कला म्हणजे काय? 56
रस्सा व ढग
ती आवडती लहानगी मला वाढीत होती. बावळट कुठली. ती मला वाढीत होती, परंतु मी स्वयंपाकघराच्या उघडया खिडकीतून ईश्वर जी आश्चर्यकारक चलचित्रे निर्माण करीत होतो, ती पहात होतो. ज्या बाष्पाला स्पर्श करता येत नाही, अशा बाष्पांतून तो परमेश्वर आश्चर्ये निर्मीत होता, अपूर्व कृती तयार करीत होता. मी त्यांचे चिंतन करीत होतो. चिंतन करता करता मी स्वत:शीच म्हटले ''ह्या सा-या आभासमय आकृती, हे सारे चंचल ढगार, माझ्या लाडकीच्या डोळयांइतकेच हे सुंदर आहे. ही माझी बावळी, लहानगी चिमुरडी; हिरव्या निळया डोळयांची-होय, हिच्या डोळयांइतकेच ते वरचे ढगार सुंदर आहे. इतक्यांत माझ्या पाठीवर कुणीतरी जोराने बुक्की मारली असा भास झाला. एक थोडासा रागाचा परंतु गोड असा आवाज. जरा वातांत उच्चारल्यासारख्या ऐकू आला. तो आवाज जरा घोगरा झाला होता. कारण मद्य प्यायली होती ती. माझ्या त्या चिमुरडीचा, त्या लाडकीचाच तो आवाज होता. ती म्हणाली ''हे लवकर खाणार का त्या ढगांतरच रमणार? त्या ढगांशी ढवळाढवळ करणा-या, आटप ना रे चटकन्.''
वर दिलेले दोन गद्यकवितांचे मासले कितीही कृत्रिम असले तरी त्यांतून अर्थ काढता येईल. लेखकाला काय सांगावयाचे आहे त्याचा तर्क करता येईल. परंतु काही उतारे संपूर्णपणे कोडीच जणू आहेत. मला तरी त्यांचा शेंडाबुंधा काही समजत नाही. ''रंगेला निशाण मारणारा'' हा उतारा अशा अत्यंत दुर्बोधांपैकी एक आहे.
रंगेला निशाण मारणारा
गाडी जंगलातून जात होती. इतक्यात एकाएकी ती थांबविण्यास त्याने सांगितले. एका नेम मारण्याच्या ठिकाणी गाडी थांबली. ज्याला निशाण मारण्याचा खेळ खेळावयाचा असे, त्याच्यासाठी तेथे सोय होती. वेळ मारण्यासाठी काही गोळया माराव्या असे त्याला वाटले. हा राक्षस, नुसता खायला येणारा हा वेळ-हा कसा दवडावा? त्याला मारणे हा प्रत्येकाचा कायदेशीर धंदा आहे, प्रत्येकाचे रोजचे काम आहे. वेळ काहीतरी करून दवडलाच पाहिजे. त्या सरदाराने आपला बाहू आपल्या सुकुमार लाडकीच्या हातांत दिला-त्या अति दुष्टेच्या हातांत दिला. ती गूढ बाई-जिच्यामुळे त्याला सुखविलास मिळाले, दु:खभोगही भोगावे लागले,- त्याच्या बुध्दीचे श्रेयही पुष्कळसे तिलाच असेल, त्याच्या या निशाणबाजींतील कौशल्याचे श्रेयही तिलाच असेल.
त्याला ज्या ठिकाणी नेम मारावयाचा होता, तेथे गोळी लागेना. कितीतरी गोळया अशाच वाया गेल्या, लक्ष्यवेध होईना... एक गोळी वरच्या छतालाही लागली. ती रमणी नव-याच्या बावळटपणाला व मूर्खपणाला उपहासाने हसू लागली. तो एकदम तिच्याकडे वळला व म्हणाला ''ती बघ तेथे बाहुली आहे. तेथे उजव्या बाजूस आहे. त्या बाहुलीची मुद्रा बघ कशी गर्विष्ठ आहे. नाक वर करून ऐट दाखवीत आहे, मोठी तो-यांत आहे नाही? प्रिये! देवी! ती तू आहेस अशी मी कल्पना करतो.'' असे म्हणून त्याने डोळे मिटले. चाप ओढला गेला, गोळी सूं करीत गेली. बाहुलीचा सफा शिरच्छेद झाला.
त्याला सुखविणारी व रमविणारी ती दुष्ट लाडकी प्रिया, जिचा त्याला त्याग करता येत नव्हता, अशी ती त्याची निर्दय देवता, तिच्याकडे वळून, खाली वाकून तिच्या हाताचे चुंबन घेऊन, तो म्हणाला, ''प्रिये! लाडके! हे वल्लभे! माझ्यांत जे हे कौशल्य आहे, त्याबद्दल मी तुझे किती आभार मानू?''
आता बॉडलिअरइतकाच सुविख्यात व त्याच्याइतकाच दुर्बोध असा जो व्हर्लेन त्याच्याकडे जाऊ. ''विस्मृत गीते'' म्हणून त्याचा एक काव्यग्रंथ आहे. त्यातील पुढे दिलेली पहिलीच कविता पहा:-
''माळावरला वारा-त्याने आपला श्वासोच्छ्वास बंद केला होता.''
-फॅव्हर्ट
अपार आनंद, परंतु त्यामुळेच गळून गेल्यासारखे होत आहे. हा श्रम, हा थकवा विलासमय आहे. वा-याच्या झुळकांना आलिंगिलेल्या वनांचे हे थरथरणे आहे. काळयाभु-या वृक्षांसाठी हे कोमल गान आहे.