कला म्हणजे काय? 45
जी कला सर्वांना व्यापून न राहता, सर्वांच्या जीवनांत न जाता, मूठभर लोकांच्या जीवनांतच वावरत असते, अशा या संकुचित कलेचे पुरस्कर्ते वरच्या प्रमाणे काही तरी बरळत असतात. परंतु स्वत:चे जे काही ते असे बोलतात, त्याच्यावर त्यांचा तरी विश्वास असतो की नाही देव जाणे. मला तरी त्याबद्दल जबरदस्त शंका येते. बहुजनसमाज गुलाम राहून मरत राहतील, तेव्हाच आपली कला उत्पन्न होणे शक्य आहे, बहुजनसमाजाच्या रात्रंदिवस चालणा-या हमालीवर व गुलामगिरीवर ही कला जिवंत राहू शकते, ही गोष्ट त्यांना का माहीत नाही? त्यांना ही गोष्ट पक्की माहित असलीच पाहिजे. जोपर्यंत ही गुलामगिरी आहे तोपर्यंतच या आपल्या कलेचे अस्तित्व आहे ही गोष्ट ते पूर्णपणे ओळखतात, नीट समजून आहेत. लेखक, गायक, वादक, नर्तक, अभिनय करणारे, वगैरे त्या त्या कला-क्षेत्रांत चमकणा-यांना तेव्हाच चमकता येईल, पूर्णत्वाला पोचणे शक्य होईल, जेव्हा अपरंपार श्रम करून मजूर मरतील, गुलामांप्रमाणे रात्रंदिवस राबत राहतील, मजुरांना कामाच्या डोंगरांखाली चिरडूनच तत्कलाविशारदांना आपापल्या उत्कृष्ट कलाकृती जगासमोर मांडता येतील, जगासमोर प्रकट करता येतील, अशी परिस्थिती असेल तेव्हाच वरचा सुसंस्कृत असा अल्प समाज या कलाकृतीचे कौतुक करण्यास मिळू शकेल भांडवलशाहीपासून मजुरांना मुक्त करा, म्हणजे ही तुमची सारी सुंदर कला निर्माण होणे अशक्य होऊन जाईल.
परंतु अशक्यही क्षणभर शक्य मानू या. जी कला आज आपण वरच्या वर्गाची मानितो, ती कला सर्व समाजाला मिळेल अशी एकंदर व्यवस्था करण्यात आली असे गृहीत धरू या. तरीही एक अडचण राहीलच. आपली ही दिखाऊ, ऐटबाज कला बहुजनसमाजाला समजणारच नाही! त्यांना संधी दिलीत, परंतु त्यांना समजत नाही. आता काय करावयाचे? त्यांना न समजल्यामुळे ही कला त्यांची होऊ शकणार नाही. पूर्वीचे कवी लॅटिन भाषेतच काव्ये लिहित. परंतु आजचे कवी जरी लोकांच्या बोलीत, मायभाषेत काव्य लिहित असले, तरी त्यांच्या काव्यांचे नमुने लॅटिन भाषेत असावेत इतके दुर्बोध असतात! यालाही एक कायम ठशाचे नेहमीचे उत्तर वरच्या वर्गाच्या कलेच्या पुरस्कर्त्यांजवळ तयार असते. ते म्हणतात, ''बहुजनसमाजास, या हमालांस व मजुरांस ही कला आकलन करता येत नही, कारण त्यांचा विकासच झालेला नाही. अजून ही कला ग्रहण करण्याचे इंद्रिय त्यांना फुटले नाही, ते यावयाचे आहे'' आणि असाच सारा इतिहास आहे. कलेने नवीन पाऊल टाकले की नेहमी असेच होते. प्रथम ती एकदम समजत नाही. परंतु मग हळूहळू सवय होऊन ती लोकांच्या अंगवळणी पडते व हळूहळू त्यांना समजूही लागते. आजच्या आपल्या वरच्या वर्गाच्या कलेचे असेच होईल; आपण जितके सुशिक्षित आहोत, तितक्या प्रमाणात प्रत्येकजण सुशिक्षित झाला म्हणजे त्यांना ही कला समजू लागेल. कला निर्माण करणा-या वरच्या वर्गाइतकेच सारे खालचे वर्गही सुशिक्षित झाले, की मग त्यांना ही कला समजणे जड जाणार नाही. हे उत्तर, मागे जे एक उत्तर या पुरस्कर्त्यांनी दिले आहे, त्याच्यापेक्षाही अधिक असत्य व दांभिक असे आहे. वरच्या