कला म्हणजे काय? 76
माझ्या एका स्नेह्याने कलावान व टीकाकार यांचा काय संबंध असतो हे थोडया थट्टेच्या स्वरांत, परंतु गंभीरपणे पुढील शब्दांत सांगितले होते. ''शहाण्या लोकांबद्दल मत देऊ पाहाणारे मूर्ख लोक म्हणजे टीकाकार होत.'' ही व्याख्या सदोष व अविनयी असली तरी तिच्यांत सत्य आहे. कलाकृतीचे विवरण करणारे, कलाकृतीचे स्वरूप समजून देणारे अशी टीकाकारांची व्याख्या करण्यापेक्षा वरीलप्रमाणे व्याख्या करणे हे अधिक योग्य व न्याय्य आहे. अनधिकारी माणसाने अधिकारी माणसावर टीका करणे ही टीकाकारासंबंधीची व्याख्या कितीतरी पटीने अधिक चांगली आहे.
''टीकाकार म्हणे विषद करतात!'' काय विषद करतात? कलावान जर खरा हाडाचा कलावान असेल तर स्वत: प्रबळपणाने जे त्याने अनुभवलेले असते ते तो आपल्या कृतीने देऊ पहात असतो. तेथे विषद करून काय सांगावयाचे आहे? जर कृती खरोखर सत्कृती असेल, तिच्यातील भावना व्यापक व धर्ममय असेल. तर ती समजून देण्यासाठी मधल्या दलालांची जरूर भासणार नाही. ती भावना लोकांना समजेल. थोर भावना सर्वांना समजते, सर्वांना तिचा अनुभव येतो. ही स्पष्टीकरणे व विषदीकरणे सारी फोल आहेत. परंतु जर कलाकृतीने दुस-यांच्या हृदयास स्पर्श होत नसेल तर कितीही उरस्फोड केली तर त्यांची तन्मयता कशी होणार? जी भावना लोकांना समजून सांगावी लागते, त्या भावनेने त्याचे हृदय उचंबळणार नाही. कलाकृतीचा व बहुजनसमाजाच्या हृदयाचा प्रत्यक्ष संबंध आला पाहिजे. तो संबंध जोडण्यास जेथे मधल्या दलालांची, या टीकाकारांची जरूर पडते, तेथे हृदय त्या कलाकृतीशी पूर्णपणे समरस होणार नाही हे उघड आहे. ख-या कलावानाच्या सत्कृतीचे विशदीकरण करावयाचे नसते. कलावानाला जे द्यावयाचे आहे ते त्याला शब्दांनी जर देता येण्यासारखे असते तर त्यानेच तसे केले असते. परंतु ते शब्दांनी न देता, तो कलेच्या द्वारा देतो; कारण ज्या भावनेचा त्याला अनुभव आला, तो आंतरिक अनुभव इतर कोणत्याही साधनाने तो देऊ शकत नाही. ती भावना कलाद्वाराच तो देऊ शकेल. कलाकृतीचे शब्दांनी विशदीकरण करावे लागणे, यावरून एकच गोष्ट सिध्द होईल की त्या विशदीकरण करणा-याचे हृदय त्या कलाकृतींतील भावनेने भारून गेले नाही, संस्पृष्ट झालेले नाही, ती भावना त्याच्या हृदयांत उसळत नाही, उचंबळत नाही. त्याचे हृदय त्या भावनेचा अंगीकार करावयास असमर्थ आहे. त्या भावनेचे तो योग्य पात्र नव्हे. त्या भावनाग्रहणास तो अपात्र आहे आणि खरोखरच अशी वस्तुस्थिती असते हे माझे म्हणणे कितीही विचित्र व आश्चर्यकारक वाटले तरी टीकाकार हे नेहमी अगदी साधारण असेच आढळतात. त्यांचे हृदय कलेच्या प्रवेशासाठी उघडे नसते. त्यांच्यावर कलेचा परिणाम अत्यंत अल्पच होऊ शकतो. हे टीकाकार चांगले समर्थ असे लेखक असतात, चांगले शिकलेसवरलेले असतात, हुशार असतात. परंतु भावनांनी उचंबळून जाण्याची त्यांची वृत्ती मरून गेलेली असते. ते थंड गोळे झालेले असतात. भावनांची ऊब बिलकुल त्यांच्याजवळ नसते. त्यांचे डोके प्रमाणाबाहेर वाढलेले असते व हृदयाचा संकोच होत होत ते नाहीसे होऊन गेलेले असते. टीकाकार हा स-शिर असतो. परंतु स-हृदय नसतो, या टीकाकारांच्या रूची विचित्र झालेल्या असतात. ज्यांतील अर्थ पटकन समजतो, ज्यांतील भावना पटकन हृदयाला जाऊन झोंबते ते त्यांना सामान्य व टाकाऊ वाटते; ते कृत्रिमतेचे भोक्ते झालेले असतात. हाडे फोडून फोडून त्यात रस मिळतो का हे पाहणारे असतात आणि हाडांत रस न मिळाला तरी हाडे फोडताना जे बौध्दिक श्रम झाले, त्यांतच ते आनंद मानतात. हाच कलेने दिलेला आनंद असे त्यांना वाटते. असे हे बिघडलेल्या चवीचे टीकाकार, त्यांच्यावर समाज विश्वास टाकतो, त्यांची मते वाचीत असतो. बहुजनसमाजाची रूची बिघडविण्यास हेच मुख्यत: कारणीभूत होतात. बहुजनसमाजाला पदच्युत करण्याचे पाप आजपर्यंत ह्यांनीच केले व आजही करीत आहेत.
ज्या समाजात कलेचे दोन प्रवाह नाहीत, जेथे ज्येष्ठांची, या वरच्या शिष्टांची निराळी म्हणून कला नाही, जेथे सर्व समाजाची अशी एकच कला असते, अशा समाजात असल्या लुडबुडया-कुडबुडया टीकाकारांची जरूरच नसते. तेथे जरूर भासणारच नाही, असणारच नाही. कारण सर्व समाजास अवगमनीय व अनुभवनीय अशी जी धर्ममय दृष्टी, सर्व समाजाच्या हृदयाचा पटकन ठाव घेईल अशी जी थोर भावना, तिच्यावरच त्या समाजातील कला उभारलेली असते. आपापल्या कालांतील धर्ममय भावना विचारांत न घेणारे जे वरचे अहंमन्य व सुखासीन लोक, त्यांच्या कलेवरच टीका पोसली जात असते. ह्या असल्या अभद्र, असंग्राहक, दुर्बोध व कृत्रिम कलेसाठीच टीका जन्म घेत असते.