कला म्हणजे काय? 122
याप्रमाणे शास्त्राचा एक भाग जीवनाचे ध्येय गाठण्यासाठी, मानवी जीवन कृतार्थ करण्यासाठी, मानवाने कसे वागले पाहिजे नाना गंभीरपणे अभ्यास व विचार करण्याऐवजी, जी खोटी, उघड उघड वाईट, अन्याय्य व दुष्ट अशी समाजरचना अस्तित्वात आहे तीच अभंग व योग्य आहे. तिच्यात काडीइतकाही फेरबदल करण्याची जरूर नाही, फेरबदल करता कामा नये असे म्हणत आहे; आणि दुसरी भौतिक शास्त्रे जे जे मनात येईल, जेथे जेथे जिज्ञासा जाईल त्याचा किंवा काही धंद्यातील, यंत्रातील सुधारणांचाच अभ्यास करीत आहेत.
शास्त्रातील पहिला सामाजिक शास्त्राचा जो भाग, तो तर फारच दुष्ट आहे. लोकांच्या विचारात पोटाळा उत्पन्न करून खोटेच सिध्दांत व निर्णय ही शास्त्रे देतात एवढेच नव्हे, तर या शास्त्राचे नुसते अस्तित्वसुध्दा अपायकारक आहे. जे स्थान ख-या शास्त्राचे ते स्थान बळकावून ही शास्त्रे फार खोडसाळपणा करीत आहेत. जीवनातील महत्त्वाच्या प्रश्नांसंबंधी ज्या ज्या माणसाला विचार करावयाचा असतो व विचार मांडावयाचा असतो, त्या माणसाला आपल्या आयुष्यातील बराचसा मौल्यवान् भाग या खोटया शास्त्रांनी उभारलेले जे भक्कम किल्लेकोट त्यांना जमीनदोस्त करण्यात जातो. शतकानुशतके या खोटया शास्त्रांनी सारी बुध्दी खर्च करून, सारी चतुराई दाखवून असत् व भ्रामक कल्पनांचे मनोरे, दुष्ट व खोडसाळ कल्पनांचे बंधारे बांधून ठेविले आहेत. त्या नवीन विचारवंताला, जीवनाकडे गंभीरपणे पाहणा-या त्या पुरुषाला या सा-याच धुळधाण केल्याशिवाय गत्यंतर नसते. हे सारे मोडून तोडून टाकण्यातच त्याला आधी अपरंपार श्रम पडतात. जुने सारे नाहीसे केल्याशिवाय त्या तत्त्व जिज्ञासूला नवीन उभारता येत नाही. जुने खोडावयाचे तेंव्हा नवीन मांडावयाचे!
आणि शास्त्रांचा दुसरा भाग-ती सारी भौतिक शास्त्रे-तेथे तर विचारच नको. कोण त्या शास्त्रांची ऐट, काय ती मिजास, केवढा अहंकार, किती घमेंड. या शास्त्रांना कोठे ठेवू आणि कोठे न ठेवू असे अर्वाचीन युगाला झाले आहे. या भौतिक शास्त्रांनाच यथार्थ शास्त्र म्हणून सारे संबोधीत असतात. ही शास्त्रेही अपायकारकच आहेत. कारण ख-या महत्त्वाच्या गोष्टीकडे मानवाचे चित्त वेधून घेण्याऐवजी क्षुद्र व चिल्लर गोष्टींकडेच ते ही शास्त्रे ओढून घेतात. आणि जी सध्याची समाजरचना-जी योग्य म्हणून वर सांगितलेली पहिली सामाजिक शास्त्रे निर्णय देत असतात, त्या या विषम समाजरचनेत तर ही भौतिक शास्त्रे फारच नाश करून राहिली आहेत. कारण या शास्त्रांमुळे जे नाना शोध लागतात, जी यंत्रे निर्माण होतात, जी ही औद्योगिक क्रांती होत आहे, त्या सर्वांचा उपयोग मानवाच्या हितार्थ केला जात नसून, मानवाच्या नाशार्थच केला जात आहे.
