कला म्हणजे काय? 23
प्रकरण चौथें
(सौंदर्यावर उभारलेल्या कलेच्या व्याख्या; रुचीची व्याख्याच करितां येत नाही; कलावस्तु समजून घ्यावयास स्पष्ट व स्वच्छ अशा कलेच्या व्याख्येची जरूरी.)
मागे ज्या सौंदर्याच्या अनेक व्याख्या दिल्या, त्यांचे सार काय, त्यांचा मथितार्थ काय ? कला या शब्दाने जेवढा अर्थ मनात येतो, तेवढा अर्थ सौंदर्याच्या नाना व्याख्यांनी दर्शविली जात नाही. या सगळया सदोष व चुकीच्या अशा व्याख्या आपण दूर ठेवू या. कोणी उपयुक्ततेंत सौंदर्य मानितो, तर कोणी प्रमाणात तें मानितो; कोणी कोमलतेंत, तर कोणी ऐक्यांत; कोणी अनेकांतील एकत्वांत तर कोणी या सर्वांच्या समुच्चयात सौंदर्य मानितो. या सा-या वस्तुविषयक व्याख्या दूर राखू या. हे सारे अपेक्षी प्रयत्न आहेत. सौंदर्याच्या ज्या शेकडों व्याख्या आपण पाहिल्या, त्यातून महत्वाचे असे दोनच विचार आपणास मिळतात. ह्या सर्व व्याख्यांतून दोन गोष्टी प्रामुख्याने निदर्शनास येतात. पहिली गोष्ट म्हणजे सौंदर्याला स्वतंत्र अस्तित्व आहे ही होय. जे चिरंतन अंतिम सत्य, जें पूर्णत्व, जे चिन्मय, जो आत्मा, जी मूळ प्रेरणा, जो ईश्वर त्याच्या अनेक प्रकट रूपांपैकी त्याच्या अनेक मूर्त विभूतींपैकी सौंदर्य हे एक आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सौंदर्यापासून निहेंतुक, सौवार्थनिरपेक्ष असा आनंद आपणास मिळतो.
या दोन विचारांपैकी पहिला विचार फिक्टे, शेलिंग, हेगेल, शौपेनहार व तत्त्वज्ञानीवृत्तीचे जे फ्रेंच लेखक यांचा आहे. कोझिन, जोप्रय, रॅव्हेसान वगैरे फ्रेंच पंडित या पहिल्या विचारालाच उचलून धरितात. आजच्या पुष्कळशा सुशिक्षित लोकांची सौंदर्याबद्दलची हीच कल्पना आहे. सौंदर्याची ही व्याख्या अर्धवट गूढ, अर्धवट वस्तुविषयक अशी आहे. परंतु पुष्कळ जण हीच व्याख्या घेऊन चालतात. निदान आजकालच्या पोक्त पिढीचे तरी हेच मत आहे.
सौंदर्य म्हणजे एकप्रकारची निर्हेतुक सुखानुभूति हे मत इंग्लिश लेखकांना अधिक पसंत आहे; आणि नवीन तरुण इंग्रज पिढीचेही मत, या विचाराकडेच झुकत आहे.
म्हणजे एकंदरीत (आणि त्याला इलाज नाही) सौंदर्याच्या दोन व्याख्या झाल्या. एक व्याख्या व्यक्तिविषयक व गूढ अशी आहे. ह्या व्याख्येत सौंदर्याची कल्पना परमोच्च पूर्णस्वरूपांत - परमेश्वरांत मिळून जाते. सौंदर्याची ही व्याख्या विचित्र व चमत्कारिक आहे. ती शून्यावर उभारिलेली आहे. दुसरी व्याख्या याच्या उलट अत्यंत साधी, सहज समजेल अशी व व्यक्तीच्या रुचीवर अवलंबून अशी आहे. जे सुखविते. ते सौंदर्य. (सुखवितें वा शब्दाला स्वार्थनिरपेक्ष असे विशेषणात्मक पद मी जोडीत नाही. कारण सुखविणें या कल्पनेत स्वार्थाच्या कल्पनेचा माझ्या मते साहजिकच अभाव असतो.)
एका पक्षाने सौंदर्याला परम गूढ व परम उदात्त असे बनविले आहे. परंतु दुःखाची व खेदाची गोष्ट ही की ही व्याख्या अनिश्चित व अति विस्तृत अशी आहे. तत्त्वज्ञान, धर्म, जीवन यांनाही ही व्याख्या आपल्या कक्षेत ओढून घेते. अतिव्यप्ति हा दोष येथे होतो. शेलिंग, हेगेल व त्यांचे जर्मन आणि फ्रेंच अनुयायी यांची मते पाहिलीं म्हणजे ही सदोषता स्वच्छ दिसून येते. दुसरा पक्ष कान्ट व त्याचे अनुयायी ह्याचा निर्भेळ व निर्हेतुक सुख देणारें ते सौंदर्य अशी हा पक्ष व्याख्या करितो. ही दुसरी व्याख्या जरी सुटसुटीत व असंदिग्ध अशी वाटली तरी ही व्याख्यासुध्दा अगदी बरोबर आहे असे म्हणतां येणार नाही. ही व्याख्यासुध्दां दुस-या एका बाजूनें अतिव्याप्त अशी आहे. खान-पानादिक सुखें, शरीरस्पर्शाची सुखें अशांचाहि अंतर्भाव या सौंदर्याच्या व्याख्येत होतो व ही गोष्ट गायू, कॅलिक यांनी मान्य केली आहे.