संध्या 9
कल्याण व संध्या
कल्याण मोठा हूड होता. त्याच्या सुपाणी गांवांत त्याच्यासारखा खेळकर मुलगा नव्हता. सुपाणी गांवालाहि भीमा होती. भीमेचे पवित्र पाणी त्या गांवाला मिळे, म्हणून का सुपाणी नांव ? कल्याणचें शरीर गोटीसारखें होतें. त्याचा वर्ण काळासांवळा होता. तोंड वाटोळें होते. डोळे मोठे व काळेभोर होते. त्याला पाहतांच प्रेम वाटे. मोह वाटे. आरोग्याचें उत्कृष्ट सौंदर्य त्याच्याजवळ होते. गांवातील मुलांचा तो म्होरक्या होता. तो नवीन नवीन खेळ शोधून काढी. मुलांना कवाईत शिकवी. पोहण्यांत तो पटाईत होता. भीमेला पूर यावा व कल्याणच्या हृदयालाहि पूर यावा. तो लहान होता. परंतु भीति ही वस्तु त्याला ठाऊक नव्हती. भीमेचे सहस्त्रावधि तरंग त्याला जणू नाचवीत. एखाद्या फुलाप्रमाणे तिच्या फेसाळ पाण्यावर तो तरंगे. भित्र्या मुलांना तो धीट करी, त्यांना उडया टाकायला लावी. कल्याण म्हणजे भेकडांना शूर करणारा, रडक्यांना हंसवणारा, दुबळयांना झुंजार करणारा. तो घरबश्या मुलांना बाहेर काढी, व खेळायला लावी. कल्याण म्हणजे मूर्तिमंत उत्साह; मूर्त स्फूर्ति, मूर्त ज्योति. नवभारताचा तो अभिनव युवक होता. उगवत्या भारतभाग्यसूर्याचा तो अरुण होता.
उडगी गांव सुपाणी गांवाहून फार दूर नव्हता. उडगी गांवचीं मुले कल्याणला कवाईत शिकविण्यासाठीं बोलावीत. कल्याण जाई. तेथील मुलांचाहि तो आवडता झाला. कधीं कधीं उडगी गांवांतील रस्त्यांतून तो मुलांना कवाईत करीत नेई. ती व्यवस्थित जाणारी तुकडी पाहून सर्व स्त्रीपुरुषांना आनंद होई. संध्याहि रस्त्यावर येऊन बघे. कधीं सुपाणी गांवचीं मुले उडगी गांवीं येत वा उडगी गांवचीं मुलें सुपाणीस जात. अशा वेळेस संयुक्त कवाईत होई. रंग चढे. उडगी व सुपाणी गांवातील खेळाडूंचे कधीं खेळ होत व ते पाहायला पुष्कळ मंडळी जमे.
असा हा कल्याण वाढत होता. त्याचे वय सोळा-सतरा वर्षांचें होते. तो कुस्ती छान खेळे. पळण्यांतहि तो पहिला येई. परंतु अलीकडे कल्याण बाहेर पडेनासा झाला. त्याच्या गांवांत इंग्रजी पांचवीपर्यंत शाळा होती. त्याची पांचवी इयत्ता झाली. पुढें पुण्याला शिकावयास जावे असें त्याच्या मनांत होतें; परंतु वडील पाठवीतना. तो दु:खी झाला.
गांवांतील मुलांना संध्या विचारी, कीं तो कल्याण कां येत नाहीं ?
“तो घरांतून बाहेर पडत नाहीं,” असें मुले सांगत.
असे कांही दिवस गेले. आणि एक प्रसंग आला. उडगी गांवांत मोठया प्रमाणावर खेळ व कुस्त्या करण्याचें कांहीं हौशी मंडळींनीं ठरविलें. कल्याणची स्वयंस्फूर्ति जागी झाली. त्यानें अठरा वर्षांच्या आंतील मुलांच्या कुस्त्यांत नांव दिले.
“संध्याताई, कल्याण कुस्तीसाठी येणार आहे. त्यानं नांव दिलं आहे.” एका मुलानें सांगितलें.
“खरंच ?”
“हो.”
“कल्याण कुस्तींत विजयी होईल.”
“कशावरून ?”