कला म्हणजे काय? 95
एका धर्मोपदेशकाने म्हटले आहे की, मनुष्य देव ओळखीत नाही हे मोठेसे पाप नाही; परंतु देवाच्या ऐवजी जे देव नाही त्याची उभारणी करून त्याला तो भजतो हे फार वाईट आहे. कलेच्याही बाबतीत हेच लागू आहे. आजच्या वरच्या वर्गातील लोकांचे सर्वांत मोठे दुर्दैव, ते धर्महीन कलेवाचून आहेत हे नसून, अत्यंत क्षुद्र, हीन व पतित अशा कलेलाच पसंत करून तिची त्यांनी पूजा चालविली आहे हे होय. जी कला विशिष्ट वर्गांनाच रिझविण्यासाठी व सुखविण्यासाठी जन्मलेली असते. ख्रिस्ताच्या शिकवणीप्रमाणे सर्वसंग्राहक, सर्व मानवांत बंधुत्व निर्माण करणारी अशी नसून जी संकुचित व काहीजणांचाच विचार करणारी असते, अशा कलेला त्यांनी सत्कलेच्या सिंहासनावर बसविले आहे. जीवनाला सुधारण्यासाठी ज्या ख-या धार्मिक कलेची जरूर असते तिला दूर ढकलून तिची उणीव भासू नये म्हणून या असत्कलेलाच देवता समजून तिच्या भजनपूजनांत ते दंग होऊन राहिले आहेत.
आजच्या काळातील धर्मभावनांची भूक प्राचीन काळांतील धर्मकला भागवू शकणार नाही हे खरे. म्हणून प्राचीन धर्मकलेपेक्षा आजची धर्मकला ही निराळीच असणार. परंतु ही विभिन्नता असली तरी, जो मुद्दाम आंधळा झालेला नाही, ज्याने जाणून बुजून डोळे मिटून घेतले नाहीत, जो हेतुपुरस्सर स्वत:पासून सत्य दूर राखू इच्छित नाही, लपवू पहात नाही, त्याला आजच्या धर्ममय कलेचे रूप काय हे स्पष्ट व निश्चित असे दिसून आल्याशिवाय राहणार नाही. प्राचीन काळांतील परमोच्च धर्मकल्पना काही मानवसंघाचेच ऐक्य व बंधुत्व बघे. ज्यू, अथिनियन, रोमन हे लोकसमुदाय जरी मोठे होते, तरी सर्व मानवजातीच्या मानाने ते लहान लहानच होते. मानवजातीतील लहानशा अंशाला, लहानशा भागाला पाहणारी जी कला ती त्या तेवढयाच भागाचे महत्त्व मांडी; त्या त्या विशिष्ट अंशाचेच वैभव रंगवी, श्रेष्ठत्व स्थापी, ऐक्य निमी. स्वत:च्या विशिष्ट समुदायाचेच स्तोत्र ती कला गात बसे. स्वत:च्या समाजाची शक्ती, स्वत:च्या समाजाचे भाग्य, स्वत:च्या समाजाची संस्कृती-याचेच चित्र ती कला रंगवीत बसे. ज्या व्यक्तींनी त्या विशिष्ट समाजाच्या भरभराटीसाठी, वैभवासाठी प्रयत्न केले असतील, त्या व्यक्ती म्हणजे त्या कलेचे आदर्श पुरुष. मुलायसिस्, जॅकोब, डेव्हिड सॅम्सन, हरक्युलिस व असेच दुसरे वीर कलेकडून रंगविले जात. काव्य यांना वर्णी, चित्र यांना रेखी, शिल्प यांना खोदी, परंतु आजची दृष्टी एका विवक्षित मानवी समूहालाच व्यापून राहिली नाही. आजची धर्मदृष्टी सर्व मानवांचे ऐक्य पुकारीत आहे. पराक्रमापेक्षा प्रेमाला ती पहिले स्थान देत आहे. आजची धर्मदृष्टी ही अशी असल्यामुळे आजची धर्ममय कला प्राचीन कलेने ज्या भावना दिल्या तसल्याच भावना न देता त्याच्याहून निराळयाच भावना ती देईल.
