कला म्हणजे काय? 42
जितके आपण सौंदर्याचे गुलाम होऊ, तितके आपण शिवत्वापासून दूर जाऊ. काही लोक म्हणतात की असेही एक सौंदर्य असू शकते जे दैवी व नैतिक असे असते. मला ते असे म्हणत असतात हे माहीत आहे. परंतु हा केवळ शब्दांचा खेळ आहे. कारण दैवी व नैतिक सौंदर्य म्हणजे दुसरे तिसरे काहीएक नसून ते शिवत्वच होय. आत्म्याची सुंदरता म्हणजेच शिवत्व. परंतु सामान्यपणे सुंदर या शब्दाने जो भाव आपण ग्रहण करतो, जी कल्पना आपल्या मनात येते त्याच्याशी आत्म्याच्या सौंदर्याचा-त्या शिवत्वाचा-चिरंतनचा विरोधच असतो हेच खरे.
आता सत्याकडे वळू. जे काही आपण बोलतो, ज्या काही वस्तूंच्या व्याख्या वगैरे आपण करतो-त्यांच्याशी प्रत्यक्षाचा मेळ असणे म्हणजे सत्य; सर्वसामान्य लोकांना जो पदार्थ माहीत आहे त्याच्याशी आपर केलेले त्या पदार्थाचे वर्णन जुळणे म्हणजे सत्य. म्हणून सत्य हे शिवत्वाकडे जावयाचे एक साधन आहे. सत्य व सौंदर्य यांचे हे वास्तविक अर्थ पाहिले म्हणजे शिवत्वाशी त्यांचे कोठे साम्य दिसून येते? एका बाजूस सत्य व सुंदर यांची जोडी उभी करा व दुस-या बाजूला शिवत्व उभे राहू दे. काय आहे त्यांच्यात साम्य? त्रास व दु:ख देण्यासाठी म्हणून मुद्दाम उच्चारलेले सत्य ते शिवत्वाशी कसे गोडीगुलाबीने नोंदू शकेल?
सत्य व सौंदर्य यांचे विचार शिवत्वाशी जुळले नाहीत. हे समानार्थक शब्द नाहीत. शिवरत्वाशी संगत होऊन तिही मिळून एकच वस्तू होणे शक्य नाही. सत्य व सौंदर्य या गोष्टी शिवत्वाबरोबर नेहमी असतातच असे नाही. उदाहरणार्थ सॉक्रेटिस, पास्कल व असेच आणखी काही विचारवान् तत्त्वज्ञानी म्हणतात की, ''ज्या वस्तूंची जरूर नाही, त्या वस्तूंचेही ज्ञान मिळवू पाहणे म्हणजे शिवत्व नव्हे. ही गोष्ट शिवत्वाशी जुळत नाही.'' सत्याचे सौंदर्याशीही काही साधर्म्य नाही, उलट पुष्कळसा विरोधच आहे. सत्य पुष्कळ वेळा फसवणूक करणारे मोहक मायाजाल दूर करीत असते आणि सौंदर्य तर मोहक मायाजाल पसरीत असते, आणि हे मायाजालच ज्याला आपण सुख सुख म्हणून म्हणतो ते देत असते. सुख म्हणजे भूल. ही भूल पाडणा-या सौंदर्याची ती भूल दूर करणा-या सत्याशी कशी मैत्री जमावी?
असा सारा वास्तविक प्रकार आहे, परंतु झाले काय ते पहा! परस्परविरुध्द अशा या शब्दांना कसे तरी एकत्र खेचून आणून त्यांना त्यांच्या इच्छेविरुध्द एकांत एक मिसळून त्यावर कलेचा पाया रचण्यात आला! सद्भावना जागृत करणारी ती सत्कला, असत् भावना उद्दीपित करणारी ती असत् कला, हा भेद ज्या मीमांसेला माहीतही नाही, केवळ सुखप्रदान करणे हे अत्यंत हीन, हिडीस व ओंगळ स्वरूपच ज्या मीमांसेत कलेचे परम उदात्त स्वरूप म्हणून मानले गेले, अशी जी ही विचित्र व मासलेवाईक नव कलामीमांसा तिचा पाया सत्य शिव सुंदर यांच्या वर सांगितल्याप्रमाणे काल्पनिक असणा-या ऐक्यावर रचिला गेला आहे! ज्या कलेविरुध्द मानवजातीच्या सर्व थोर गुरूंनी वारंवार इशारा दिला, धोक्याची सूचना दिली त्याच केवळ सुखोत्पादक व विलासोत्तेजक कलेला आज श्रेष्ठ म्हणून मानण्यात येत आहे! कलेच्या अत्यंत हीन अशा स्वरूपाचीच ते अत्यंत थोर समजून आज पूजा करण्यात येत आहे!