कला म्हणजे काय? 2
केवळ अपरंपार कष्ट पडतात व श्रम पडतात- एवढेंच नव्हे तर लढाईतल्याप्रमाणें मानवीं जीवनांचा होम कलासाहित्यासाठी सदैव होत असतो. हजारों लाखों माणसें लहानपणापासून नृत्यकला शिकण्यासाठीं पाय कसे हालवावे, नाचवावे, उडवावे हें शिकण्यासाठीं अट्टाहास करीत असतात; किंवा वाजविणारे बिजलीप्रमाणें आपलीं बोटें तारांवरुन किंवा पडद्यांवरुन फिरावीं म्हणून सारीं जीवनें देतात; किंवा जें दिसतें तें रंगविण्यासाठी चित्रकार मरत असतो; प्रत्येक शब्द तोलून वापरला जावा, नादमधुर व योग्य पडावा म्हणून कवि आटापीट करतात. हे सारे लोक हुशार असतात, बुध्दिमान् असतात, हृदयाचे ते हळुवार असतात. उपयुक्त असा कोणताहि श्रमभार माथां प्यावयास ते लायक असतात. परंतु आपापल्या विशिष्ट धंद्याची पूजा करुन एकप्रकारें ते अहंकारी व आंधळे होतात. त्यांचा सर्वांगीण विकास होत नाहीं. ते आपल्याच ऐटींत नेहमीं असतात. जीवनाच्या इतर गंभीर व महत्वाच्या बाबतींत ते पूर्णपणें उदासीन असतात. त्या गोष्टींचें त्यांना कांहींच वाटत नाहीं. नाचतांना पाय कासे हालवावे, गातांना ओंठ कसे कांपवावे, वाजवतांना बोटें कशीं नाचवावींत- हया पलीकडे त्यांना कांहीएक दिसत नाहीं. ते जणुं रानटी बनतात. त्यांची वाढ पूर्णपणें खुंटते.
मानवी जीवनाचा विकास खुंटतो, सहृदयता मारली जाते, एवढेंच नाहीं तर याहूनहि अनिष्ट व भयंकर प्रकार कलापूजेच्या नांवाखालीं होत असतात. युरोप व अमेरिका येथें दररोज ज्या प्रकारचे जलसे, तमाशेवजा संगीत नाटकें होत असतात, अशा एका जलशाला रशियामध्यें मी एकदां गेलों होतों.
मी गेलों तों पहिल्या अंकाला आरंभ होऊनहि गेला होता. प्रेक्षकांमध्यें जाऊन बसण्यासाठी मला रंगभूमीच्या प्रवेशद्वाराजवळून जावें लागलें. रंगभूमि व नाटकगृह प्रकाशित करण्यासाठी, त्याचप्रमाणें निरनिराळे देखावे बदलण्यासाठीं, तेथें प्रचंड यंत्रें होतीं. मी त्या प्रचंड यंत्रांजवळून, अंधा-या वाटेच्या अरुंद बोळांतून जात होतों. त्या प्रचंड इमारतीच्या कमानीमधून मला नेण्यांत आलें. तेथील अंधारांत, धुळींत व पाणींत मजूर काम करण्यांत दंग झाले होते. एक अगदी फिकट, भुतासारखा दिसणारा, ज्याचे कपडे धुळीनें मळले आहेत व फाटून गेले आहेत, काम करुन ज्याचे हात अगदी गळून गेलेले आहेत व घाणींनें भरलेले आहेत, हाताचीं बोटें ज्याचीं आंखडून गेलीं आहेत, ज्याला आनंद माहीत नाही, विश्रांति माहित नाहीं असा मनुष्य माझ्याजवळून गेला. तो दुस-या कोणावर तरी रागावत होता. कुणाची तरी खरडपट्टी काढीत होता. अंधरांतील एका जिन्यानें मी पडद्यांच्या मागील बाजूस आलों. तेथें शेंकडों खांब होते, अनेक पडदे होते, नानापरीचे शृंगारसाज होते, परोपरीचे देखावे होते. अशा त्या अपरंपार साहित्यामधून डझनवारी-शेंकडोंवारी नसतील कदाचित् माणसें बाहुल्यांप्रमाणें नाचत होतीं, धावपळ करीत होती. रंग फांसलेले, पोषाख घातलेले, विविध रीतींनी नटलेले असे किती तरी जीव तेथें होते. अगदीं घट्ट बसतील असे मांडयांवर कपडे होते. तेथें स्त्रियाहि होत्या. नग्न राखतां येणें जितकें शक्य होतें, तितक्या त्या नग्न होत्या. सामुदायिक संगीतांतील ही सारी मंडळी होती. आपली पाळी केव्हां येते त्याची वाट पहात ती उभी हाती. माझ्या मार्गदर्शकानें मला रंगभूमीवरुन नेलें. फळयांच्या केलेल्या पुलावरुन मी जात होतों. एका बाजूला शेंकडों वाद्यें व वाजविणारे बसले होते. ड्रम, बांस-या, वीणा-नाना प्रकार तेथें होते.
एका उंच स्थानीं दोन दिव्यांच्यामध्यें आरामखुर्चीत व्यवस्थापक बसला होता. त्या दिव्यांना प्रकाशपरिर्वक लाविलेले होते. त्या व्यवस्थापकाचे हातांत एक लहान काठी होती. वाद्यविशारदांना व गायकांना त्या काठींने सूचना देत होता. तो सर्व जलशाचाच सूत्रधार होता म्हणाना.
आरंभ तर होऊनच गेला होता. इंडियन लोक एका वधूला घरीं आणीत आहेत व मोठी मिरवणूक चालली आहे, असा तो देखावा होता. सजवलेल्या व नटविलेल्या नारीनरांशिवाय साधाच पोषाख घातलेले दोन इसम रंगभूमीवर जा ये करीत होते. त्यांची मोठी धांदल होती. एक जण नाटयविभागाचा व्यवस्थापक होता व दुसरा नृत्यविभागाचा होता. या दुस-यानें अत्यंत मऊमऊ असे बूट पायांत घातले होते. अत्यंत चपलतेनें तो जा ये करीत होता. दहा मजुरांना संबंध वर्षांत जेवढा मिळवितां येईल, त्यापेक्षां त्याचा मासिक पगार अधिक होता !