कला म्हणजे काय? 54
परंतु केवळ फ्रेंच लेखकांचेच हे मत आहे असे नाही. इतर राष्ट्रांतील कवीही याच मताचे आहेत व असेच वागत आहेत. जर्मन, स्कँडिनेव्हियन, इटॅलियन, रशियन, इंग्रज सारेच कवी या दुर्बोधतादेवीचे भक्त झाले आहेत; या पध्दतीचे भोक्ते बनले आहेत. कलेच्या सर्वच क्षेत्रांतील उदयोन्मुख कलावान् या दुर्बोध पध्दतीची पूजा करू पहात आहेत. चित्रकला, शिल्प, संगीत, कोठेही जा. जिकडे तिकडे कोडी, कोडी, कोडी! काही समजायचे नाही, डोक्यांत काही प्रकाश पडायचा नाही. निट्शे व वॅग्नर यांच्यावर भरंवसा ठेवून हे उदयोन्मुख कलावानही असे मानू लागले आहेत की, ''आमची कला हवी गांवढळांसाठी, अडाणी लोकांसाठी नाही. सामान्य लोकांनी मरेमरेतो कामे करावी, बैलाप्रमाणे राबावे. कलेच्या मंदिरांत त्यांना मज्जाव आहे; जे अत्यंत उत्कृष्ट पध्दतीने शिकलेले आहेत, जे अत्यंत सुसंस्कृत आहेत, ज्यांच्या बुध्दीचा विकास नीट झालेला आहे, अशा ज्येष्ठ व श्रेष्ठ लोकांसाठी आमच्या या कलाकृती आहेत. त्यांच्या हृदयांत भावना जागृत करणे हे आमचे काम आहे. तेवढे झाले म्हणजे बस्स. बहुजनसमाजाशी आम्हांस काहीएक कर्तव्य नाही.
मी जे वर सांगितले ते केवळ काहीतरी म्हणून सांगितले नाही, खोटे सांगून मला काय करावयाचे आहे? काय मिळवायचे आहे? अवास्तविक मी कशाला लिहू, किमर्थ सांगू? मी लिहिले आहे त्याला पुरावा आहे. या दुर्बोध पध्दतीचा पुरस्कार करणारे जे फ्रेंच कवी, त्यांच्या काव्यांतील मी उतारेच उदाहरणे म्हणून पुढे देत आहे. फ्रेंच कवीच मी मुद्दाम घेत आहे, कारण या दुर्बोध पध्दतीचा पंथ दाखविणारे, कलेला हे वळण लावण्याचे प्रयत्न करणारे मुख्यत्वेकरून फ्रेंचच आहेत. इतर कलावानांपेक्षा फ्रेंच कलावानांचीच या दिशेने पाऊल जास्त पुढे टाकले आहे. त्यांनी पायंडा पाडला व मग त्यांच्या पाठोपाठ इतर युरोपियन कलावान् जाऊ लागले.
बॉडलिअर, व्हर्लेन यांची नावे तर आधीच सुविख्यात झाली आहेत. या पध्दतीचे पूजक असे दुसरे पुष्कळ फ्रेंच कलावान् आहेत; त्यांच्यातील काहींची नावे देतो. जीन मोरिआस, चार्लस् मॉरिस, हेत्र्नरी, डी रेगनिअर, चार्लस् व्हिग्नीर, ऍड्रिअन, रेमॅकल, रेनीधिल, मॉरिस मॅटर्लिक, जी. आल्बर्ट ऑरिअर, रेमी डी गौर्मेट, सेंट-पॉल-रॉक्स-ले-मॅग्निफिक, जॉर्जीस रॉडेनबॅक, ले काम्टे, रॉबर्ट डी मॉत्र्नटेस्को, फेझेनसॅक-हे सारे प्रतीकवादी दुबार्रेधत्ववादी आहेत. दुसराही एक मणीपंथ असाच आहे. जोसेफिन, पेलेंडिक, पॉल ऍडम, जुलेस, वॉइस, एम्. पॅपस व इतर या मणी पंथाचे आहेत.
डॉमिक या टीकाकाराने वरील नावाशिवाय आणखी एकशे चाळीस नावांचा उल्लेख आपल्या ग्रंथांत केला आहे.
जे कवी उत्कृष्ट म्हणून मानले गेले, त्यांच्या पुस्तकांतून काही उतारे देतो. प्रथम बॉडलिअर हाच घेऊ. हा सर्वांत अधिक प्रख्यात आहे. स्मारक उभारण्याइतका योग्यतेचा तो मानला गेला आहे. याचेच काव्य प्रथम घेऊ. ''दु:खाची फुले'' हा त्याचा काव्यग्रंथ फार नावाजलेला आहे. त्यामधून ही पुढील कविता घेतली आहे.
दु:खाची फुले, कविता २४
''हे दु:खनौके! कमानीप्रमाणे बाहेर उभी असलेली, पसरून राहिलेली जी काळीभोर रात्र, त्या रात्रीइतकीच तू मला पूज्य आहेस. मी तुझे गौरव करतो. तू मोठी आहेस, भव्य आहेस. परंतु तुझ्या मोठेपणांत निष्ठुरपणा व आडदांडपणा आहे. हे दु:खनौके! तू निघून जातेस म्हणून तर अधिकच प्रीति तुजबद्दल मला वाटते. माझ्या रात्रीला रमणीय करणारे! तू अजून एकावर एक राशी रचितच आहेस असे दिसते. होय-उपरोधिक रीतीने तू रचीत आहसे! ती नील अनंतता माझ्यापासून-माझ्या बाहूंपासून तिला तू दूर करीत आहेस. आम्हा दोघांत अनंत अंतरांच्या राशी तू रचीत आहेस.''
''हल्ला चढविण्यासाठी मी पुढे घुसतो, प्रहार करण्यासाठी मी वर चढतो. एखाद्या चर्चमधल्या कमानीखाली असलेल्या प्रेतावर किडे ज्याप्रमाणे हल्ला चढवितात एखाद्या चर्चमधल्या कमानीखाली असलेल्या प्रेतावर किडे ज्याप्रमाणे हल्ला चढवितात. त्याप्रमाणे मी हल्ला करीत आहे. हे अजिंक्य अदम्य पशो! हे निर्दया, कठोरा! तुझी ही कठोरता तुझ्या सौंदर्याला अधिकच सुंदर करीत आहे. त्यावरून माझी दृष्टी मी काढू शकत नाही. हे सौंदर्य म्हणजे माझ्या डोळयांना मेजवानीच आहे.''