कला म्हणजे काय? 82
या हिशेबाने गेल्या दहा वर्षांत किती कलाकृती निर्माण झाल्या असतील, आणि वरच्या वर्गाची कला बहुजनसमाजाच्या कलेपासून निराळी झाल्यापासून अशा किती कलाकृती आजपर्यंत उत्पन्न झाल्या असतील, त्याचा हिशेब कोण करू शकेल? कोटयावधी कलाकृती निर्माण झाल्या, परंतु ह्या वरपांगी व दिखाऊ कलाकृतींपासून कोणा कलामीमांसकाला, कोणा कलामर्मज्ञाला, कोण कलासंग्राहक रसिकाला काही भावना प्राप्त भावना झाल्या का? मजूर वर्ग, तो कायाक्लेशी वर्ग आपण दूरच ठेवू या. त्या बिचा-यांना या कलाकृतींची व या कलानिर्मितीची कल्पनाही नसते. वरच्या वर्गातील लोकच घेऊ या. या वरच्या वर्गातील लोकांमध्येही हजारांत एखाद्यालाच या अफाट कलाव्यापाराचे ज्ञान असेल व तोही बिचारा विसरून जात असेल ह्या सा-या कृती कलेच्या नावाने उत्पन्न होत असतात. परंतु चुकून एखाद्याही मुनष्यावर काही संस्कार करतील तर शपथ. एखाद्याचेही हृदय हलवीत असतील तर मला विचारा. उत्पन्न होतात व मरून जातात. कुत्र्याची मुते जशी पावसाळयांत वर येतात व क्षणांत मरतात, बुडबुडे जसे क्षणभर नाचतात व विरतात, तशाच ह्या हजारो हजार कलाकृती; ह्या सा-यांचा उपयोग काय? श्रीमंत व खुशालचेंडू चंदूलालची क्षणभर करमणूक करावयाची व कालोदारांत विलीन व्हावयाचे? याशिवाय दुसरा कोणताही उपयोग त्यांचा नसतो.
मला असे कोणी उत्तर देतील की लाखो अपयशी प्रयत्न होतील तेव्हाच त्यांतून एखादी खरी सत्कृती जन्मास येत असते. या अशा प्रयत्नांशिवाय सत्कृतीची निर्मिती होणे अशक्यच होईल. परंतु हे म्हणणे म्हणजे भटारखान्यांतील पावरोटी भाजणा-याने ''पुष्कळसे तुकडे बिघडविल्याशिवाय मी चांगला पाव कसा करू शकेन? सध्या हे बिघडलेलेच घ्या. हळूहळू मी सुधारेन.'' असे म्हणण्यासारखेच आहे. त्याने तुकडे बिघडवावे. परंतु घरातच ठेवावे. ज्यादिवशी चांगला भाजता येईल त्या दिवशीच दुकान थाटावे, त्यावेळेसच लोकांना ते द्यावे. तोपर्यंत घरात त्याने अभ्यास करावा. जेथे सोने असते तेथे खंडोगणती वाळू व माती मिळलेली असते. हे खरे; परंतु याचा अर्थ हा नाही की, दोन चांगले शब्द बोलण्यासाठी मी वायफळ वाटेल तितके सभेत बोलत राहावे!
ज्यांना कलाकृती म्हणून मानण्यात येते अशा कृतीचे पर्वत आपल्या चौफेर पडलेले आहेत. सर्वबाजूंनी आपण ह्या भुतांनी पेरलेले आहोत, जिकडे पहाल तिकडे ह्यांचा बाजार भरलेला आहे. हजारो काव्ये, हजारो कादंब-या, हजारो नाटके, हजारो चित्रे, हजारो गीते, एकापाठीमागून एक उत्पन्न होतच आहेत. सर्व काव्यांतून प्रेम, क्वचित निसर्ग-वर्णन व स्वत: कवीच्या आशानिराशा यांचे वर्णन असते, सर्व काव्यांतून छंद, यमक, नादमाधुर्य, प्रास-अनुप्रास वगैरे असते. नाटके व प्रहसने मोठया थाटामाटाने व गाजावाजाने रंगभूमीवर आणली जातात व उत्कृष्ट नटांकडून ती करविली जातात. सर्व कादंब-यांतूनच निरनिराळी प्रकरणे असतात व सर्व प्रकरणांतून प्रणयाचा धागा ओवलेला असतो. परिणामकारक प्रसंग मुद्दाम घालण्यात येतात. रोमांचकारी वर्णने देण्यात येतात. जीवनातील बारीकसारीक माहिती पुरविण्यात येत असते. सर्व प्रकारच्या संगीतांतून ठराविक राग असतात. त्यात ठरलेली मिश्रणे असतात. अत्यंत कुशल वाजविणारे ती वाजवितात. सर्व चित्रे सोनेरी चौकटीतून बसविलेली असतात. त्यात सुंदर चेहरे चितारलेले असतात. त्या चित्रांतून इतर शेकडो अप्रस्तुत गोष्टी दाखविलेल्या असतात. कलेच्या या निरनिराळया क्षेत्रांतून याप्रमाणे ज्या लक्षावधी कृती निर्माण होत आहेत, त्यातील एखादीच बरी असते. ह्या एखादीत व बाकीच्यांत फरक हिरा व कोळसा यांमध्ये जेवढा असतो, तेवढा असतो. एखादी अमोल अशी खरी कलाकृती असते व बाकी हजारोहजार कृती केवळ मातीमोल असतात; मातीहूनही त्या वाईट; ज्या वस्तूला काहीही मोल नाही अशा टाकाऊ वस्तूंतूनही या कृती वाईट असतात. कारण यांना स्वत:ला किंमत नाही एवढेच नाही तर ह्या दुस-यांना फसवितात, दुस-यांना बिघडवितात; परंतु ज्याची रूची बिघडलेली आहे, कलेकडे पाहण्याची ज्याची दृष्टीच काही विचित्र आहे, अशा माणसाला ह्या नादान व टाकाऊ कृती सा-या संसेव्यच वाटतात, संपूज्यच वाटतात. हिरा व गारगोटी समान मोलानेच तो हृदयाशी धरतो. एकप्रकारचा स्थितप्रज्ञ भेदातीत ऋषीच जणू तो!