कला म्हणजे काय? 125
आजचे शास्त्रज्ञ जी ध्येये मांडीत आहेत त्यावरून, ज्या ध्येयांचे ते समर्थन करतात व ज्या ध्येयांचे ते खंडन करतात, त्यावरून, ख-या मार्गापासून शास्त्र किती दूर गेले आहे हे स्पष्ट दिसून येते.
काही मूर्ख व फॅशनेबल पुस्तकातूनच असली ध्येये मांडलेली असतात असे नाही. एक हजार वर्षानंतर किंवा तीन हजार वर्षानंतर जग कसे असेल-असे सांगणा-या ग्रंथांतूनच असली मूर्ख ध्येये मांडलेली असतात असे नव्हे; तर स्वत:ला शास्त्राचे निस्सीम उपासक मानणारे मोठेमोठे समाजशास्त्रज्ञही असलीच ध्येये मांडीत असतात! शास्त्र म्हणजे ज्यांना पोरखेळ वाटत नसतो, शास्त्र म्हणजे गंभीर वस्तू ज्यांना वाटते, असे सुध्दा असल्याच गोष्टी मांडीत असतात. ''भविष्यकाळात अन्नासाठी शेती करावयास नको. ते प्रयोगालयात रासायनिक प्रयोगांनी तयार करण्यात येईल. सृष्टीशक्तीचा उपयोग करून घेण्यात येईल व मानवांना श्रम करण्याची जरूरच राहणार नाही-'' अशा प्रकारची ध्येये शास्त्रज्ञांकडून दर्शविली जात आहेत.
आज पाळलेल्या कोंबडीचे अंडे, स्वत: पिकविलेले शेतातील धान्य किंवा स्वत: लावलेल्या व वाढवलेल्या झाडावरचे फळ मनुष्य खात आहे. परंतु तसे पुढे राहणार नाही. प्रयोगालयातील पोषक व रुचकर अन्न तो खाईल. मनुष्याला फार श्रम करावे लागणार नाही. सगळेच लोक सुखासीन व गाद्यागिद्यांवर लोळणारे होतील, आळसांत विलीन होतील!
सत्पथापासून आजचे शास्त्र किती दूर गेले आहे, किती आडरानात शिरले आहे ते सावरून दिसेल. असल्या ध्येयावरून ही व्युति जितकी स्पष्ट दिसून येते, तितकी दुस-या कशानेही दिसून येणार नाही.
आज पुष्कळ लोकांना पुरेसे अन्न नाही, रहावयास घर नाही. जीवनाच्या अत्यंत आवश्यक गरजा त्याही त्यांच्याजवळ नाहीत. आणि याच लोकांना-अन्नवस्त्रहीन घरादाराहीन लोकांना-मरेमरेतो शक्तीबाहेर जिवापाड काम करावे लागते व स्वत:च्या जीवनाची माती करून घ्यावी लागते. परंतु परस्पर स्पर्धा, ऐषआराम, द्रव्याची अयोग्य व अन्याय वाटणी, या गोष्टी जर दूर केल्या तर ही दु:खे सहज दूर होण्यासारखी आहेत. खोटी व अहितकर अशी समाजरचना रद्द करून नवीन विचारास पटेल अशी, बुध्दिगम्य व हृदयगम्य अशी, मनुष्यांना शोभेल अशी, बंधुभाव व ऐक्य यांना धरून असेल अशी समाजरचना निर्माण केल्याने हे सर्व साधेल. परंतु ग्रहांच्या गति जशा निश्चल व अचल आहेत, त्यांच्यात काडीचाही फरक होत नसतो, तसेच सामाजिक रचनेचेही असते असे आजचे नामधारी शास्त्र सांगत असते. आजच्या जीवनपध्दतीतील फोलपणा व असत्यता न दाखविता, नवीन विचारपूर्ण समाजरचनेची कल्पना न मांडता, सद्य:परिस्थितीच चालू ठेवून सर्वांना कसे खायला देता येईल, सर्वांनाच वरच्या वर्गातील लोकांप्रमाणे आळसी, विलासी व पशुसमजीवने कशी चालवता येतील, याचाच विचार हे नामधारी शास्त्र करीत असते.
हे शास्त्रज्ञ व त्यांची शास्त्रे एक गोष्ट विसरतात की धान्य, भाज्या व फळे हाच उत्कृष्ट असा आहार आहे. जे धान्य व जी फळे स्वत:च्या श्रमाने मनुष्य मिळवीत असतो, भूमीतून निर्माण करीत असतो-त्यांचाच आहार हृदय, आनंदजनक व आरोग्यपद असा आहे. हा आहार सहज आहे, मिळविणे सोपे आहे. रक्तात प्राणवायू जावा म्हणून नाकाला ज्याप्रमाणे श्वासोच्छ्वासाचा श्रम केला पाहिजे, त्याप्रमाणेच माणसाचे सर्व शरीर व त्याचे मनही तरतरीत, निरोगी व तेजस्वी राहावेत म्हणून सर्व स्नायूंना हालचाल करणे जरूर आहे; सर्व स्नायूंनी श्रम करणे आवश्यक आहे.
मालमत्ता व श्रम यांच्यातील असमान विभागणी कायम ठेवून रासायनिक रीतीने तयार झालेल्या अन्नाने लोकांना कसे पोसता येईल याची साधने शोधून काढणे, आणि त्यासाठी सृष्ट शक्तीचा कसा उपयोग करून घेता येईल यासंबंधी युक्त्या शोधणे-हे काम म्हणजे मनुष्याला वाईट हवेने भरलेल्या खोलीतच ठेवून पंपाने त्याच्या फुप्फुसात स्वच्छ हवा भरूपहाण्यासारखेच आहे; परंतु हे पंपाचे शोध व ती हवा भरणे याच्याऐवजी, त्या दुर्दैवी माणसाला अंधा-या व गलिच्छ कोठडीतून बाहेर काढणे एवढीच किंवा पुरेशी आहे.