कला म्हणजे काय? 3
ते तीन व्यवस्थापक संगीत, गायनवादन, मिरवणूक वगैरे सर्व होणा-या कार्यक्रमाची व्यवस्था ठेवीत होते. मिरवणुकीमध्यें स्त्रीपुरुष जोडप्यानें जात होतीं. त्यांच्या खांद्यावर लखलख करणारे, झिल्हई केलेले परशु होते. पडद्याच्या एका बाजूनें ही सारी मंडळी आली व वर्तुलाकार वाटोळी झाली, नंतर थांबली. हा मिरवणुकीचा प्रवेश बराच वेळ चालला होता. कारण ती निर्दोषपणें पार पाडावयास फार त्रास झाला. पहिल्या वेळेला ते परशु खांद्यावर टाकलेले इंडियन फारच जलदीनें चालत आले; दुस-या वेळेस आले तर फारच मंदगतीनें आले; तिस-या वेळेस त्यांची गति योग्य प्रमाणांत होती, परंतु पडद्यांत जाण्याच्या वेळेस त्यांनीं एकदम घोळका केला; चौथ्या वेळेस त्यांनी घोळका केला नाहीं, गतिसुध्दां प्रमाणांत होती, परंतु रंगभूमीच्या बाजूलाच कसे तरी सारे उभे राहिले ! अशा प्रकारें प्रत्येक वेळेला कांहींना कांहीं चुके व पुन: पहिल्यापासून मिरवणुकीस आरंभ होई. मिरवणूक सुरु होण्याच्या आधीं तुर्की पध्दतीचा पोषाख घातलेला एक नट येई व कांहींशा विचित्र पध्दतीनें तोंड उघडून “ वधू घरीं मी आणितों ” हें गाणें गायी. तो गाणें म्हणें व आपला उघडा हात हालवी. त्यानंतर वर सांगितलेल्या मिरवणुकीस आरंभ होई. मिरवणुकींतील लोक बरोबर व्यवस्थित चालूं लागतात, परंतु तिकडे वाजविणारा काहींतरी चूक करतो. फ्रेंच पध्दतीचे शिंग वाजविणारा त्यांची चूक झाली ! आरामखुर्चीतील व्यवस्थापकाच्या हातांतील छडी वाजली. कांहींतरी अब्रह्मण्यं घडलें, जणूं मोठा उत्पादच झाला. छडी वाजतांच सारें गाडें एकदम थांबलें. तो व्यवस्थापक वाद्यविशारदांकडे वळून त्यांच्यातील त्या शिंग वाजविणा-याची हजेरी घेतो, त्याला चांगलाच फैलावर घेतो. बोलूं नये तें त्याला बोलतो, शिव्या देऊं नयेत अशा शिव्या त्याला तो देतो. ही समज दिल्यानंतर पुन्हां पहिल्यापासून सारें सुरुं होतें ! ते खांद्यावर परशु टाकलेले इंडियन लोक येतात त्यांच्या पायांत फार सुंदर व उंची असे बूट असतात. अत्यंत हळुवार व अळुमाळ पावलें टाकीत ते येतात. “ घरीं वधू मी आणिली ” हें गाणें होतें. परंतु मिरवणुकींतील तीं जोडपीं एकमेकांच्या फारच जवळ येतात. तिकडे जोरानें छडी वाजते. पुन्हां खरडपट्टी व पुन्हां नव्यानें आरंभ ! पुनश्च “ घरीं वधू मी आणिली ”, पुन्हां ते हातवारे, पुन्हां ती मिरवणूक. कांहींचीं तोंडें गंभीर, कांहींचीं दु:खीं, कांहींचीं आनंदी ! कांहीं बोलतात, कांहीं मुके असतात ! वर्तुलाकार होऊन सारेच गाऊं लागतात. सुरळीतपणें आतां सारें पार पडणार असें वाटूं लागतें. परंतु छे, ती पहा छमछम छडी वाजली. व्यवस्थापक त्रासल्यासारख्या आवाजांत सर्वांवर तोंडसुख घेतो. परंतु काय चुकलें हें समजेना. मंडळीं मधूनमधून हात वर करावयाला विसरली होती ! तो व्यवस्थापक संतापानें ओरडला. सारे मेलेत कीं काय ? झालें काय तुम्हांला ? बैल बरे तुमच्यापेक्षां. हातपाय नीट हलवायला, वर-खालीं करायला काय झालें ? जसे जेवलेले नाहींत; मुडदे जसे. “ पुन्हां पहिल्यापासून आरंभ ! पुन्हां ते सारे प्रकार, कांही गंभीर, कांहीं हंसरी, कांहीं बोलकी अशी ती तोंडें ! बाया गाणें गातात. प्रथम एक नंतर दुसरी हयाप्रमाणें हात वर करितात. परंतु दोन मुली एकमेकींजवळ कांहींतरी बोलतात- त्यामुळें सारी शिस्त बिघडली ! टेबलावर छडी वाजली. “ येथें काय गप्पामारायला आलांत होय ? घरीं मारा कीं गप्पा ! येथें काम करा नेमलेलें, आणि तूं रे- ए लाल विजार घातलेल्या- तूं दूर किती गेलास, जरा जवळ हो. माझ्याकडे बघा सारीं. हां-करा पुन्हां सुरु.”
