कला म्हणजे काय? 67
प्रकरण अकरावे
(उसने घेणे, अनुकरण करणे, अवडंबर माजविणे व करमणूक करणे वगैरे गोष्टींनी खोटी कला निर्माण होते; ख-या कलेच्या निर्मितीला कोणत्या गुणांची आवश्यकता आहे? दांभिक कला निर्माण करण्यास काय असले म्हणजे पुरे?)
वरच्या वर्गातील लोकांच्या कलेला दिवसेंदिवस विषयांचा तुटवडा पडत आहे व या कलेचे स्वरूपही दुर्बोध होत आहे. वरच्या वर्गातील कलेचे जे अगदी अलीकडचे असे वाटले आहेत, त्यांना कला असे संबोधण्यातही संकोच वाटतो, कलेची ती नक्कल आहे, अनुकरण आहे. लोक कलेपासून अलग झाल्यामुळे वरच्या वर्गातील लोकांच्या कलेला विविध विषय राहिला नाही; एवढेच नव्हे, तिचे स्वरूप दुर्बोध होत गेले, एवढेच नव्हे, तर तिचे कलात्वही नष्ट होऊ लागले, सत्कलेऐवजी केवळ खोटी अनुकरणात्मक कला मात्र शिल्लक राहिली आहे. प्राणवान् कलेऐवजी प्राणहीन कलेचे मढे शिल्लक राहिले आहे.
असे होण्याची पुढील कारणे आहेत: लोकांतीलच एखाद्या मनुष्याला जेव्हा उत्कट व बलवान भावनेचा अनुभव येतो, त्यावेळेस ती भावना दुस-यांनाही देण्याची त्याला आवश्यकता भासते. ह्या हृदयाच्या आवश्यकतेतून, ह्या इच्छेतून, ह्या भुकेतून, लोककलेचा जन्म होत असतो. परंतु श्रीमंत वर्गाची जी कला आहे, ती कलावानाच्या हृदय-गाभा-यांतून जन्मास आलेली नसते. त्याच्या प्रबळ आंत:प्रेरणेचे, आंतरिक उत्कटतेचे ते अपत्य नसते. वरच्या वर्गातील लोकांना करमणूक पाहिजे असते, ते पैसे देतात, आणि म्हणून त्यांची कला निर्माण होते. श्रीमंतांना ज्या भावनामुळे आनंद होईल, सुख होईल अशाच भावना कलेतून निर्माण केल्या जातात. श्रीमंतांची मागणी पुरी पाडण्याचे काम, श्रीमंतांना ज्या प्रकारचा माल पाहिजे त्या प्रकारचा माल पुरविण्याचे काम कलावान अंगावर घेतात. अर्थात् हे काम कठीण असते. कितीही हीन प्रकारची कला असली तरी ती हुकमी निर्माण करता येत नसते. श्रीमंत वर्गातील लोक आपली जीवने चैन, विलास, आळस यांत दवडीत असतात; त्यांना जीवनांतील रिक्तपणा व कंटाळवाणेपणा यांचा विसर पडावा अशी इच्छा असते. कृत्रिम आनंद निर्माण करण्याची, यामुळे त्यांना जरूर भासते. कलावान लोकांना ते पैशांनी विकत घेतात. कलावानाला हृदयांत काही नसले तरी प्रसवावे लागते, निर्माण करावे लागते. वांझेने आपले मूल आणून दाखविण्याप्रमाणेच ते असते. कलावानाला खोटया गोष्टींचा आश्रय करावा लागतो. श्रीमंतांच्या मागणीला पुरे पाडण्यासाठी त्याला कृत्रिम उपायांचा अवलंब करावा लागतो, कलेची नक्कल करण्यासाठी नाना युक्त्या त्याला शोधून काढाव्या लागतात आणि ही नकली कला कशा प्रकारे निर्माण करावी याचे आता पूर्ण संशोधन झाले आहे, 'साधनांचा छडा लागला आहे. नकली कलेचा कारखाना उघडण्यासाठी मुख्यत: चार गोष्टींची जरूरी असते. १. उसनवारी, २. अनुकरण, ३. बाह्य अवडंबर व ४. करमणूक.
पहिली गोष्ट म्हणजे उसनवारी. कलावान कधीकधी संबंध विषयचा विषय दुस-यांचे चोरतात, उसने घेतात; कधीकधी मधले मधले तुकडे उसने घेतात. पूर्वी ज्या कृती काव्यमय म्हणून मानल्या गेल्या त्या कृतींतून गोष्टी उचलून घेतात. त्या गोष्टींना ते असे रूप देतात, इतका इतर गोष्टींचा पोषाख त्यांच्यावर चढवितात की त्या दुस-या गोष्टी नवीन दिसाव्या; ते जुने ताजे दिसावे; ते पूर्वीचेच अपूर्व वाटावे.