कला म्हणजे काय? 37
आणि हे सांगितले पाहिजे की अशा ह्या धर्मभावशून्य वरच्या वर्गातच एक नवीन कला उत्पन्न झाली. मनुष्याच्या तत्कालीन थोर धार्मिक भावना प्रकट करण्यात, जागृत करण्यात अत्यंत कुशल म्हणून या कलेला मान नव्हता; तर ती सौंदर्य प्रकट करणारी आहे म्हणून तिचा गौरव केला जाऊ लागला. दुस-या शब्दात सांगावयाचे म्हणजे ज्या मानाने सुखसंवेदना कला देई, त्या मानाने ती चांगली असे समजण्यात येऊ लागले, या दृष्टीने कलेची नावाजणी करण्यात येई, तिला उत्तेजन देण्यात येई.
मंदिरी धर्मातील दंभ व असत्य दिसून आल्यामुळे त्याजवर ज्यांची श्रध्दा बसू शकत नव्हती आणि ख्रिस्ताची खरी शिकवण विलासी, ऐषआरामी, नबाबी थाटाचे सत्तामत अहंकारी जीवन निषेधित असल्यामुळे, तिचा अंगिकार करण्यासही ज्यांना धैर्य नव्हते असे हे धन-कनकसंपन्न सत्ताधीश लोक ज्यांच्या हृदयांत, ज्यांच्या जीवनात धर्माचा ओलावा बिलकूल राहिला नव्हता शेवटी वैयक्तिक सुखभोगाच्या दलदलीत विलासैक जीवनाच्या चिखलात रुतून बसले; कळत नकळत या केवळ भोगमय जीवनाकडेच ते वळले आणि यानंतर लगेच नवयुग आले. मनात उद्भवलेली भोगेच्छा, विलासप्रियता व ती पूर्ण करण्यासाठी लगेच धावून आलेले शास्त्र! मग काय विचारतां.
नवयुग आले. शास्त्र व कला यांचे नवयुग आले. हे नवयुग धर्माला नाकारीत होते एवढेच नव्हे तर कोणत्याही प्रकारच्या धर्माची जरूरीच नाही असे स्वच्छ सांगू लागले. मंदिरी ख्रिस्तीधर्म म्हणजे ती एक सुसंघटित घटना होती. तिला सुधारू पाहाणे, ती बदलू पाहणे म्हणजे ती सारीच मोडून टाकणे होय! ती सर्व इमारत पाडून टाकल्याशिवाय तिच्यात बदल करता येणे शक्य नव्हते. पोपच्या निरंकुश व निरपवाद सत्तेबद्दल संशय उत्पन्न होताच (हा संशय तत्कालीन सर्व सुशिक्षितांचे मनात होता) सर्व परंपरेबद्दल संशय साहजिकपणे उत्पन्न झाला. परंतु परंपरेबद्दल अविश्वास उत्पन्न झाल्याने केवळ भटभिक्षुक व धर्मोपदेशकच नव्हे तर सारा चार्चिक धर्मच धोक्यात आला. ख्रिस्ताचे दिव् संभवत्व, त्रिविधतत्त्वे, पुनरुध्दार सारे निघून गेले. त्याप्रमाणेच धर्मग्रंथाच्या प्रामाण्यालाही फाटा मिळाला. बायबल ईश्वरी प्रेरणेने लिहिलेले आहे असे चर्च सांगे म्हणूनच लोक मानीत. परंतु चर्चलाच फाटा मिळाल्यावर बायबलचे दिव्यत्वही गेले व ते एक मानवी पुस्तक म्हणून मानण्यात येऊ लागले.
त्या काळातील वरच्या वर्गातील बहुतेकांचा-स्वत: पोपांचा व धर्मोपदेशकांचाही-कशावरसुध्दा विश्वास नव्हता. चर्चच्या मतांवर त्यांचा विश्वास नव्हता. कारण त्यात त्यांना दंभ व असत्य धडधडीत दिसत असत. त्याचप्रमाणे फ्रॅन्सिस ऑफ ऍसिसी किंवा पीटर ऑफ चेल्कँझिक् यांचेही अनुकरण त्यांच्याने करवेना.
ख्रिस्ताची सामाजिक व नैतिक शिकवण हे घेत ना, कारण तसे केल्याने स्वत:ची श्रेष्ठता, स्वत:ची वतने त्यांना स्वत:चे विशिष्ट हक्क या सर्वांना, मुकावे लागले असते. या शिकवणीमुळे त्यांचा सामाजिक श्रेष्ठ दर्जा ढासळून पडला असता. एवं या लोकांच्या जीवनात धर्मदृष्टीच उरली नाही. धर्म नसल्यामुळे कोणतेही माप, कोणतेही प्रमाण, कोणतीही कसोटी त्यांच्याजवळ राहिली नाही. काही आदर्शच नाही, काही मध्येयच नाही, अशी त्यांची स्थिती झाली. सत्कला कोणती, असत्कला कोणती हे ठरविण्यास निर्णायक साधन त्यांच्याजवळ उरले नाही. एकच साधन व एकच प्रमाण त्यांच्याजवळ राहिले, ते म्हणजे स्वत:च्या सुखाचे, स्वत:च्या आनंदाचे. सुखाचा काटा त्यांनी हातात घेतला. सुख ही कसोटी त्यांनी ठरविली. जे सुखवील ते चांगले असे सुटसुटीत समीकरण त्यांनी मांडले. जे सुंदर ते चांगले, जे सुखवील ते चांगले असे प्रमाण ठरवून प्राचीन ग्रीक लोकांची कलेसंबंधीची जी स्थूल कल्पना होती. तीच या सुशिक्षित व श्रीमंत अशा धर्महीन युरोपियन लोकांनी उचलली. परंतु प्लेटोने त्यावेळेसच ग्रीक कलेचा निषेध केला होता. सुख ह्या जीवनाचा अर्थ असे एकदा ठरल्यावर तदनुरूप कलेचे शास्त्रही निर्माण झाले.
(१ टीप :- चेल्क्झिक् हा बोहिमियन होता. जॉन हस्च्या पाठीमागून येणा-यांतील हा एक होता. १४५७ मध्ये 'संमीलित बांधव' या संस्थेचा तो पुढारी होता. कोणत्याही प्रकारे प्रतिकार करावयाचा नाही असे याचे मत होते. 'The net of faith -' श्रध्देचे जाळे' या अलौकिक पुस्तकाचा तो कर्ता. चर्च व स्टेट-धर्मसत्ता व राजसत्ता यांविरुध्द ते होते. टॉलस्टॉयने ''देवाचे राज्य तुझ्याममध्ये आहे'' या आपल्या पुस्तकांत या ग्रंथाचा उल्लेख केला आहे.)