कला म्हणजे काय? 91
वरील तीन गुणांतील एकाचाही जर अभाव असेल तर तो कृती ख-या कलेच्या प्रांतात येणार नाही. ती कृती दांभिक व वरपांगी कलेत जाईल. कलावानाची स्वत:ची विशिष्ट भावना जर त्याच्या कलाकृतींत नसेल, जर ती स्वच्छ व विशद अशा रीतीने मांडलेली नसेल, त्याच्या स्वत:च्या आंतरिक आवश्यकतेमुळे जर ती प्रकट झालेली नसेल तर ती कृती खरी कलाकृती नव्हे. परंतु हे तिन्ही गुण थोडया प्रमाणात का होईना जर असतील, तर ती कृती-दुबळी व रोडकी कृती खरी कलाकृती म्हणून संबोधली जाईल. ख-या कलेच्या प्रांतांत जावयास तिला परवाना मिळेल. शेकडा ३० गुण मिळवून का होईना पण ती तेथे जाईल.
अमुक एक कृति कलाकृती आहे हे ठरविण्याला वरील तीन गुणांचे साहचर्य पाहिजे. या तीन गुणांचे अस्तित्व वा अभाव याच्यावर कृतीचे कलात्व किंवा अकलात्व हे अवलंबून आहे. भावनेची विशिष्टता, भावनेची असंदिग्धता व भावनेतील उत्कटता, हे गुण कलाकृतीची कलात्मकता ठरवीत असतात. अर्थात् विषय कोणता आहे हे सध्या आपण बाजूला ठेवले आहे. ती उत्कट भावना धार्मिक व कल्याणमय जीवनास उपयोगी आहे की अपायकारक आहे ते निराळे. परंतु आधी एवढे तर पाहूया की जी भावना देण्यांत येत आहे, ती उलट आहे, स्पष्ट आहे व स्वयंभू आहे. या तीन गुणांचे प्रमाण ज्या मानाने असेल त्या मानाने ती कृती श्रेष्ठ वा हीन ठरेल. हे तीन गुण सारख्याच प्रमाणात नसतील. एखाद्या कलाकृतीत तळमळ अधिक असेल, तर एखाद्या कलाकृतीत स्पष्टता अधिक असेल, कोठे भावनेची स्वतंत्रता व विशिष्टता हीच अधिक डोळयांत भरतील. या तीन गुणांच्या निरनिराळया प्रमाणांतील मिश्रणाने निरनिराळया प्रकारचे श्रेष्ठत्व असेल. ज्या कृतींत हे तिन्ही गुण उत्कृष्टपणे दिसून येतील ती सर्वश्रेष्ठ कला होय.
याप्रमाणे कला ही अकलेपासून निवडली जाईल. या गुणांच्या साधनाने खरी कला कृत्रिम व सोंगाडया कलेपासून वेगळी करता येईल. भावना ज्या मिळतील त्या शुभ आहेत का अशुभ आहेत, उदात्त आहेत का ओंगळ आहेत ते लक्षात न घेता या वरील प्रकाराने जे कलात्मक आहे ते, जे कलात्मक नाही त्याच्यापासून, निवडून काढता येईल.
हे भावनांसंबंधी झाले. परंतु कलाकृतीत जो विषय असेल त्यासंबंधी काय? भावना सत् आहे की असत् आहे हे विषयावरून ठरेल. कला ही सत् का असत् हे केवळ भावनेवरून ठरवता येणार नाही. भावनेवरून कला खरी की खोटी हे ठरविले. आता सत् का असत् हे विषयावरून ठरविले पाहिजे. ते कसे ठरवावयाचे? सत् कशाला म्हणावे व असत् कशाला म्हणावे?