संध्या 152
हरणी व विश्वास बाहेर गेलीं. भाईजी स्वयंपाकाला लागले. किती तरी दिवसांनीं आज ते अभंग म्हणत होते. अभंग वाणी उचंबळून त्यांच्या तोंडांतून बाहेर पडत होती. कांहीं चरण ते घोळून घोळून म्हणत होते :
निराधार आम्ही तुझाचि आधार
अमृताचि धार तुझें नांव
तुझा म्हणुनीयां आलों तुझे दारीं
मी तव भिकारी भीक घालीं
भीक घालीं थोडी थोडी तरी राया
पडतों मी पायां दया करीं ॥ निराधार ॥
कोणाचा होता हा अभंग ? भाईजी आळवून आळवून म्हणत होते. “तुझा म्हणुनीयां आलों तुझे दारी” हा चरण ते घोळून घोळून म्हणत होते. तों समोर कोण होतें ? कोण येऊन उभे होतें ? विश्वास व हरणी दोघें उभीं होतीं. शांतपणें उभीं होतीं.
“भाईजी, कोणाच्या दारीं ? कोणाजवळ भीक मागतां, कशाची मागतां ?” विश्वासनें सौम्य स्निग्ध शब्दांत विचारलें.
“तुझ्या दारीं, प्रेमाची भीक; भाईजींना दुसरी कसली भूक आहे ?”
“भाईजी, तुम्हांला सांगूं एक गोष्ट ?” हरणीनें विचारले,
“सांग.”
“आमचं लग्न ठरलं.”
“कधीं ?”
“येत्या आठ दिवसांत.”
“तुला नोकरी मिळाली का ?”
“लग्न लावा, मग नोकरी देऊं असं सांगण्यांत आलं.”
“लग्नानंतर तरी मिळेल याची काय खात्री ?”
“ते फसवणार नाहींत असं वाटतं.”
“बरं झालं. मीहि इथून लौकर जावं म्हणतों. पुरे आतां इथं राहणं.”
“आम्हांला कंटाळलेत ना ? प्रेम का कंटाळतं, भाईजी ?”
“विश्वास, जगांतील सारीं अपुरीं प्रेमं. परंतु तुमच्यावर प्रेम आहे म्हणूनच जावं म्हणतों. माझ्या प्रेमावर का केवळ जगाल ? विश्वास, माझ्याहि जवळचे पैसे संपले. आपण खायचं तरी काय ? माझाहि आतां तुमच्यावर एक बोजा. मी जातों कुठं तरी. कांहीं मिळवून तुम्हांला पाठवतां आलं तर पाहीन. नाहीं तर वा-याबरोबर मनांतील प्रेम तुम्हांला पाठवीन.” भाईजी म्हणाले.
“भाईजी, मी जातें. जातें हं, विश्वास.” असें म्हणून हरणी गेली. कल्याण आला. रंगा आला. सारे जेवले. संध्येचें मन शांत होत होतें. रात्रीं लौकरच सारे झोंपले.
दुस-या दिवशीं पुन: कल्याण व विश्वास घर शोधायला निघाले व शुक्रवारांत एक घर ठरवून ते आले. रंगानें एक खटारा सामानासाठीं ठरवून आणला. कल्याण व विश्वास यांनीं सामानाबरोबर जायचें नाहीं, असें ठरलें. पोलीस बघायचे एखादे. ते दोघे सायकलवरून पुढें निघून गेले. रंगा व भाईजी सामान खटा-यांत घालून खटा-याबरोबर निघाले. जातांना त्या पेन्शनरीणबाईला प्रणाम करून व तिचा आशीर्वाद घेऊन ते गेले. म्हाता-यांचा आशीर्वाद असावा. दुसरें कांहीं नसलें तर नसलें !