कला म्हणजे काय? 115
कलात्मक व्यापार सर्व मानवांचा मोकळा राहील. ज्याला ज्याला इच्छा आहे, ज्याला पात्रता आहे त्या सर्वांनी जातगोत, वर्गवर्ण न पाहता या कलामंदिरात नि:शंक व निर्भय रीतीने प्रवेश करावा. भविष्यकालीन कलादेवीचे मंदिर सर्वांना खुले राहील. त्या मंदिरात कोणीही अस्पृश्य नाही. सर्वांना तिची पूजासेवा करता येईल. कारण भविष्यकालीन कलेत अगडबंबपणा, दुर्बोधपणा यांना वाव उरणार नाही. ती साधी, सरळ, स्पष्ट अशी असेल. ती येईल व एकदम हृदयांत शिरेल. तिच्यात कळकळ असेल व पाल्हाळ नसेल; तिच्यात संयम असेल, अमर्यादपणा नसेल. भविष्यकालीन कलेत हे गुण केवळ यांत्रिक रीतीने निर्माण केले जाणार नाहीत, तर त्यांची केळवणे देण्यात येईल. सदभिरुचि निर्माण करण्यात येईल, दृष्टि निर्मळ करण्यात येईल, रुचीला वळण लावण्यात येईल. भविष्यकालीन कलेत सर्वांचा प्रवेश होईल कारण आजच्यासारखी काही धंदेवाईक लोकांनाच कलाचे शिक्षण देणारी अशी कलागृहे अस्तित्वात राहणार नाहीत. अक्षरज्ञानाबरोबरच संगीत व रेखाकला यांचे ज्ञान प्राथमिक शाळांतून देण्यात येईल. ते शिक्षण इतकेच असे देण्यात येईल की कोणालाही जर वाटले की आपला या कलांकडे ओढा आहे तर त्याला त्या शिक्षणाच्या जोरावर, कलाभूत तत्वांच्या मिळालेल्या त्या ज्ञानावर स्वत: त्या त्या कलांत पुढे जाता येईल, प्राविण्य प्राप्त करून घेता येईल, पूर्णतेकडे पोचता येईल.
खास कलाशिक्षण देणारी म्हणून जर कलागृहे नसतील तर कलेचे शास्त्र बिघडेल, कलेचे तंत्र अध:पतीत होईल, अशी काहींना भीती वाटते. कलेमध्ये आज जी दुर्बोधता असते, ती आणणे म्हणजेच जर तंत्र असेल, एवढाच जर तंत्राचा अर्थ असेल, तर ते तंत्र बिघडेल यात संशय नाही. परंतु स्पष्टपणा, बिशदता, सरलता, संक्षिप्तता व तळमळ या गुणांनी जर कलेचं शस्त्र व कलेचं तंत्र होत असेल, तर ते तंत्र मात्र न बिघडता उलट शतपटीने सुधारेल. या तंत्रासाठी खास कलागृहे तर नकोतच, परंतु प्राथमिक शाळांतून संगीत, चित्र वगैरे कलांचे जे ज्ञान देण्यात यावे म्हणून मी वर म्हटले, ते ज्ञानसुध्दा देण्यात आले नाही तरी चालेल. कारण बहुजनसमाजातील कलावान् माणसे उद्याच्या कलेचे निर्माते होतील. खेडयापाडयातील झोपडयांतून राहणारे, फाटक्या चिंध्या धारण करणारे असे ते कलावान् उद्यांची कला निर्माण करतील. ते असे उत्कृष्ट नमुने निर्माण करतील की त्यातून कलेचे नवीन तंत्र व नवीन शास्त्र तयार होईल. आजसुध्दा प्रत्येक कलावान् आपल्या विवक्षित कलेचे तंत्र कलागृहातून न शिकता, प्रत्यक्ष जीवनातूनच शेवटी घेतो. कलाप्रांतातील जे थोर कलापती, जे थोर कलागुरू, जे थोर कलानिर्माते, त्यांच्या कृतीचा अभ्यास करूनच, त्यांच्याजवळ राहूनच कलातंत्र आजही शिकावे लागते. राष्ट्रांतील सर्व उत्कृष्ट कलावान्-केवळ वरच्या वर्गातीलच नव्हे-जेंव्हा कला निर्माण करू लागतील, तेंव्हा अशा कलाकृतींचे नमुने जास्तच पहावयास मिळतील; असे आदर्श कलावानही जास्त सापडतील. शाळांतून जे शिक्षण मिळाले नसेल, स्वतंत्र कलागृहांतून जे मिळण्याची सोय नसेल, त्याची भरपाई या ठायी ठायी उघडलेल्या जिवंत शाळांतून कितीतरी पटीने केली जाईल. खरे शिक्षण त्या त्या कलेतील थोर कलापतींच्या चरणांजवळ बसूनच मिळत असते. असे मिळणारे शिक्षण हे जिवंत बसते, जिव्हाळयाचे असते. कलागृहांतल्या शिक्षणाप्रमाणे ठराविक, सांचीव व कृत्रिम नसते. ज्यावेळेस सर्व राष्ट्रांतील कलावान् कला निर्माण करू लागतील तेंव्हा सत्कलांचे नमुने सर्वत्र पहावयास मिळू लागतील व ज्यांचे डोळे नीट सावध व उघडे राहतील त्याला उत्कृष्ट शिक्षण मिळाल्याशिवाय राहणार नाही.
भविष्यकालीन कला व आजची कला ह्यांच्यातील हा एक मोठा फरक सांगितला. दुसरा फरक म्हणजे भविष्यकालीन कलेचे निर्माते पगारी व भाडोत्री असणार नाहीत. कोणातेही इतर श्रम न करता केवळ कलेच्या कामातच राहणारे व त्यासाठी पैसे घेणारे असे ते नसतील. भविष्यकाळातील कलावान् नानाप्रकारचे जीवनोपयोगी श्रम करीत राहतील. जीवनातील हे नानाविध अनुभव घेत असता त्यांच्या हृदयांत भावना जमा होतील. त्या भावना जेंव्हा उत्कट होतील, त्या भावना जेंव्हा पोटात मावणार नाहीत, ते भावनांचे बालक पोटातून बाहेर येण्यासाठी जेंव्हा आत चुळबुळ करू लागेल, तेंव्हाच भविष्यकालीन कलावान् कलाकृती निर्माण करतील. त्यांच्या कलाकृती, त्यांच्या जीवनाच्या रंगाने रंगलेल्या तसेच, बाळसेदार व हृदयंगम अशा असतील. कोणालाही त्या कलाकृती जवळ घ्याव्या व हृदयी धराव्या असे वाटेल.