अशा प्रकारचा हा तमाशा सहा सहा तास चालतो. छडीचें वाजणें पुन: पुन्हां प्रारंभ, पुन्हां नीट उभें राहणें, गाणा-यांच्या चुका तर कधीं वाजविणा-यांच्या, तर कधीं नाचणा-यांच्या ! आणि त्या सर्वांना सुधारण्यासाठीं व्यवस्थापकांची प्रवचनें. त्यानें दिलेल्या शिव्या, केलेंल्या कानउघाडणी ! असें हें कलेचें अपूर्व मिश्रण तिथें पहावयास मिळत होतें. “गध्दे, बैल, डुक्कर, टोणप्ये, हल्ये”-इत्यादि शेलकीं विशेषणें काम करणा-या मंडळींना दिलेली मी तासांत चाळीस वेळां ऐकलीं. त्या शिव्या ज्याला ऐकून घ्याव्या लागत, तो त्या मुकाटयानें ऐकून घेई. मग ती व्यक्ति गाणारी असो, वा वाजविणारी असो; नाचणारी असो वा मिरवणुकीतील असो; स्त्री असो वा पुरुष असो ब्र. काढण्याची कुणाची छाती नव्हती. सारे पतित झालेले असतात. त्यांच्याजवळ तिळभरहि स्वाभिमान उरलेला नसतो. त्यांची माणुसकी मेलेली असते. जसें सांगावें त्याप्रमाणें सारे करितात. हुकूमाचे सारे बंदे. “घरीं वधू मी आणिली”, हें गाणें वीस वेळां पुन: पुन्हां म्हटलेलें ऐकूं आलें ! पयांत पिवळे बूट, खांद्यावर परशु अशी ती मिरवणूक पुन: पुन्हां वीस वेळां सुरु झाली ! हीं माणेसं इतकीं हीनदीन व हतपतित झालेली असतात कीं त्यांना खांद्यावर परशु टाकून रंगभूमीवर फिरणें, पिवळे बूट घालणें, शिंगे वाजविणें, या पलीकडे कांहीएक करतां येणें शक्य नसतें. व्यवस्थापकाला ही गोष्ट माहीत असते, त्या लोकांना ऐषआरामाच्या जीवनाची, खावें-प्यावें व लोळावें या जीवनाची एक चटक लागलेली असते कीं तें जीवन गमावून बसणें म्हणजे मरणें असें त्यांना वाटतें. ग्रामी सूकराचें असें हें जीवन आपल्यापासून जाऊं नये म्हणून वाटेल त्या शिव्या व वाटेल ते अपमान मुकाटयानें ते सहन करितात. त्यांची ही वृत्ति व्यवस्थापकाला माहीत असते; म्हणूनच वाटेल तें तो बोलतो, चावटपणा करितो. शिवाय पॅरिस, व्हिएन्ना अशा मोठमोठया राजधानींतूनहि असेच प्रकार चाललेले असतात हें व्यवस्थापकानें पाहिलेलें असतें. उत्कृष्ट व्यवस्थापकांनीं असेंच वागले पाहिजे अशी त्याची समजूत झालेली असते. शिवाय थोर कलावंतांची अशी एक कलात्मक परंपरा आहे कीं दुस-याच्या भावनांकडे ते लक्ष देत नाहीत. आपल्या कलात्मक कार्यांत, कलात्मक व्यवसांयांत ते इतके मग्न असतात, त्या कर्याचें त्यांना इतकें महत्त्व वाटतें की दुसरीकडे लक्ष देण्यास त्यांना सवडच नसते आणि दुस-याच्या भावनांकडे पाहण्याचें त्यांना महत्त्वहि वाटत नसतें.