वर्गातील लोकांच्या कलेचे पुष्कळसे नमुने-नानाप्रकारची शोकगीते, नाना काव्ये, नाना नाटके व नाटिका, लोकगीते, भावगीते, चित्रे-ज्या नमुन्यांनी वरच्या वर्गातील लोकांना आनंद होत असे व गुदगुल्या होत असत-आणि अजूनही आनंद होत असेल व गुदगुल्या होत असतील-असे हे मनुन पुष्कळ काळ निघून गेला तरीही बहुजनसमाजाला अज्ञेय कोडीच राहिले आहेत. पुष्कळ काळ लोटला तरीही सामान्य जनतेला हे नमुने समजत ना उमजत ना, त्यांची महती व किंमत कळेना वळेना. हे कलेचे नमुने-म्हणजे वरच्या वर्गातील सुशिक्षित श्रीमंतांचीच करमणूक आहे. त्यांच्यासाठीच जणू ते निर्मिलेले होते. ते कलेचे नमुने निर्माण होताना त्या कलावानांसमोर वरचा मूठभर वर्गच असे. बहुजनसमाजाची स्मृतीही त्यांना नसे. आणि म्हणूनच काळ पुष्कळ गेला तरीही बहुजनसमाजाच्या आहारी ही कला अद्याप आली नाही. त्यांच्यासाठी तो नव्हतीच मुळी. ''असा एक सोत्र्नयाचा दिवस उजाडेल की ज्या दिवशी बहुजनसमाजालाही कला समजेल.'' असे म्हणताना आणखी एक मुद्दा असा पुढे मांडण्यात येतो की ''कलेच्या ज्या नमुन्यांनी बहुजनसमाजास पूर्वी आनंद वाटत नसे, त्या नमुन्यांनी आज त्यांना आनंद होत आहे. कलेचे ते नमुने जिकडेतिकडे त्यांच्यासाठी उघडे ठेवले जात आहेत. प्रदर्शनांतून, संग्रहालयांतून लोकांच्या डोळयांना व कानांना हे नमुने रिझवीत आहेत, सुखवीत आहेत.'' परंतु हे लोक तरी कोणते? जी अर्धवट शहरे आहेत, अशा शहरांतील अर्धवट लोक-तेच की नाही हे? त्या लोकांची रूची बिघडलेली असते. त्यांना कोणत्याही कलेची चटक लावता येते. वाटेल ते त्यांना द्या, ते वाहवा वाहवाच म्हणतील! शिवाय ही कला त्या लोकांनी काही निर्माण केलेली नसते, किंवा त्यांनी आपण होऊन पसंत केलेली नसते; जोराने ती त्यांच्यावर लादण्यात येत असते. सार्वजनिक जागी मुद्दाम प्रदर्शने मांडून, जलसे करून लोकांच्या कानीकपाळी, लोकांच्या डोळयांवर व कानांवर ही कला लादली जात असते. काम करणारे कामगार, मजूर, शेतकरी- ह्यांना वरच्या वर्गाची ही कला एक तर महाग असल्यामुळे घेता येत नाही, शिवाय दुसरे म्हणजे ह्या कलेचे स्वरूपही त्यांना विचित्र वाटते; कारण वरच्या वर्गातील विलासी लोकांच्या जीवनांतील अनुभव व भावना या कलेतून प्रकट केलेल्या असतात. श्रमजीवी लोकांना ह्या जीवनाची व ह्या अनुभवांची कल्पनाही नसते. विलासी लोकांच्या भावना हे श्रमजीवी कष्टाळू लोक कसे समजणार? त्या कलेत श्रमजीवी लोकांच्या भावना, त्यांचे जीवन त्यांचे अनुभव यांचे कोठेच प्रकटीकरण नसते. श्रमजीवी लोकांच्या भावना ह्या मानवजातीतील बहुजनसमाजाच्या भावना असतात. परंतु त्या भावना या कलेत कधीही नसतात. श्रीमंत लोकांची सुखे, त्यांच्या विलासकल्पना यांची श्रमजीवी माणसास कल्पनाही येत नाही. म्हणून ह्या वरच्या वर्गातील लोकांच्या सुखविलासांच्या भावनांच्या प्रदर्शनाने मजूरांच्या हृदयात कसलीही भावना उत्पन्न होत नाही; आणि उत्पन्न झालीच तर आळशी व ढेरपोटया माणसाच्या मनात जी भावना उत्पन्न होईल, त्यापेक्षा ती निराळी असेल, तिच्याविरुध्द ती असेल.