या भौतिक शास्त्रांना वाटत असते की आपण केवढाले शोध लाविले, शाबास आमची! परंतु हे लोक आपल्या सभोवती काय चालले आहे, खरे महत्त्वाचे जगात काय आहे, इकडे लक्षच कधी देत नाहीत, त्यामुळे त्यांचे शोध त्यांना फार अभिमानास्पद वाटतात. स्वत:च्या अभ्यासनीय वस्तूंकडे ते एका विशिष्ट मानसिक भूमिकेवरून पहात असतात, एका विशिष्ट वैचारिक दुर्बिणीतून पहात असतात. परंतु त्या भूमिकेवरून त्यांना खाली ओढा, ती दुर्बिण त्यांच्या हातातून जरा काढून घ्या, म्हणजे लगेच स्वत:च्या अभ्यसनीय वस्तूंचा क्षुद्रपणा व तुच्छपणा त्यांना कळून येईल. धर्म, नीति व सामाजिक रचना हे प्रश्न सोडविल्याशिवाय या भौतिक शास्त्रांचा खरा उपयोग नाही. तोपर्यंत ही शास्त्रे अपायकारक व हानिकारकच ठरणार. सर्वांत महत्त्वाचे प्रश्न हे तीन आहेत. यांचे ज्ञान अत्यंत आवश्यक आहे. या तीन जीवनातील महा-प्रश्नांच्या अभ्यासासमोर व संशोधनासमोर व भौतिक शास्त्रांना अभ्यास व शोध अत्यंत तुच्छ व क्षुद्र दिसतो. त्यांची ती सूक्ष्म गणिते, भूमितीतील गहन गूढ प्रमेये, आकाशगंगेतील ता-यांची पृथ:करणे, अणूंचे स्वरूप व घटना, निरनिराळया वायूंचे अभ्यास, पाषाणयुगातील सापडलेल्या माणसाच्या डोक्याच्या कवठयांची लांबीरुंदी ह्याच गोष्टी नव्हेत तर त्यांचे ते अत्यंत उपयुक्त असे क्ष-किरण, सूक्ष्मजंतुविद्या, आणि इतर अतिउपयुक्त म्हणून असणारी ज्ञानेही सामाजिक प्रश्नांच्या ज्ञानपुढे तुच्छ आहेत. परंतु या महत्त्वाच्या सामाजिक प्रश्नांचा अभ्यास करणारे आजचे आचार्य हे स्थितस्य समर्थन आपलीकडे काहीएक करीत नाहीत. आजचे अर्थशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ हे विपरीतमति व विकृतमति झालेले आहेत. सामाजिक विपत्तींची, सामाजिक विषमतेची, आजुबाजूला असलेल्या विराट दु:खाची त्यांना कल्पनाही शिवत नाही. संपत्तीची विभागणी कशी करावी, अर्थशास्त्र कसे सारे आमुलाग्र बदलले पाहिजे याची त्यांना फिकीरच वाटत नाही. सृष्टीत विषमता असावयाचीच. सृष्टीत सारेच गुलाब कसे होणार? काही सुखी, काही दु:खी, काही ढेरपोटये, काही खप्पडपोटये असावयाचेच, असे हे सामाजिक शास्त्रांचे अभ्यास करणारे म्हणत आहेत आणि भौतिकशास्त्रवाले तेही दुस-या गोष्टींतच दंग आहेत! या भौतिक शास्त्रज्ञांना समजले पाहिजे की जे जे दिसेल व जे जे चमत्कृतिमय आहे, ज्याने ज्याने जिज्ञासा जागृत होते, कुतूहूल वाढते, त्याचा त्याचा अभ्यास करीत सुटणे म्हणजे शास्त्र नव्हे, हा पोरखेळ झाला. मानवाचे जीवन कसे असावे, त्या जीवनाला कसे वळण द्यावे, त्यात काय फरक करावेत इत्यादि गोष्टींचे संशोधन करणे म्हणजे खरे शास्त्र होय. शास्त्राने ह्या गोष्टींचा आधी मनापासून अभ्यास केला पाहिजे.