कला म्हणजे काय? 66
आजच्या कलाकृती लोकांना समजत नाहीत, कारण त्या समजण्याची त्यांची कुवतच नाही, असे लोक म्हणतात. परंतु सर्व लोकांना चटका लावणे, आपण ज्या भावना अनुभविल्या त्या सर्वांच्या अनुभवास आणून देणे, ज्या भावनेने आपले हृदय हलले, त्या भावनेने सर्वांचे हृदय हलविणे हे जर कलावानांचे ध्येय असेल, यासाठी जर कला हे साधन तो वापरीत असेल, तर ''माझी कला लोकांना समजत नाही, त्यांना अक्कल नाही'' वगैरे बोलता तरी कसे येईल?
एक सामान्य मनुष्य एखादे पुस्तक वाचतो, चित्र पाहतो, संगीत ऐकतो, नाटक देखतो-आणि त्याच्या हृदयावर काही परिणाम होत नाही. ''नालायक आहेस तू अडाणी आडमुठया आहेस'' असे त्याला सांगण्यात येते. एखादे प्रदर्शन पहावयास लोकांना आत सोडण्यात येते, येथे काय पहावयाचे हेच त्यांना समजत नाही, केसांचे पिवळे रंग, जिकडे तिकडे ठिपके-यांचा अर्थ काय त्यांना कळत नाही. ''ही चित्रे पहावयास लागणारी दृष्टी तुमच्याजवळ नाही. ''चला, निघा गांवढळ कुठले''-असे त्यांना हिणवण्यात येते, परंतु आपणांजवळ दृष्टी आहे ही गोष्ट त्या माणसांना माहीत असते. तारे, पाने, फुले व मुले पाहून त्यांना आनंद होत असतो. हे कलावान् त्या माणसांना जे दाखवू पहात होते, ते जर त्यांना पहातां येत नसेल, तर त्यांतील इत्यर्थ हाच की ज्यांनी त्यांना काहीतरी दाखविण्यासाठी म्हणून आत नेले. त्यांनी त्या माणसांना फसविले काही कलाकृतींचा परिणाम ज्याला अनुभवता येतो, काही कलाकृती ज्याच्या हृदयाला हलवितात, आपणांस पहावयाची दृष्टी आहे हे ज्याला माहीत आहे, अशा माणसाने ज्यांच्या कलाकृती रिझवीत नाहीत, भावना देत नाहीत, त्यांना जर फसव्ये व लफंग्ये म्हटले तर ते वाजवीच आहे. माझ्या कलेचा ह्या माणसावर परिणाम होत नाही; कारण हा टोणप्या आहे. असे म्हणण्यात अहंकार व घमेंड तर आहेच-परंतु खरी वस्तुस्थिती मात्र उलट असते. टोणपा तो प्रेक्षक नसून तू कलावान मात्र टोणप्या आहेस. तो मूर्ख नसून तू मात्र शंख आहेस; तू रोगट व विकृत आहेस; तो निरामय व शाबूत आहे.
व्हाल्टेअरने म्हटले आहे. ''कंटाळवाणी भाषाशैली नको; बाकी मग सा-या चांगल्या आहेत.'' परंतु कलेच्या बाबतीत तर अधिकच अधिकाराने असे सांगता येईल की ''कोणतीही कला चालेल, परंतु न समजणारी दुर्बोध कला नको.'' ज्या हेतूस्तव वस्तू निर्माण करावयाची, तो हेतूच जर तिने साध्य होत नसेल, तर त्या वस्तूची काय मातब्बरी, काय हिंमत?
आणि एक गोष्ट तर आधी लक्षात ठेवा, ज्याचे मन नीट आहे, हृदय शाबूत आहे अशा माणसाला जी कला समजत नाही, ती कलाच आहे असे जर म्हणाल, तर मग विकृत रूचीचे कोणीही उठतील व आपल्या विकृत भावना दाखविणा-या व फक्त स्वत:लाच समजणा-या कलाकृती निर्माण करतील व स्वत:च गुदगुल्या अनुभवतील. ज्याप्रमाणे आज दुर्बोध पध्दतीवाले करीत आहेत, त्याप्रमाणेच सारे करू लागतील व जे जे ते निर्माण करतील, त्याला कला म्हणून नावाजतील.
एका मोठया वर्तुळावरती उत्तरोत्तर अधिकाधिक लहान लहान वर्तुळे रचीत जावे आणि मग शेवटचे वर्तुळ म्हणजे ज्याप्रमाणे केवळ बिंदू हेच असेल, तसेच आजच्या कलेचे झाले आहे. दिवसेंदिवस कला ज्यांना समजू शकते अशा लोकांचे वर्तुळ कमी कमी होत होत आता इतकी पाळी आली आहे की फक्त कला निर्माण करणा-यालाच तेवढी त्याची कला समजते आणि त्याची त्याला तरी मागून समजते की नाही कोणास कळे. आजकाल कलेने असा हा आत्मघातकीपणाचा मार्ग अवलंबिला आहे!