संध्या 21
“माझं घर जवळ आहे. तुला लांब जायच आहे.”
“तुला घरीं रागावतील.”
“मारतीलसुध्दां.”
“संध्येला मार ?”
“त्यांत काय आश्चर्य ? तुम्हांला नाहीं कुणीं रागं भरत ?”
“बाबा तर नेहमीं रागावतात.”
“जा मग लौकर घरीं. तुमची बांधाबांध करायची असेल.”
“बांधाबांध करून ठेवली व इकडे आलों.”
“तुमची ट्रंक असेल ?”
“हो.”
“काय आहे त्या ट्रंकेत ?”
“कपडे, पुस्तकं, पदकं, ती माझी माळ.”
“आणखी काय आहे ?”
“माझे व माझ्या मित्रांचे फोटो.”
“आणखी काय आहे ?”
“टांक, पेन्सिली, वह्या.”
“झालं सारं ?”
“आणखी काय बरं आहे ?”
“आणखी कांहीं नाहीं ?”
“हो. खरंच. एक आणखी जंमत आहे.”
“कसली जंमत ?”
“तूं त्या दिवशी मला माळ घातलीस, ती आहे. रुमालांत बांधून ठेवली आहे. ट्रंक उघडतांच अद्याप वास येतो.”
“अजून वास येतो ?”
“मला तरी येतो.”
“कल्याण, जा आतां. उशीर झाला.”
“तूंहि जा आतां. मोठीं होऊं तेव्हां भेटू. पोरकटपणा जाईल तेव्हा भेटू. आज लहान आहोंत.”
संध्येकडे पाहात कल्याण गेला व कल्याणकडे मागें वळून पाहात संध्या गेली. कल्याणच्या जीवनांत संध्येचा तारा चमकूं
लागला व संध्येच्या जीवनांत कल्याणचा.