कला म्हणजे काय? 99
आपले तोंड रूमालाने झाकून तेथे आरामखुर्चीत ती स्फुंदत असते! बाल्टर रँग्ले याचेही थोर भावना देणारे एक असेच चित्र आहे. त्या चित्राचा उल्लेख मी पूर्वी केला आहे. फ्रेंच चित्रकार मॉर्लोन याचेही एक गोड चित्र आहे. समुद्रांत एक गलबत खडकावर आपटून फटले आहे. त्या गलबताच्या मदतीला जाण्यासाठी तुफानदर्यातून एक लहानशी होडी येत आहे असे ते चित्र होते. थोर भावना देणा-या या चित्रांच्या जवळ येऊन बसणारी अशी दुसरी चित्रे म्हणजे सांसारिक जीवनांतील प्रसंगांची. काबाडकष्ट करणारे शेतकरी व मजूर यांच्या जीवनांची चित्रे मिलेटची चित्रे ह्या प्रकारची आहेत. मोठी सहृदये आहेत ती. विशेषेकरून Man with the hoe हे त्याने काढलेले चित्र अप्रतिमच आहे. याच पध्दतीची जूलेस बेटन, ल्हर्मिट्टे डेफ्रेगार यांची चित्रे आहेत. ईश्वरी व मानवी प्रेम यांचा भंग करण्याबद्दल तिरस्कार व संताप प्रकट करणारी काही चित्रे आहेत. गेचे ''न्याय'' हे चित्र व लायझेन मेयर्सचे ''मरणाच्या शिक्षेवर सही'' हे चित्र; ही या प्रकारची आहेत; असली चित्रे फार नाहीत हे सांगावयास नकोच. चित्रकार बहुतकरून आपल्या तंत्रांत व चित्रांतील सौंदर्यातच इतका गडलेला असतो की भावना स्पष्टपणे त्याला दाखविता येत नाहीत. उदाहरणार्थ, जेरोमीचे Pollice Verso हे चित्र घ्या. या चित्रात रोमन नाटकगृहातील प्रेक्षक आपले आंगठे खाली करून द्वंद्वबुध्दीतील पराभूत वीर मारला जावा असे दर्शवितात, असे दर्शविले आहे. जे काही क्रूर कर्म केले जाणार आहे त्याने अंगावर शहारे येण्याऐवजी चित्रांतील एकंदर देखाव्याच्या सौंदर्यामुळेच मनाला मोह पडत असतो.
आपली वरच्या वर्गाची जी अर्वाचीन कला तिच्यांतून सांसारिक कलेची उदाहरणे देणे-विश्वजनांच्या कलेची उदाहरणे देणे कठीण आहे. विशेषत: साहित्य व संगीत या क्षेत्रांतील उदाहरणे देणे तर अधिकच कठीण आहे. आतील मजकुरावरून काही कृती जरी या सदरांत घालता आल्या, तरी ह्या कृतींचा आस्वाद वरच्या वर्गातीलच लोक घेऊ शकतात. कारण काळ व स्थळ इत्यादीसंबंधीच्या विशेष बारीकसारीक पाल्हाळामुळे तसेच विषयांतील तुटपुंजेपणामुळे या सामान्य लोकांस तितक्या आवडणार नाहीत. यांतील भावनाही तितक्या सर्वसामान्य नसून वरच्या वर्गातील अपवादात्मक अशाच पुष्कळदा असतात. प्राचीन कलेमध्ये अशा काही सामान्य जीवनाच्या गोष्टी आहेत. उदाहरणार्थ जोसेफची गोष्ट; जोसेफच्या गोष्टीशी तुलना करता अर्वाचीन कलेतील अशा प्रकारच्या पुस्तकांतील विष व दारिद्रय दिसून येते. डॉन क्विक्झोट, मोलियरची प्रहसने, डिकन्सची डेव्हिड कॉपरफील्ड कादंबरी व पिक्विकपेपर्स, गोगोल व पुष्किन यांच्या गोष्टी, मोपसांच्या काही गोष्टी-यांना या सामान्य जनांच्या कलेतील उदाहरणे म्हणून-(मोठया कष्टानेच-) देता येतील. जोसेफची प्राचीन गोष्ट किती सुंदर व करुण आहे. जोसेफवर बापाचे फार प्रेम असल्यामुळे त्याच्या भावांस त्याच्याबद्दल वैषम्य वाटते. ते जोसेफला व्यापा-यांना विकून टाकात. पाँटिफरची पत्नी या तरुणास मोह पाडू लागते. हा जोसेफ पुढे मोठया मानमान्यतेस चढतो. तेव्हा तो आपल्या भावांवर दया करतो-बेंजामिन वरही दया करतो. ही जी गोष्ट आहे तिच्यातील भावना कोणत्याही भाषेतून द्या. ही गोष्ट रशियन मनुष्यास, चिनी वा आफ्रिकन मनुष्यास सारखीच समजेल. आबालवृध्दांस, स्त्रीपुरुषांस अशा गोष्टींतील भावना अनुभवता येतात. आणि पुन्हा ह्या जोसेफच्या गोष्टीत पाल्हाळ नाही. अनावश्यक असे काही नाही. ही गोष्ट कोठेही सांगा, कुठल्याही समाजाला सांगा; सर्वांच्या हृदयास ती मोहील, चटका लावील. डॉन क्विझोट किंवा मोलियरच्या नाटकांतील नायकांच्या भावना (जरी अर्वाचीन कलेतील मोलियर हा फार मोठा कलावान आहे आणि सर्वांहून अधिक व्यापक आहे आणि म्हणूनच सर्वांहून थोर आहे) किंवा पिक्विक् व त्याचे मित्र ह्यांच्या भावना-ह्या सर्वसामान्य नाहीत. त्या भावना विशिष्ट काळांतील विशिष्ट लोकांनाच रिझवितील. डिकन्स, मोलियर यांच्या ग्रंथांतील भावना अपवादात्मकच आहेत व म्हणूनच या भावना स्पर्शजन्य करण्यासाठी या ग्रंथकारांना नाना अवडंबरे, स्थळकाळनिषध्द अशा नाना गोष्टी, तेथे उभ्या कराव्या लागल्या आहेत. या बारीकसारीक पाल्हाळामुळे व वर्णनामुळे मुख्य मुद्दा दूरच राहतो व सर्वांना या गोष्टी समजू शकत नाहीत. ग्रंथकाराने जी परिस्थिती वर्णिलेली असते, त्या परिस्थितीचे दर्शन सर्वांना नसते. त्या विशिष्ट परिस्थितीच्या आसमंतात जे कधी आलेले नसतात, त्यांना त्यांतील विनोद व रहस्य आकलन करणे कठीण जाते.