संध्या 173
“परंतु कम्युनिस्टांचे मित्र आहांत. तुम्ही आमच्याबरोबर काम करीत असां. कामगारांच्या बाजूनं लढयांत उभे राहात असां.” कल्याण म्हणाला.
“मी तुमचा मित्र असलों तरी आधीं काँग्रेसचा मी सेवक आहें. आणि काँग्रेसचे विचार कोणत्या दिशेनं जात आहेत तें तुम्हांला माहीतच आहे. देशांत लौकरच प्रचंड वणवा पेटणार. स्वातंत्र्यासाठीं हिंदी जनताहि स्वत:चं बलिदान करते असं जगाला दिसेल.” भाईजी उचंबळून म्हणाले.
“भाईजी, आज लढा करणं वेडेपणा आहे. देशांत राष्ट्रीय सरकार स्थापण्याची खटपट करावी. मुसलमानांशी ऐक्यं करावं.” कल्याण म्हणाला.
“पूर्वी लढा करा अस तुम्हीच म्हणत असां. लढयांतून ऐक्य येईल असं तुम्ही म्हणत असां.” भाईजी म्हणाले.
“परंतु आज परिस्थिति बदलली आहे. रशिया, चीन यांना आपण पाठिंबा दिला पाहिजे. संकुचित राष्ट्रीयता सोडून व्यापक आंतरराष्ट्रीय दृष्टि आपण घेतली पाहिजे.” कल्याण म्हणाला.
“परंतु रशिया, चीन यांना आपण कशी मदत करणार ? आपणांला राष्ट्रीय लष्कर उभारतां येत नाहीं. आपणांला काडीची सत्ता नाहीं. ब्रिटिशांच्या हाताला हात लावणं यापलीकडे आपणांस कांहीं करतां येणार नाहीं. रशियांतील महान् प्रयोग वांचावा असं काँग्रेसलाहि वाटतं. परंतु त्यासाठीं आपण आधीं स्वतंत्र झालं पाहिजे. एरवीं आपण काय करूं शकणार ? रशियाला ब्रिटिशांची मदत व्हावी म्हणून तुम्ही ब्रिटिशांना आज दुखवूं इच्छित नाहीं. जनतेला तसं सांगा. उगीच लोकयुध्दाच्या आरोळया नका मारूं. चाळीस कोटी हिंदी जनतेला जिथं ब्रहि काढतां येत नाहीं, तिथं हे लोकयुध्द आहे असं कितीहि सांगितलंत, तरी कोणाला खरं का वाटेल ? आज आपण आधीं सर्व शक्ति ओतून स्वतंत्र झालं पाहिजे.” भाईजी म्हणाले.
“तें स्वातंत्र्य या महायुध्दांतून, लोकयुध्दांतून येईल.” कल्याण म्हणाला.
“मला शंका आहे. आपण होऊनच आपलीं बंधनं तोडायला हवींत.”
“युध्दानंतर स्वातंत्र्य न मिळालं, तर आपण सारें मिळून प्रचंड लढा करूं. इतके दिवस आपण कळ सोसली; आणखी थोडे दिवस जाऊं दे.” विश्वास म्हणाला.
“नरकांत एक दिवसहि अधिक राहा असं सांगणं पाप आहे. आणखी कांहीं दिवस असेच गुलाम राहा असं तुम्हांला सांगवतं तरी कसं ? आणि कल्याण, मी खरं सांगूं का, तुम्ही काँग्रेसच्या लढयांत कधींहि सामील होणार नाहीं. ज्या लढयाचीं सूत्रं तुमच्या हातीं नाहींत, तुमच्या हातीं यायची शक्यता नाहीं, त्या लढयांत तुम्ही कधीहि भाग घेणार नाहीं. त्या लढयाची तुम्ही विटंबना कराल. काँग्रेस जेव्हां लढा करीत नसेल, तेव्हां तुम्ही आपला जहालपणा दाखविण्यासाठीं लढा पुकारा म्हणून गर्जना कराल; आणि काँग्रेसचा लढा सुरू होतांच त्या लढयाचा विचका करीत बसाल. मुस्लिम लीगशीं पूर्वी जेव्हां काँग्रेस वाटाघाटी करायला जाई, तेव्हां तुम्ही म्हणत असां कीं, “त्या नबाबी संस्थेजवळ काय वाटाघाटी करायच्या ? मुस्लिम बहुजन समाजांत काँग्रेसनं घुसावं. ऐक्य लढयांतून येईल.” परंतु आज काँग्रेस लढयासाठी तयार होत असतां तुम्ही म्हणतां कीं, “मुस्लिम लीगचं मागणं मान्य करा.” सदैव काँग्रेसला विरोध करीत राहणं ही एक तुमची नीति आहे. आणि मी तर काँग्रेसचा उपासक. मरतांना ओठांवर काँग्रेस काँग्रेस शब्द नाचो अशी आशा मी मनांत खेळवत असतों. या देशाच्या स्वातंत्र्यासाठीं आजपर्यंत काँग्रेसच लढत आली. जगाला ऊब मिळावी म्हणून सूर्य अहोरात्र जळत असतो, त्याप्रमाणं या चाळीस कोटी लोकांना ऊब मिळावी म्हणून काँग्रेस सदैव बलिदान करीत आली आहे; आणि महान् बलिदानासाठीं आज पुन्हां उभी आहे. देशाची प्रतिष्ठा सांभाळणारी ही एकच महान् संस्था आहे. विश्वास, कल्याण, तुम्ही कांही म्हणा. तुमच्या मताचा मी होणं शक्य नाहीं. रशियांतील तुमचे क्रांतिकारकहि “स्वदेश, मातृभूमि” असे शब्द उच्चारीत आहेत; आणि आपण मात्र गुलाम असूनहि पोकळ आंतरराष्ट्रीय गप्पा मारायच्या. सारा चावटपणा आहे. तुम्ही जा. माझ्या सुटकेची तुम्ही खटपट नका करूं. माझी सुटका कदाचित् होणारहि नाहीं. आपलं संबंध बाह्यत: तरी संपले. पूर्वीच्या प्रेमळ स्मृतींचा सुगंध मनांत राहील. माझ्या तरी राहील. कधीं एकटा असेन, तेव्हां त्या स्मृति येऊन उचंबळेनहि. असो. तुम्ही आनंदांत राहा. सुखी असा. तुमची निष्ठा घेऊन तुम्ही जा. मला वाईट वाटत आहे. परंतु उपाय काय ?” भाईजींच्या डोळयांत पाणी आलें.