खरी ख्रिश्चन कला अजून दृढमूल झाली नाही. ती आपला पाया रोवीत आहे, आपले सिंहासन स्थिर करीत आहे. ख्रिस्ताने दिलेला विचार म्हणजे मानवजातीने टाकलेले फार मोठे पाऊल होय; जी लहान लहान पावले टाकीत मानवीसमाज पुढे जात असतो, तशा मुंगीच्या पावलांसारखे ख्रिस्ताचे पाऊल नव्हते. ख्रिस्ताने दिलेला विचार क्रांती करणारा होता. आमूलाग्र फेर करणारा तो विचार होता. मानवीजीवनाची एकंदर दिशाच अजून त्याने बदलली नसली तरी शेवटी तो बदलणार हे निश्चित. या विचाराने जीवनाला निराळाच अर्थ मिळेल, नवीनच दृष्टी येईल, नवीनच सृष्टी दिसेल. हा विचार मानवजातीचे स्वरूप अंतर्बाह्य बदलून टाकील. मानवजातीचे जीवन व्यक्तीच्या जीवनाप्रमाणेच नियमबध्द असते. परंतु या नियमबध्द व सरळ मार्गात कधी कधी वळणे येतात. ज्या वळणाच्या ठिकाणी आपण अगदी निराळयाच दिशेने जाऊ लागतो, समोर जात होतो ते एकदम डाव्या किंवा उजव्या बाजूला वळतो व जाऊ लागतो. मानवजातीच्या मार्गातील ख्रिस्ताचा विचार हे एक मोठे वळण होते. ख्रिस्ताच्या शिकवणीप्रमाणे जगू इच्छिणा-यांना तरी ख्रिस्ताने दिलेला धर्म म्हणजे नवपथदर्शन होते असे वाटल्याशिवाय राहणार नाही. मानवी विचारांना, भावनांना ख्रिस्ताने निराळेच वळण दिले. कलेचे महत्त्व व कलेचे विषय यांत त्याने क्रांती केली. कलेचे स्वरूपच बदल टाकले. ग्रीक लोक इराणी कलेचा उपयोग करू शकले व रोमन लोक ग्रीक कलेला उचलते झाले. याचे कारण या सर्वांची जीवनाकडे पाहण्याची दृष्टी एकच होती. जो तो स्वत:च्या वैभवाचे स्तोत्र गात बसे. त्या त्या लोकांची कला त्या त्या लोकांचे माहात्म्य वर्णी. आज इराणी लोकांच्या वैभवाचे व भाग्याचे दिवस, उद्या ग्रीक लोकांची चलती, परवा रोमन लोकांची भाग्यरेषा उघडते. कलेला विवक्षित लोकांच्या भाग्याचे वर्णन करणे हाच एक विषय असे. एकाची कला दुस-या ठिकाणी जाई व त्यांची किर्ती गाई. परंतु ख्रिस्ताने दिलेल्या ध्येयामुळे सारेच गाडे बदलले; नवीनच सृष्टी, नवीनच दृष्टी, नवीनच प्रकार, नवीनच प्रकाश. ख्रिस्ताने सारी उलथापालथ केली. बायबलममध्ये म्हटल्याप्रमाणे ''ज्याची मनुष्य पूजा करीत आहेत, ते देवाघरी तुच्छ व त्याज्य मानले जात आहे''-हेच ख्रिस्ताने केले. आता ज्यू लोकांच्या किंवा रोमन साम्राज्याच्या वैभवाचे ध्येय नव्हते. आता ग्रीकांचे सौंदर्य हे जे ध्येय तेही राहिले नाही. फोनिशियन लोकांचे संपत्ती हे जे आराध्यदैवत तेही दूर केले गेले. साम्राज्य-सौंदर्य व संपत्ती या गोष्टी ख्रिस्तापूर्वी पूजिल्या जात होत्या; परंतु ही पूर्वीची ध्येये ख्रिस्ताने दूर केली. नम्रता, पावित्र्य, प्रेम, दया ही आता ध्येय झाली. श्रीमंत मनुष्य पूजिला जाण्याऐवजी दरिद्री पूजिला जाऊ लागला. डायव्हीसला मान नाही तर लॅझरसला मान. अमीरी लोभनीय व स्पृहणीय न राहता फकीरी स्पृहणीय वाटू लागली. आपल्या यौवनाने व लावण्याने मुसमुसणारी मेरी मॅग्डेलन ही आता ध्येय न राहता, अनुतापाने सुंदर दिसणारी मेरी मॅग्डेलन ही ध्येय झाली. धनार्जन करणा-यांचे कोणी कौतुक करीना, जो पदार्थ धनाचा होम करी त्याची स्तुती होऊ लागली. प्रासादांत राहणा-यांचे गोडवे कला गाईना. चंद्रमौळी झोपडीत, किंवा स्मशानांत राहणा-यांचे स्तवन करण्यात येऊ लागले. दुस-यावर सत्ता गाजविणारे चुलीत गेले. देवाशिवाय कोणाचीच सत्ता न मानणारे अशांचे दिवस आले. विजयाचे स्मारक म्हणून उभारलेला ज्यांत वीरांचे सुंदर पुतळे आहेत असा भव्य चर्च हे कलेचे ध्येय न राहता, जो प्रेमाने दिव्य झालेला आहे, सत्यासाठी जो छळला जात आहे, गांजला जात आहे, जाळला जात आहे, मारला जात आहे, आणि असे असूनही त्या छळणा-याचीं व गांजणा-यांची जो कीवच करीत आहे, त्यांनाही प्रेम देत आहे, मनात त्यांचे शुभ्र चिंतीत आहे, त्यांच्यासाठी देवाला प्रार्थीत आहे, असा जो महात्मा-तो कलेचे परमोच्च ध्येय झाला. असा आत्मा रंगविणे हे कलेचे परमभाग्य ठरले.