कला म्हणजे काय? 150
''असा आमच्या दोघांच्यामध्ये नको पुन्हा येऊ जा पुढे नाही तर रहा मागे... फेडका जरा रागाने त्या गरीब व गोड प्रोकाला म्हणाला. फेडका इतका भावनोन्मत झाला होता की तो निष्ठुरही झाला. तो क्षुब्ध झाला होता. परंतु सुखी होता. माझी दोन बोटे त्याने धरून ठेविली होती. आपल्या सुखांत कोणी व्यत्यय आणू नये, आम्हा दोघांत कोणी येऊ नये, म्हणून माझी बोटे त्याने पकडून ठेवली होती.
''हं पुढे सांगा ना आणखी. किती छान आहे गोष्ट...'' तो म्हणाला.
आम्ही जंगलावरून गेलो. आता जंगल मागे राहिले. आम्ही आता दुस-या बाजूने गावाकडे वळलो.
गावांतील दिवे दिसू लागताच मुले पुन्हा म्हणाली, ''आणखी एक चक्कर मारू या. येता का? पुन्हा हिंडू. इतक्यांत घरी कशाला?''
मुकाटयाने आम्ही चाललो होतो. बर्फाचा नुसता खच पडला होता व तो तुडवीत जावे लागत होते. या बाजूला रहदारी फारशी नसल्यामुळे बर्फ घट्ट झालेला नव्हता. ढोपर ढोपर बर्फमय चिखलातून आम्ही जात होता. आमच्या डोळयासमोर शुभ्र अंधार दिसत होता. अभ्रे खाली आली होती. जणू ते शुभ्र मेघ, आमच्या डोक्यावर कोणी रचिले होते. खाली शुभ्र बर्फ व वरती शुभ्र अभ्रे! शुभ्रत्वाला सीमा व अंत नव्हती. जिकडे तिकडे पांढरेच पांढरे. झाडांच्या उघडया बोडक्या डोक्यांवरून वारा गाणी गात होता, तो वारा दूर जंगलांत होता. तेथील तो आवाज होता. आम्ही ज्या ठिकाणी होतो तेथे सारे शांत होते.
एका शूर कॉकेशियनाची मी गोष्ट सांगितली. शेवटचा प्रसंग सांगितला. गोष्ट संपली. त्या कॉकेशियन वीराभोवती शत्रूचा गराडा पडलेला असतो. तो स्वत:च आपले मृत्यूगीत जणू म्हणतो व छातीत खंजीर खुपसून घेतो. शत्रूच्या हातून मरण्याऐवजी स्वत:च्या हातांनीच स्वत:ला मारतो. गोष्ट संपली, परंतु कोणी बोलेना.
''आजूबाजूला शत्रू उभे असताना त्याने गाणे का बरे म्हटले?'' सेमकाने विचारले.
''अरे तो मरणाची तयारी करीत होता असे नाही का त्यांनी सांगितले?'' फेडका जरा स्निग्ध व दु:खी स्वराने म्हणाला.
''मला वाटते की त्याने ती शेवटची प्रार्थना म्हटली असावी.'' प्रोंका म्हणाला.
प्रोंकाचे म्हणणे सर्वांना पटले. बरोबर प्रार्थनाच ती. फेडका एकदम थांबला व म्हणाला, ''तुमच्या आत्याचा कोणी गळा कापला होता. मागे तुम्ही ती हकीगत सांगितली होती. पुन्हा सांगा ना ते सारे.'' अंगावर शहारे आणणा-या आणखी गोष्टी त्याला पाहिजे होत्या. अजून त्याची तृप्ति झाली नव्हती. ''सांगा, तुमच्या आत्याचा तो खून कसा झाला, सांगा.'' तो पुन्हा म्हणाला.
मी ती भयंकर हकीकत पुन्हा एकदा सांगितली. माझ्याभोवती न बोलता ते तिघे उभे राहिले. माझ्या चर्येवरचे हावभाव ते पहात होते.
''आणि त्याला पकडले.'' - सेमकाने विचारले.