कला म्हणजे काय? 93
आणि अशी धर्मदृष्टी सर्वकाळी सर्व देशांत होती व आजही आहे. या धर्मदृष्टीवरून-त्या त्या काळांतील कला ज्या भावना देते, त्या भावनांचे मूल्यमापन होत असते. आपापल्या काळांतील धर्मदृष्टीवरच कलावान आपापल्या कलाकृती आजपर्यंत उभारीत आले. जी कला धर्ममय दृष्टीला जीवनांत आणण्यासाठी भावनांची ऊब देई, यासाठी म्हणून जनतेच्या हृदयांत भावना उचंबळावी, त्या धर्ममय कलेची फार थोरवी गायिली जाई; त्या कलेला उत्तेजन मिळे, तिची किंमत मोठी मानीत आणि जी कला जुन्याच भावना देत बसे, जुनीच धर्मदृष्टी देत असे, ज्या भावनांतून समाज पुढे गेला, त्याच भावना प्रकट करू पाही, त्या नाविन्यहीन रूढिप्रिय कलेची अवहेलना होत असे. जुन्याचेच तुणतुणे नवीन काळांत वाजवू पाहणा-या अशा कलेला तुच्छ मानण्यात येई. धर्ममय कलेशिवाय इतर जी कला राहिली, ती जर धर्मदृष्टीस अविरोधी व अनपायकारक अशा भावना देत राहिली, तर ती समाजात नांदू शके; परंतु धर्मदृष्टीला विरूध्द भावना देणारी कला मात्र तिरस्कारिली जाई. उदाहरणार्थ, ग्रीकलोकांत सौंदर्य, सामर्थ्य व धैर्य यांच्या भावना देणारी कला पसंत केली जाई, पूज्य मानली जाई; तिला उत्तेजन मिळे, तिची वाहवा करीत. परंतु याच्या उलट जी कला अगदी उघडानागडा विषयविलास सुचवी, किंवा नैराश्य व स्त्रैणत्व यांच्या भावना देई, तिचा ते तिरस्कार व धिक्कार करीत. ज्यूलोकांत तो जो एक देव, त्याला शरण जाणे, त्याच्या इच्छेनुरूप वागणे, हे ज्या कलेत दर्शविलेले असेल ती कला उचलून धरण्यात येई; याच्या उलट असणारी, अनेक देवतांची पूजा शिकविणारी मूर्तिपूजक कला तिचा तिरस्कार करण्यात येई. समाजात जी इतर सामान्य निरपराध कला असे, गोष्टी, कथा, गीते, नाच, घरेदारे रंगविणे, सुंदर भांडी, सुंदर पोषाख, सुंदर वस्त्रे-यांतील कलेची फारशी चर्चा होत नसे; तिच्याकडे फारसे लक्षच देण्यात येत नसे. ती निराळी धर्मदृष्टीला विरोधी अशी एक कला अस्तित्वात आहे असे समजण्यात येत नसे. अशाप्रकारे पूर्वीपासून कलेच्या विषयासंबंधी व भावनांसंबंधी महत्त्वमापन करण्यात आले आहे; आणि या दृष्टीनेच ते ठरविण्यात आले पाहिजे. कारण कलेकडे पाहण्याची ही जी दृष्टी, ती मानवी स्वभावाचे जे मूळ महत्त्वाचे स्वरूप, त्यांतून उत्पन्न झालेली असते. मानवी स्वभावाचे हे विशेष बदलत नसतात. धर्मदृष्टी व धर्मविचार यांत फरक होईल, उत्क्रांती होईल, विकास होईल, परंतु मानवी जीवनांतील प्राणभूत व महत्त्वाचे तत्त्व धर्म हेच राहणार-त्या त्या काळांतील जीवनाची थोर व अत्यंत विकसित अशी जी दृष्टी तीच महत्त्वाची गोष्ट राहणार.
धर्म म्हणजे बावळटपणा व भोळसटपणा आहे असे म्हणणारे व मानणारे आज पुष्कळ लोक आढळतात. मानवजात आता असल्या गोष्टींतून पलीकडे गेली आहे असे ते मानतात व सांगतात. ''मानवजातीला ह्या गोष्टींची आता जरूर नाही. आपणा सर्वांना सामान्य अशी धर्मदृष्टी नसते व म्हणून तिने कलेचे मूल्यमापन करणे अशक्य आहे. आजच्या कलेचे सदसत्त्व ठरविण्यास आज सर्वसामान्य अशी धर्मदृष्टी अस्तित्वातच नाही.'' आजच्या सभ्य व सुसंस्कृत समजल्या जाणा-या लोकांत असे मत प्रचलित आहे, ही गोष्ट मला माहीत आहे. जे लोक ख्रिस्ताची खरी शिकवण ती आपल्या विशिष्ट हक्कांस जखडून टाकणारी अशी आहे, आपले वर्चस्व कमी करणारी आहे म्हणून स्वीकारीत नाहीत; जे लोक धर्माचा ओलावा नसल्यामुळे, नीरस, शुष्क, अर्थशून्य व रित्या झालेल्या स्वत:च्या जीवनांतील कंटाळा मारण्यासाठी नानाप्रकारच्या सौंदर्यविषयक, कलाविषयक व तत्त्वज्ञानविषयक मीमांसा निर्माण करतात; अशा लोकांनी धर्म म्हणजे शुध्द रानवटपणा आहे, धर्म आज हयातच नाही, धर्म मेला व तो जिवंत असण्याची जरूरही नाही. असे म्हटले तर त्यांत आश्चर्य कसले? त्यांना दुसरे काय दिसणार, दुसरे काय सुचणार? हे लोक कधी समजून उमजून किंवा कधी न कळत, थोर धर्मभावनांची जे नानाप्रकारचे धार्मिक विधी असतात, त्यांच्याशी मिसळ करतात. रूढी व धर्म एकच आहे. हे विधी व खरी धर्मभावना एकच आहे, असे हे भासवितात व धर्माची जरूर नाही असे म्हणतात. धार्मिक रूढी व विधी नाकारल्याने, अप्रमाण मानल्याने, खरी धर्मदृष्टीही नाकारली गेली व अप्रमाण मानली गेली असे ते मानतात. परंतु हा असा गोंधळ व घोटाळा करणे योग्य नव्हे. परंतु धर्मावर होणा-या ह्या हल्ल्यांतही धर्मदृष्टीच आहे. जो जीवनाला अर्थ आपण देतो, ती आपली धर्मदृष्टी होय. आजच्या धर्मदृष्टीच्या विरुध्द जीवनाचा अर्थ ठरविण्याचा प्रयत्न जे करतात ते नवीन एक धर्मदृष्टी मांडीत आहेत. एवढाच त्याचा अर्थ ज्यांची जीवने ह्या नवीन दृष्टीप्रमाणे नसतात त्यांना ते तुच्छच मानतात ! सारांश ज्याच्यासाठी जगावे असे वाटते व मरावेसे वाटते, असे आपल्या जीवनाहून थोर जे ध्येय त्यालाच धर्म म्हणतात. ते ध्येय विभिन्न असेल, परंतु ते सर्वांना असणारच. तुम्ही सोडू म्हणाल भले तरी ते तुम्हाला सोडणार नाही.