कला म्हणजे काय? 111
प्रकरण सतरावे
(मानवाचे बंधुत्व हे मानवजातीचे ध्येय आहे या विचाराच्या अनुरोधाने कलेने गेले पाहिजे; कलेला हे ध्येय मार्गदर्शकच झाले पाहिजे.)
आपल्या समाजाची कला असत्य व अर्थहीन झाली, तिला महत्त्व राहिले नाही, ती भ्रष्ट झाली याचे कारण वरच्या वर्गातील लोकांची मंदिरीधर्मावरची श्रध्दा उडाली होती व खरी जी ख्रिस्तीची शिकवण ती त्या स्वार्थाच्या आड येत असल्यामुळे तिचाही अंगिकार त्यांनी केला नाही. अश्रध्दावानच ते राहिले. मंदिरीधर्मातील बाष्कळपणावर व थोतांडावर काहीजण वरपांगी श्रध्दा दाखवीत होते व अशा दंभाने आपण धार्मिक आहोत असे दाखविण्याची खटपट करीत. असा हा बकधर्म काहींनी पत्करला तर काहींनी उघड उघडच आपली अश्रध्दा बोलून दाखविली; काहींनी अज्ञेयवाद पत्करून तत्त्वज्ञानीपणाची प्रतिष्ठा मिरविली; काही ग्रीक लोकांचे अनुकरण करून सौंदर्यपासक झाले, व अहंकार हीच एक सत्यवस्तू असे ते प्रतिपादन करीत व अहंम पूजेचाच त्यांनी परमधर्म बनविला.
ख्रिस्ताच्या शिकवणीचा सत्यश्रध्देने, जीवाभावाने संपूर्णपणे स्वीकार न केल्यामुळें वरच्या वर्गांतील केलेला रोग जढविला. या रोगीं कलेनें समाजाला स्पर्श करून समाजहि अंतर्बाह्य रोगी बनविला. जर हा रोग बरा व्हावयास पाहिजे असेल तर ही शिकवण पूर्णपणें स्वीकारणें हाच त्याला एकमात्र उपाय आहे. अर्वाचीन काळांतील शास्त्रीय ज्ञान वगैरे ज्याला आहे, आजच्या ज्ञानगिरीच्या शिखरावर जो उभा आहे, त्याची मंदिरीधर्मावर, त्या विधिनिर्षेधांवर, त्या तंत्रांवर व रूढींवर श्रध्दा असणे शक्यच नाही. ईश्वराचे त्रिविधरूप, ख्रिस्त म्हणजे ईश्वर, पाप कबूल केले की मुक्त झाला वगैरे मतांवर त्याचा विश्वास बसणे अशक्य आहे. किंवा माझा कशावरच विश्वास नाही, जगाचे व धर्माचे समजणे अशक्यच आहे, किंवा सौंदर्य व अहंची पूजा हाच धर्म-इत्यादी प्रकारांनीही त्याचे समाधन होणे शक्य नाही; खरे समाधान त्याला या मार्गानेही प्राप्त होणार नाही. ख्रिस्ताच्या ख-या शिकवणीचा खरा अर्थ आम्हांला माहीत नाही. असे तर त्याला नाहीच नाही म्हणता येणार. आजच्या काळातील सर्वांना ख्रिस्ताची खरी शिकवण ज्ञात आहे. घरोदारी तो संदेश पोचलेला आहे. आमचे सारे मानवीजीवन त्या शिकवणीने भरून गेले आहे, आणि कळत वा नकळत आजचे सारे मानवीजीवन त्या शिकवणीकडेच चालले आहे. ही शिकवणच आजच्या जीवनाला मार्ग दाखवून राहिली आहे.
मानवी जीवनाच्या अंतिम ध्येयाबद्दल आजच्या ख्रिस्ती लोकांनी निरनिराळया कितीही जरी व्याख्या केल्या, कितीहि भिन्न भिन्न प्रकारांनी व त-हांनी त्याचे स्वरूप कथन केले - ''समाजसत्तावादाचा विजय होऊन तद्द्वारा मानवाने ऐक्य होईल,'' ''एक जागतिक धर्म होऊन त्या धर्माकाली सर्वांनी येऊन त्या धर्मांप्रमाणे वागण्यातच मानवजातीचे अंतिम ध्येय आहे,'' ''सर्व जगाचे मिळून एकच लोकसत्ताक राज्य, एकच विशाल असे संयुक्त संस्थान होईल,'' ''मानवाची प्रगती कधी न धावता ती सारखी पूर्णत्वाकडेच जात आहे.'' - इत्यादि स्वरूपाच्या काही व कितीही व्याख्या ते करोत व कितीही त्या भिन्न असोत-सारे एक गोष्ट प्रांजळपणे कबूल करीत आहेत की अखिल मानवजातीचे ऐक्य हेच मानवजातीचे अंतीम गन्तव्य व प्राप्तव्य आहे.
वरच्या वर्गातील लोकांनी आपले वर्चस्व राखण्यासाठी, आपले विशिष्ट हक्क अबाधित ठेवण्यासाठी कितीही खटपटी व लटपटी जरी त्यांनी केल्या, कितीही हेतुपुरस्सर आपले वर्चस्व राहाण्यासाठी जीवनासंबंधीच्या स्वार्थी कल्पना त्यांनी मांडल्या, गूढवाद, पुरूषोत्तमवाद, सौंदर्यवाद, नाना क्लृप्त्या जरी त्यांनी लढविल्या, दरिद्री व अडाणी मजुरांपासून श्रीमंत लोक दूर राहिल्यानेच श्रीमंतांची श्रेष्ठता राहील असे वाटून त्यांना अलग राखण्याची तत्त्वज्ञाने कितीही जरी त्यांनी निर्माण केली तरी खुषीने किंवा नाखुषीने, स्वेच्छेने किंवा अनिच्छेने, सर्व मानवजातीच्या प्रेममय ऐक्यातच सर्वांचे कल्याण आहे; आपले स्वत:चेही कल्याण आहे हे सत्य त्यांना कबूल करणे प्राप्त आहे. हे कबूल केल्याशिवाय त्यांना सुटका नाही. हे सत्य दिवसेंदिवस अधिकच स्वच्छ व निरपवाद असे होत चालले आहे आणि हे मानवाचे बंधुत्व दुस-या कशासाठी नाही तर स्वत:च्याच कल्याणासाठी अंगिकारणे अवश्य आहे, असे श्रीमंतांना दिसून येईल.