कला म्हणजे काय? 113
मानवी जीवनाला ही मानवातील बंधुभावाची धर्मभावना नकळत वळण देतच असते, देत आली आहे व पुढेही देईल. ही धर्मभावना जर जाणिवपूर्वक, विचारपूर्वक, श्रध्दापूर्वक स्विकारली तर तत्क्षणीच वरिष्ठांची कला व कनिष्ठांची कला असे जे कलेममध्ये दोन भाग पडतात, ते ताबडतोब बंद होतील. विश्वजनांच्या उपयोगी येणारी, सर्व समावेशक, सर्वसंग्राहक, बंधुभाव वाढविणारी, सहकार पोसणारी, भेद अस्तास नेणारी, प्रेमपंथ दाखविणारी अशी एकच विराट व विशाल, मंगल व मधुर अशी कला राहील. आणि मानवाच्या ऐक्यावर जोर न देता भेदांवरच जोर देणारी, न जोडता तोडणारी अशी जी संकुचित कला ती मग निषेधिली जाईल; तसेच केवळ मुख व विलास यांच्या भावना देणारी जी क्षुद्र कला, विषयभोगालाच प्राधान्य देणारी जी असत्य व हीन कला तिचाही निषेध केला जाईल.
आणि असे घडून येताच, आज कलेमुळे लोक जे अधिक अहंकारी असे होत आहेत, रुचि बिघडल्यामुळे मानव असूनही पृक, व्याघ्र व रीस होत आहेत, त्याला आळा बसेल. आणि मानवी ऐक्याचे, मानवी विकासाचे, मानवी समाधानाचे व शांतीचे साधन म्हणून असणे हे जे कलेचे खरे काम, ते कला पुन्हा आपल्या हाती घेईल व अवघाचि संसार सत्सुखाचा करू पाहील.
मी जी उपमा आता देणार आहे ती कदाचित कोणाला जरा चमत्कारीक वाटेल, तरीही ती मी देतो. मातृपद् मिळविण्यासाठी, माता होण्यासाठी म्हणून जे आकर्षकत्व व जे रमणीयत्व स्त्रीला झालेले आहे, त्याचा उपयोग विलासी लोकांची विषयवासना तृप्त करण्यातच तिने करावा, आपल्या रूप लावण्याचा तिने विक्रा करावा, आपल्या आकर्षकतेचा बाजार मांडावा हे जसे, तसेच आपल्या आजच्या कलेच्या बाबतीत झालेले आहे.
आपल्या वरच्या वर्गातील लोकांची कला म्हणजे वारांगना आहे. ही तुलना अगदी तंतोतंत, बारीकसारीक गोष्टींतही दिसून आल्याशिवाय राहणार नाही. वेश्या ज्याप्रमाणे नेहमीच तयार तशी आजची ही कला हुकुमी तयारच आहे. वेश्येला ज्याप्रमाणे काळ वेळ नाही, तशी आजची कलाही सदैव नटून थटून उभीच आहे. वेश्येप्रमाणे स्वत:च्या रूपलावण्याचा विक्रा करण्यासाठी कला नेहमीच उभी आहे. त्या वेश्येप्रमाणेच ही कला मोहक, मारक व विनाशक आहे.
खरी कलाकृती कलावानाच्या हृदयात प्रसंगविशेषीच जन्मत असते. जे जीवन तो जगला, त्या जीवनाचे फळ म्हणून, सार म्हणून ती कलाकृती जन्मत असते. ज्याप्रमाणे मातेच्या पोटात गर्भ वाढत असतो, त्याप्रमाणेच ती कलाकृती कलावानाच्या हृदयात वाढत असते. नऊ महिनेच नाही तर कधी कधी वर्षेच्या वर्षे वाढत असते व मग योग्य प्रसंगी दिवस भरताच ती जन्माला येते. परंतु जी खोटी कला, जी धंदेवाईक कला ती गि-हाईक भेटताच त्याला मिठी मारण्यास उभीच आहे.
ख-या कलेला प्रिय पतीच्या पत्नीप्रमाणे अलंकारांची व शृंगारसाजांची जरूर नसते. परंतु दांभिक कलेला मात्र सदैव शृंगारसाज केल्याशिवाय मिरवताच येणार नाही.
हृदयात प्रेमाने वाढवलेल्या भावना प्रकट केल्यावाचून राहवतच नाही. आत जणू कळा लागलेल्या असतात, म्हणूनच कलावानाची कलाकृती बाहेर पडत असते. माता प्रेमाने ज्याप्रमाणे तो संभोगगर्भ उदरात घेते, त्याला वाढविते, त्याला जपते व प्रसववेदना लागल्या म्हणजे ते बाळ जगाला देते, तसेच सत्कलेचे असते. परंतु खोटया कलेच्या जन्माचा हेतू स्वार्थ असतो, वेश्येच्या बाबतीत प्रेम हा संभोगहेतू नसून प्राप्ती हाच हेतू असतो.
सत्कलेचा परिणाम म्हणजे मानवीजीवनात नवीन अननुभूत भावना आणणे हा असतो. ज्याप्रमाणे पत्नीच्या प्रेमाचा परिणाम म्हणजे ते गोड नवं बालक जगात आणणे.
परंतु दांभिक कलेचा परिणाम मनुष्यास बिघडविणे हाच होतो, असतोही. कधीही तृप्ती न देणारे सुख निर्माण करणे व मानवाच्या दिव्य शक्तीचा -हास करणे हाच वेश्येप्रमाणे या असत् व दांभिक कलेचा परिणाम होतो.
आजच्या आपल्या वरच्या वर्गातील लोकांनी हे सारे नीट स्वच्छपणे ओळखून घेतले पाहिजे. वेश्येसमान असा जो हा घाणेरडा व बिघडवणारा कलाप्रवाह समाजात आहे, त्याला आळा घालण्यासाठी, सर्व मानवीजीवनाची इतिश्री करणारा हा जो भेसूर प्रवाह, तो बंद व्हावा यासाठी वरील स्पष्ट व स्वच्छ सत्य आजच्या लोकांनी समजून घेतले पाहिजे. अत:पर डोळेझाक नको. नाहीतर विनाशगर्ता नजीकच आहे.