कला म्हणजे काय? 81
प्रकरण तेरावे
(आपल्या पूर्वग्रहांना विरोधी असणारी सत्ये आपण सहसा ताबडतोब मान्य करीत नाही; सत्कला व असत्कला यांच्या उत्पत्तीचे प्रमाण; रूची-विकृती; खरी कला समजण्याची अपात्रता; उदाहरणे.)
जे सत्य अत्यंत सहज रीतीने समजावे ते पुष्कळवेळा मोठमोठया बुध्दिमंतांसही समजत नाही. ज्यांनी अत्यंत गहन व कठीण अशी शास्त्रीय प्रमेये व सत्ये शोधून काढावी, तत्त्वज्ञानातील, गणितांतील अतिकूट असे प्रश्न समजण्याची ज्यांची पात्रता असते, अशा गाडया पंडितांना अगदी साधे व सरळ असे सत्य पुष्कळवेळा आकलन करणे जड जाते. याचे काय बरे कारण? असे हे आश्चर्य दिसण्याचे काय कारण? याचे कारण हे की जे साधे साधे व सरळ सत्य या पंडितांनी आजपर्यंत उराशी धरलेल्या तत्त्वांच्या विरूध्द असे असते, ते या पंडितांच्या डोक्यांत उतरतच नसते. आजपर्यंत जे सिध्दांत या लोकांनी स्थापलेले असतात, जे विचार अत्यंत प्रिय म्हणून त्यांनी उराशी धरलेले असतात, ज्यांचा त्यांना फार अभिमान असतो, जे विचार व जी तत्त्वे त्यांनी इतरांना शिकविलेली असतात, ज्या तत्त्वानुरूप व सिध्दांतानुरूप त्यांनी आपापली जीवने उभारलेली असतात, त्या तत्त्वांच्या व सिध्दांतानुरूप त्यांनी आपापली जीवने उभारलेली असतात, त्या तत्त्वांच्या व सिध्दांताच्या विरुध्द जे सत्य असेल, ते सत्य कितीही सोपे व सहज बोध असण्यासारखे असले. लहान मुलासही जरी ते समजण्यासारखे असले, तरी ते या पंडितांच्या गळी उतरत नाही. या नवीन सत्याचा प्रकाश त्यांना दु:ख होतो. आपल्या घराची दारे लावून ते बसतील व हा प्रकाश आत येऊ देणार नाहीत. असे होते ही गोष्ट मला माहीत आहे. मी जे कलेचे विकृतत्व दाखवून देत आहे, आजच्या समाजाची कला बिघडली आहे, व समाजाची रूचीही बिघडली आहे हे जे मी सिध्द करीत आहे, प्रतिपादीत आहे, य माझ्या सांगण्याचा व सिध्द करण्याचा उपयोग होणार नाही हे मी जाणून आहे. माझ्या सांगण्याचा कोणी स्वीकार करील किंवा गंभीरपणे कोणी विचार करील अशी मला फारशी आशा नाही. तरीही मला माझे विचार सांगितलेच पाहिजेत. कलेसंबंधीच्या संशोधनाने, परिशीलनाने व सतत अभ्यासाने निर्णय मी बनविले आहेत. जे सिध्दांत मी बांधले आहेत, ते अपरिहार्य व सत्य सिध्दांत सांगितल्यावाचून राहावत नाही. मी कलेसंबंधी जो विचार केला, जे काही परीक्षण व निरीक्षण केले, त्यावरून माझी अशी ठाम समजूत झाली, पक्की खात्री झाली की, आज आपल्या समाजात कला म्हणून मानली जाते, हीच काय ती सत्कला, हीच काय असेल नसेल ती कला म्हणून सांगण्यात येत असते, ती खरी कला नाही व तीच काय ती जगातील सर्व कला असेही नाही. या कलेला कला म्हणावयास मला लाज वाटते. ही कला म्हणजे कलेचे सोंग आहे. माझे हे म्हणणे कोणाला विचित्र व विरोधी वाटेल, परंतु कला म्हणजे भावना देण्याचे साधन, कला म्हणजे तो मानवी व्यापार, ज्या व्यापाराने काही लोक आपल्या भावना दुस-यांस देतात, ही जर व्याख्या खरी असेल, हे कलेचे स्वरूप जर एकदा मान्य केले तर त्यावरूनच पुढे हाही सिध्दांत मान्य करावा लागतो की, आजची कला कला नसून कलेचे सोंग आहे. कला म्हणजे सौंदर्यपूजा किंवा सुखसंवेदना देणे इत्यादी काहीएक नसून, स्वत: एखादी भावना अनुभवून हेतू पुरस्सर ती दुस-याला देणे म्हणजे कला, हे जर नि:शंक सत्य असेल, तर आपणांस कबूल केल्याखेरीज गत्यंतर नाही, कबूल करण्यावाचून सुटका नाही, की आज आपणांमध्ये कला या नावाने जे जे ओळखले जाते, मांडले जाते, वरच्या वर्गाची कला म्हणून जे जे सांगितले जाते, त्या सर्वांत त्या कादंब-या, त्या गोष्टी, ती नाटके, ती प्रहसने, ती गीते, ती काव्ये, ती शिल्पे, ती चित्रे, ती संगीते, ते नाच, ते जलसे, ते सिनेमे-अशा या हजारो हजार कलाकृतींत क्वचितच एखादी अशी कृती असते की जी कर्त्याने स्वत: अनुभवलेल्या उत्कट भावनेतून जन्मलेली असते. ह्या प्रत्यही बाहेर पडणा-या कलाकृती म्हणजे सोंगे आहेत. असत्य व दंभ यांची ही प्रजा आहे. चोरून घेतलेले, उसने घेतलेले, अनुकरण केलेले, उगीच काहीतरी परिणाम व्हावा म्हणून केलेली आदळ आपट, कृत्रिमता, स्वार्थ यांचा बुजुबुजाट म्हणजे ही कला होय. भावनेची जागा ह्या थिल्लर व चिल्लर गोष्टींनी अडवून टाकलेली असते. आजकालच्या कलेमध्ये सत्कलेचे असत्कलेशी प्रमाण मांडावयाचे झाले तर १ : १०००००० असे मांडावे लागेल. दहा लाख जर असत्कलाकृती निर्माण झाल्या तर एक सत्कलाकृती निर्माण होते. मी हे काहीतरी सांगत नाही. ही गोष्ट आकडेशास्त्र सिध्द करीत आहे. एका पॅरिस शहरात ३० हजार चित्रकार आहेत. इंग्लंडमध्ये व जर्मनीमध्ये इतकेच प्रत्येकी असतील. तितकेच इटली, रशिया व इतर लहान राष्ट्रे मिळून असतील. सारे मिळून एकंदर युरोपमध्ये १,२०,००० चित्रकार असतील. आणि इतकेच गाणारे, इतकेच किंबहुना अधिकच वाङ्मयसेवक असतील; या तीनच कलेतील कलावानांची कुलसंख्या ३,६०,००० होते. यांतील प्रत्येकाने जर दरसाल तीन कलाकृती निर्माण केल्या (यांतील काही एक तर असे बहुप्रसव आहेत की, जे दहादहा वीसवीससुध्दा कलापत्ये दरसाल प्रसवतात.) असे सरासरीने आपण धरले, दहालाखांतून अधिक कलाकृती एका वर्षात उत्पन्न होतात असे झाले.