कला म्हणजे काय? 102
आणि माझे त्याला शांत व स्पष्ट उत्तर आहे की, ''नाही, त्रिवार नाही.'' मी जे हे वर सारे सांगितले आहे त्याचा हेतू एवढाच की, कलाकृतींच्या गुणदोषांची छाननी करावयास काही तरी निश्चित प्रमाण आपणाजवळ असावे आणि मी जे प्रमाण मांडले आहे, त्या प्रमाणानुसार पहावयाचे झाले, त्या कसोटीवर घासून पाहून म्हणावयाचे झाले तर असेच म्हणावे लागेल की बीथोव्हेनची ती ९ वी रचना खरी कला नाही. ज्याची विवेकबुध्दी शाबूत आहे तो हेच म्हणेल. काही विशिष्ट ठराविक कृती व काही ठरीव साच्याचे कलावान यांनाच श्रेष्ठ मानण्याची केळवणी ज्यांना मिळालेली असते, आणि अशा केळवणीमुळे ज्यांची रूची बिघडलेली असते, अशा माणसांना बीथोव्हेनसारख्यांना नावे ठेवलेली पाहून महान आश्चर्य वाटेल; परंतु आमची निर्णयशक्ती व आमची सारासार बुध्दी जे सांगतात, ते आम्ही कसे सोडावे, त्याचा अव्हेर आम्ही कसा करावा?
बीथोव्हेनची ही ९ वी रागिणी उत्कृष्ट कलाकृती म्हणून मानली जाते. ही उत्कृष्ट आहे की नाही, ते ठरविण्यापूर्वी ही कलाकृती उच्चतम अशी धार्मिक भावना देते देणे भाग आहे. कारण उच्च भावना देणे ही केवळ संगीतात शक्ती नाही. परंतु मी पुन्हा प्रश्न करतो. या कलाकृतीत परमोच्च धर्मभावना नसू दे. परंतु कलेचा जो दुसरा विशेष-सामान्य जनांच्या हृदयाला अनुभवनीय अशा सुखदु:खाच्या, निरागस गमतीच्या, आनंदाच्या भावना तरी या रचनेत मिळतात का? एका भावनेत सर्वांन रंगविणे व डुंबविणे हा जो विश्वजनांच्या कलेचा विशेष तो तरी तेथे आहे का? उत्तर नकारार्थीच द्यावे लागत आहे. या कलाकृतीत संमिश्र, गुंतागुंतीच्या, अस्पष्ट, एक प्रकारच्या मादक व कैफ आणणा-या ज्या भावना त्या काही विशिष्ट पध्दतीने वाढलेल्या व शिकलेल्या लोकांसज समजणार; बहुजन समाजाला ह्या मोघम भावना समजणार नाहीत. ह्या कृत्रिम व दुर्बोध रचनेतील भावना ज्यांची हृदये हलवतील असे लोक मजसमोर दिसत नाहीत. मधलेमधले काही तुटक भाग समजतील, परंतु अनंत असा जो अज्ञेय सागर त्यांतील ती क्षुद्र ठिकाणे होत. म्हणून मला आवडो वा न आवडो, मला हे सत्य सांगितलेच पाहिजे की ही कलाकृती कृत्रिम कलेतच जमा होईल. आश्चर्याची गोष्ट अशी की या रचनेच्या शेवटी शिलरची एक कविता जोडलेली आहे. या कवितेत शिलर (जरा दुर्बोध रीतीने) हाच विचार सांगत आहे की ''आनंदाच्या भावना सर्वांना जोडतात, सर्वांच्या हृदयांत प्रेम उत्पन्न करतात;'' परंतु या विचारांना अनुरूप असा राग, अनुरूप असा स्वरमेळ या कवितेत नाही. लोकांचे हृदय उचंबळवील, हृदये मोहून टाकील असे येथे काही नाही. काही लोकांच्याच हृदयांचे ऐक्य हे संगीत करू शकेल. ते सर्वांना जोडू शकणार नाही. मानवजातीपासून काही विशिष्ट वर्गांना बाजूला घेऊन त्यांच्याजवळ कानगोष्टी करणारे हे संगीत आहे.
सर्व कलाशाखांतून हाच प्रकार. वरच्या वर्गातील लोकांनी ज्या कलाकृती थोर व चांगल्या म्हणून ठरविल्या, त्यांच्या बाबतीत पुन्हा नव्याने निर्माण केला पाहिजे. डान्टेची डिव्हाइन कॉमेडी किंवा शेक्सपिअर, गटे यांच्याही अनेक कलाकृतींना पुन्हा फेरविचार करून मत दिले पाहिजे. रॅफेलसारख्या चित्रकारांच्या काही कृतींचाही नवीन निर्णायक कसोटीप्रमाणे फेरचिवार करणे जरूर आहे.
कलाकृती कोणतीही असो, कोणाचीही असतो, आजपर्यंत तिची कितीही नावाजणी झालेली असो, आपण ती कलाकृती ख-या भावना-कलावानाच्या हृदयांतील भावना कळकळीने व स्पष्टपणे मांडीत आहे की नाही हे आधी पहावे. या कसोटीनंतर मग दुसरी कसोटी. ज्या भावना दिल्या जातात, त्या खिस्ताच्या शिकवणीच्या विरूध्द आहेत का? त्या मानवांचे ऐक्य करणा-या आहेत, की त्यांना अलग अलग करणा-या आहेत? आणि ही धर्मभावना नसेल तर सांसारिकांची सरळ व सर्वव्यापी भावना ती तरी आहे का? सर्वांना जोडणारी श्रेष्ठ धर्मभावना किंवा सर्वांच्या हृदयाला अनुभव आणून देणारी सामान्य सांसारिक सुखदु:खाची भावना-कोणती तरी ह्या दोहोंतील भावना असली पाहिजे. ईश्वराबद्दलचे व सर्व मानवजातीचे प्रेम देणारी असेल तर त्या कलेचा खरी ख्रिस्ती धर्मकला म्हणू. सर्वांना जोडणारी सांसारिक अनुभवाची भावना असेल तर विश्वजनांची कला म्हणू. या उभयविध भावना जेथे मिळणार नाहीत, त्या कलाकृती असत् समजल्या पाहिजेत.
आज आपल्या समाजात कलेच्या नावाखाली जे अनंत व अपार साहित्य पडलेले आहे, त्याची निवड वरील कसोटी लावून केली पाहिजे. ज्या कलाकृती खरोखर महत्त्वाच्या, अत्यंत आवश्यक व दिव्य आध्यात्मिक चारा देणा-या, त्यांना इतर निरूपयोगी, क्षुद्र व अपायकारक भावना देणा-या कलाकृतींपासून निवडून काढले पाहिजे. असे केल्यानेच दुष्ट कलेच्या हल्ल्यापासून व परिणामांपासून आपण बचावू आणि सत्कलेपासून होणारा जो फायदा व उपयोग त्याचा अनुभव घेऊ शकू. कलेचे खरे कार्य मानवजातीचे जे उच्च जीवन त्याला फार उपयुक्त असे आहे. सत्कलेच्या आधारावाचून व सहाय्यावाचून व्यक्तीची किंवा अखिल मानवी समाजाची प्रगती व उन्नती होणे कठीण आहे, अशक्यच आहे.