कला म्हणजे काय? 73
अशी कृत्रिम कला निर्माण करण्याचे शास्त्र पध्दतशीर बनविण्यात आलेले आहे. त्याचे नीट नियम करण्यांत आले आहेत. त्या त्या कलाक्षेत्रांत विशिष्ट तंत्र उभे केलेले आहे. ते तंत्र हस्तगत केले की कला कवजांत आली. मग ज्या कलाकृतींत रस नाही, भावनांची ऊब नाही, प्राण नाही, अशा कलाकृती सारख्या निर्माण करता येतील. तंत्र मिळाले, यंत्र तयार झाले, श्रम करण्याची ताकद आहे, आणि भावना मेलेली आहे, हृदय थंड व शुष्क आहे. करा सुरू तर कलाकृतीचा कारखाना, माल भरपूर बाहेर पडू दे.
ज्याला थोडीशी वाङ्मयविषयक शक्ती आहे, त्याला जर काव्य निर्माण करावयाचे असेल, तर पुढील गोष्टी त्याने लक्षांत घ्याव्या. एका शब्दाऐवजी, ज्यांच्यांत ध्वनी सादृश्य असेल, प्रास-अनुप्रास असेल, असे दहा शब्द वापरण्याची हातोटी; एखाद्या योग्य अशा वाक्प्रचाराची इतकी फिरवाफिरव करावयाची की अर्थ पटकन लक्षात येऊ नये; त्यांतील अगदीच अर्थ नाहीसा करावयाचा नाही, थोडा ठेवावयाचा; आणि तिसरी गोष्ट म्हणजे जे शब्द यमकासाठी किंवा इतर प्रासानुप्रासासाठी म्हणून वापरले असतील, त्यांना शोभेल अशी थोडीफार भावना प्रकट करण्याची खटपट करावयाची. म्हणजे अगदीच निव्वळ शब्द आहेत असे वाटता कामा नये. थोडी वर्णने, थोडी भावना, थोडा विचार-मधून यांचे सिंचन असावे. मुख्य गोष्ट म्हणजे शब्द वापरणे. अमुक अमुक शब्द वापरावयाचे हे ध्येय. आणि ते वापरता यावेत म्हणून मग भावना धुंडाळावयाची, अर्थ ओढून आणावयाचा, विषय पहावयाचा. वर सांगितलेल्या तीन खुर्च्या ज्या वाक्पटूला साधल्या त्याला काव्याचा कारखाना अव्याहत चालविता येईल.
काव्याच्याऐवजी त्या वाक्पटूला जर कादंबरी किंवा गोष्ट लिहावयाची लहर आली तर त्याने आधी विशिष्ट भाषाशैली तयार करावी. पाहिलेले सारे वर्णन करता येणे, सर्व बारीकसारीक गोष्टी स्मरणांत राखण्यास शिकणे, त्यांची टाचणे-टिपणे हमेशा करीत राहणे-हे गुण आधी त्याने संपादन करावे. या गोष्टींची एकदा सवय झाली, यांत पारंगत्व मिळाले की मग इच्छेप्रमाणे किंवा मागणीप्रमाणे कादंब-या किंवा कथा त्याला भरपूर पुरवता येतील. ऐतिहासिक, सामाजिक, शृंगारिक, मनोविश्लेषणात्मक, धार्मिकसुध्दा-कारण अलीकडे तिचीही थोडी मागणी येऊ लागली आहे या सर्व प्रकारच्या कादंब-या रचणे त्याला जड जाणार नाही. इतर पुस्तकांतील किंवा प्रत्यक्ष सभोवती घडणा-या जीवनांतील प्रसंग त्याने प्यावे. स्वत:च्या परिचयाच्या माणसांची चित्रे काढावी, त्यांनाच रंगवावे.
अशा कादंब-या व गोष्टी जर त्यांत वर्णने झकास केलेली असतील जर त्यांत ठराविक गोष्टी नीट नियमानुसार मांडलेल्या असतील, विशेषत: शृंगारिक गोष्टीतील प्रत्येक बारीकसारीक छटा, लहानसान हालचाल जर नमूद केलेली असेल, तर लोक उत्कृष्ट कलाकृती म्हणून त्यांचे स्वागत करतील. मग त्यात भावनेचा टिपूसही नसला तरी चालेल.
नाटयकृती निर्माण करण्यासाठी वर ज्या कादंबरी व कथा यांच्यासाठी गोष्टी सांगितल्या आहेत त्या हव्यातच. शिवाय दुस-या काही गोष्टी ध्यानांत धरल्या पाहिजेत. पात्रांच्या तोंडी जितकी विनोदी भाषणे घालता येतील तितकी घालणे, तसेच समयोचित फणका-यांची उत्तरे, मार्मिक असे प्रश्न या गोष्टी हव्यात. मागे नाटयविषयक व रंगभूमीविषयक परिणाम घडवून आणण्यासाठी विरोधादि साधने जी सांगितली त्यांचाही अवलंब करावयास हवा. पात्रांचे परस्पर वर्तन असे ठेवावयाचे की लांबलांब भाषणे योजण्याची जरूर राहणार नाही. नाटकांत प्रत्यक्ष कृतीवर जोर द्यावा. घाई, धांदल, धावपळ रंगभूमीवर जितकी दाखविता येईल, तितकी नाटयकृती उत्तम होईल. लेखकाला या गोष्टी एकदा साधल्या म्हणजे भराभरा त्याला नाटके लिहिता येतील. कोर्टातील खटल्यांचे निकाल त्याने सदैव वाचीत जावे म्हणजे विषयांचा तुटवडा, संविधानकांचा अभाव त्याला कधी भासणार नाही किंवा समाजात ज्या गोष्टींची नवीन चर्चा सुरू झालेली असेल त्यांतून विषय घ्यावा. मोहिनीविद्या, परलोकविद्या किंवा प्राचीन काळातील कथानक, नाहीतर स्वत:च्या कल्पना-प्रांतातील विषय-काहीही चालेल.