कला म्हणजे काय? 134
एखाद्या हुशाल तरुणाला या साहित्यजंगलात जर सोडून दिले व तूच स्वत: निवड कर असे सांगितले तर बहुधा दिसायला सुंदर परंतु अंतरी विषमय अशी फळे प्रसवणा-याच लतावेली त्याच्या हातांत येतील. दहा दहा वर्षे जरी त्याने खटपट केली तरी गलिच्छ पुस्तकेच त्याच्याजवळ येऊन पडणार. चांगला ग्रंथ त्याच्या हातात येणे फार दुरापास्त आहे. दिवसेंदिवस ही घाणेरडीच पुस्तके हातांत पडल्यामुळे शेवटी त्या तरुणाची बुध्दि भ्रष्ट होते, रुचि कायमची बिघडते. आणि मग जर कधीकाळी एखाद्या सद्ग्रंथ त्याच्या हातात पडलाच तर त्याला तो समजणार तरी नाही, किंवा समजालाच तर फार विपरीत रितीने समजेल. त्या पुस्तकाने तो गैरसमज मात्र करून घेईल.
याचे कारण म्हणजे जाहिराती. तो तरुण वर्तमानपत्रे, मासिके यांच्यातील जाहिरातीवर विसंबून राहतो. रद्दी पुस्तकांची जाहिरात सर्वात जास्त असते. धन्य आहे या जाहिरातींची. ज्या कादंबरीत नाही नीट विषय, नाही कला, नाही जिव्हाळा, नाही ध्येयवाद असल्या कादंब-या दहादहा लाखांनी खपतात हे आश्चर्य नव्हे का? पिअर्स सोपप्रमाणे ह्या कादंब-यांची सर्वत्र प्रसिध्दी होते. या प्रसिध्दीमुळे अधिकाधिक लोक ह्या कादंब-या वाचू लागतात. आणि अगदी रद्दी टाकाऊ व ओंगळ अशा पुस्तकांची कीर्ति कितीतरी पसरते. असल्या कृती वाचून ख-या सत्कृतीतील गुण समजण्याची पात्रता वाचकांची नाहीशी होते. अधिक छापले गेले की ते कमी दर्जाचे असणार? जसजसा पुस्तके, मासिके व जाहिराती यांना पूर येईल, तसतसा बहुजनसमाज अधिकच अज्ञानात व गोंधळात, अधिकच चिखलात व दलदलीत बुडणार!
माझ्या हयातीतच, गेल्या ५० वर्षांत ही रुचि किती बिघडली आहे ते मला दिसत आहे. वाचणा-यांची बुध्दीच जणू मेली असे दिसत आहे. बाह्याच्या सर्वच शाखांत हा अध:पात दिसून येत आहे. मी कांही ठळक उदाहरणे देतो. रशियांत पुष्किन व लर्माटोव्ह यांच्यानंतर ज्यांच्या कवित्वाबद्दल शंका येते अशा मेकॉव्ह, पोलोन्स्की, फेट यांच्या गळयांत काव्यकीर्तीने हार घातले. नंतर ज्याला काव्यशक्ति खरोखरच नव्हती असा नेकॅसोव याला हा मान मिळतो; पुढे तो अलेक्झी टॉलस्टॉय येतो. याचे काव्य तर फारच कृत्रिम व अगदीच सामान्य असे आहे. अलेक्झीनंतर तो कंटाळवाणा व दुबळा नॅडसन हा कवी म्हणून वाखाणला जातो. नॅडसन नंतर अपुक्टिन उभा राहातो. याला काव्याची थोडीसुध्दा देणगी नाही. आणि पुढे साराच गोंधळ. कविता रचणा-यांचे तांडेच्या तांडे उभे राहतात. जो उठतो तो कवीच! काव्य म्हणजे काय हे ज्यांना समजत नाही, स्वत: लिहिलेल्याचा अर्थही ज्यांना कळत नाही किंवा आपण का लिहितो हे ज्यांना माहीत नाही.. असे हे सारे कवी असतात.
इंग्रज कादंबरीकारांत हेच दिसून येत आहे. थोर डिकन्स, त्याच्यानंतर जॉर्ज इलियट, नंतर थँकरे, याच्यानंतर ट्रालोपी; परंतु ह्या चौकडीनंतर भरमसाटपणे वाटेल ते लिहिणारे किल्पिंग, हॉलकेन, रायडर, हॅगार्ड व इतर मंडळी येते. अमेरिकन साहित्यांत तर अधिकच स्पष्टपणे हा अध:पात व -हास दिसतो. इमर्सन, धोरो, लॉवेल व व्हिटिअर या थोर मंडळीनंतर, या तेजस्वी ता-यानंतर सारेच किडे व काजवे, परंतु ऐट मात्र चंद्रसूर्याची! सुंदर चित्रांची सुंदर पुस्तके भरपूर दिसतात, परंतु त्यातील गोष्टी, त्यातील त्या कथा... त्यात वाचण्यासारखे काहीच नसल्यामुळे त्या वाचतच नाहीत.