोडी सुंदर पुस्तके असतील, जी कांही थोडी दैवी वाणी असेल, ती निवडून अलग करावयाची. हृदयस्थ आत्मारामाने, हृदयस्त रामराजाने हे काम आधी केले पाहिजे.''
रस्किन - पत्र ८१
गेल्या वर्षी माझ्या एका मित्राने मला एक जर्मन कादंबरी आणून दिली. ज्या मित्राने ती कादंबरी मला दिली, त्याची रुचि बिघडलेली नाही असा मला भरंवसा होता. वदनेरवार ही ती कादंबरी होय. व्हॉन पॉलेंझ हा त्या कादंबरीचा कर्ता. ही कादंबरी १८९५ मध्ये प्रसिध्द झाली आहे. दोन तीन वर्षे होऊन गेली तरी फारशी कोणाला ती माहीत नाही. तिचा बोलबाला फार झालेला नाही.
ही कादंबरी नकली कलेचा नमुना नाही. आजकाल पैसापासरी पैदा होणा-या कादंबरीपैकी ही नाही. ही एक खरी कलाकृती आहे. ग्रंथ लिहिण्याची पध्दती, ग्रंथरचनेचे शास्त्र इत्यादि वाचून मग एखाद्याने ग्रंथ लिहावा, तशा स्वरूपाची ही कादंबरी नाही. नाना लोकांची, नाना प्रसंगांची वर्णने मुद्दाम ओढूनताणून एकत्र आणणे, ज्यांत ना रस, ना भावना, ना हृदय, ना आंतडे... अशा प्रकारची ही कादंबरी नाही. किंवा एखाद्या विषयावर ठरीव पध्दतीने लिहिलेले नाटक किंवा लिहिलेली कथा तसेही या पुस्तकाचे नाही. किंवा दुर्बोधि कलेचा नमुना असेही या कादंबरीचे स्वरूप नाही. आजकाल जी पुस्तके समजणार नाहीत तीच मोठी कलात्मक असा एक समज आहे. अनेकांना दुर्बोध लिहिण्याचा नाद आहे. वेडयाच्या विसंगत वाणीतून, वातांतील माणसाच्या तुटक तुटक उद्गारांतून ज्याप्रमाणे अर्थ शोधावा लागतो, आणि किती डोके खाजविले तरी शेवटी त्यांतून बोध होत नाही, तशा या दुर्बोध कला असतात. परंतु ही प्रस्तुत कादंबरी तशा प्रकारची नाही.