कला म्हणजे काय? 114
प्रकरण अठरावे
(भविष्यकालीन कला ही काही थोडया निवडक लोकांची न राहता ती सर्व मानवजातीची होईल व पूर्णता आणि ऐक्य यांच्याकडे घेऊन जाणारी अशी होईल.)
लोक पुष्कळ वेळा भविष्यकालीन कलेसंबंधी बोलत असतात. आज वरच्या वर्गाची जी कला सर्वोच्च म्हणून मानली जात आहे, तिच्यातूनच उद्याची कला नवरूप धारण करून सोज्वळ होऊन बाहेर पडेल असे म्हटले जाते. परंतु अशा प्रकारची ती उद्याची कला खास नसणार. युरोपातील वरच्या वर्गांनी आजची कला असंग्राहक आहे व अंधाराने भरलेल्या बोळात शिरली आहे, ती आपला राजमार्ग विसरली आहे. ज्या दिशेने ती जात आहे, ती दिशा तिला कोठेच घेऊन जाणार नाही. कलेला अत्यंत आवश्यक अशा वस्तूंची एकदा कायमची फारकत झाल्यामुळे (धार्मिक भावनांचा प्रकाश व ओलावा नाहीसा झाल्यामुळे) ही कला दिवसेंदिवस अधिकाधिक अशी होऊन बसली आहे. ती मेल्यासारखी आहे. तिला आता विकास नाही, तिच्यातून नवीन बाळ जन्माला येणार नाही. ज्या भविष्यकालीन कलेचा उष:काल होऊ पहात आहे, ती ह्या मृतवत् कलेचे विकसित रूप म्हणून असणार नाही, आजच्या एकांगी कलेचीच नूतन वाढ म्हणून ती असणार नाही. तिचा पाया नविनच असेल, तिचे उगमस्थान निराळेच असेल. वरच्या वर्गातील कलेची ध्येये उद्याच्या नवकलेची असणार नाहीत. ज्या विचारांकडे आजच्या कलेचे मार्गदर्शकत्व आहे, ते विचार उद्याच्या कलेचे वाटाडे असणार नाहीत.
अखिल मानवी समाजात जी कला सर्वत्र पसरून राहिली आहे. त्या कलेमधून भावी कलेचे स्वरूप बनविण्यात येईल. भावी कलेला अखिल मानवजातीच्या कलेचे रूप असेल. ती केवळ वरच्या वर्गातील लोकांच्या भावना रंगवीत बसणार नाही; तर आजकालच्या परमोच्च अशा ज्या धार्मिक भावना त्यांचे आविष्करण ती करील. अशा कलाकृतीचेच उद्या कौतुक करण्यांत येईल. ज्या भावना मानवांना एकत्र आणतील, एकत्र बांधतील अशा भावना देणा-या कलाकृतींचा गौरव करण्यात येईल. अशा कलेलाच समाजात मान वर करून वावरता येईल, अशा कलेचाच प्रसार होईल. संकुचित जुन्यापुराण्या, टाकाऊ, भेदोत्पादक, अशा भावना देणा-या कलेला नष्ट करण्यात येईल. संकुचित धर्माभिमानाच्या भावना देणारी कला, आपलेच राष्ट्र काय ते सुसंस्कृत अशी प्रौढी मारून देशाभिमानाच्या नावाखाली राष्ट्राराष्ट्रात द्वेषभावना उत्पन्न होणारी आंधळी राष्ट्रीय कला, सुख, विलास, वासना यांनाच उत्तेजन देणारी अत्यंत क्षुद्र अशी कला, नानाप्रकारच्या काल्पनिक भीति उत्पन्न करणा-या कला (भुते, प्रेते, पिशाच्ये, ग्रह, राशी इत्यादि) या सर्वांना तुच्छ मानण्यात येईल. आपापल्या विवक्षित वर्गाचीच सुखदु:खे प्रगट करणारी कला, तिची कोणी निंदाही करणार नाही. तिच्याकडे फारसे लक्षच देण्यात येणार नाही आणि कलेची किंमत ठरविण्याचे कामही आज ज्याप्रमाणे आहे, त्याप्रमाणे फक्त श्रीमंत व वरच्या वर्गाकडे न राहता, सारा समाज ते काम करील.
एखाद्या कलावानाला स्वत:ची कलाकृती जर उत्कृष्ट ठरावयास पाहिजे असेल, आपल्या कलेचा सर्वत्र प्रसार व्हावा असे जर वाटत असेल, तिचे सर्वत्र नाव व्हावे अशी जर त्याची इच्छा असेल, तर त्याच्या कृतीने बहुजन समाजाच्या हृदयाला चटका लावला पाहिजे. श्रमणारे व खपणारे जे कोटयवधी लोक, ज्यांचे जीवन नैसर्गिक असते, ज्यांच्या रुचि विकृत झालेल्या नसतात, अशा लोकांच्या हृदयाच्या व बुध्दीच्या मागणीस त्याने खाद्य दिले पाहिजे. त्याच्या कलाकृतीने काही अपवादात्मक सुखस्थितीत असणा-या मूठभर लोकांच्या मनोबुध्दीस आता गुदगुदल्या करून चालणार नाही.
भविष्यकाळातील कलावान एखाद्या लहानशा विवक्षित वर्गातलेच नसतील, ते केवळ वरच्या वर्गातील, किंवा वरच्या वर्गातील श्रीमंतांची खुशामत करणारे असे नसतील समाजात ज्याला ज्याला म्हणून ही ईश्वरी देणगी मिळालेली आहे, ज्याचा ज्याचा म्हणून कलेकडे कल आहे, ओढा आहे, ते सारे कलासेवक, कलानिर्माते म्हणून पुढे येतील.