Get it on Google Play
Download on the App Store

संध्या 37

संध्येचें पत्र कल्याणला आवडलें. तो आनंदला. अलीकडे त्याला कविता करायचा नाद लागला होता. तो गाणी गुणगुणे, कविता गुणगुणे. त्याच्या मनाला, बुध्दीला पंख फुटले होते. चुलत्यांकडे जरी कोंडमारा होत असे, तरी त्याला न जुमानतां त्याचा उत्साह उचंबळून राही. जोरदार अंकुर कठीण जमिनीला फोडून वर येतो. जोरदार मुळें दगड फोडून पसरतात. वेगवान नदीला कोण विरोध करील ? नर्मदेचा वेगवान प्रवाह दगडांना चिरून नाहीं का गेला ? त्या दगडांचे आरसे नाहीं का तिनें बनविले ? त्या दगडांमधील धवलत्व तिनें त्यांना नाहीं का दाखविलें ? भावना जोरदार व उत्कट असतील, तर सर्व कोंडमारा सहन करूनहि त्या वाढल्याशिवाय राहणार नाहींत. देशभक्तांना तुरुंगात टाका, किसान कामगार कार्यकर्त्यांना वर्षानुवर्षे म्हणावें अटक करून ठेवा. त्या तुरुंगाच्या भिंती, ते लोखंडी गज त्यांचा आत्मा मारुं शकणार नाहींत. आणि समजा, त्यांचीं शरीरें पडली, तरी विचार थोडाच मरणार आहे ? बलिदानानें विचार अधिकच वाढतो. मानवी विचार शेवटीं मुक्त होईल. सारीं मारक साधनें तुटून जातील. बुध्दि स्वतंत्र होईल. तिची प्रभा सर्वत्र फांकेल व या पृथ्वीवरील विविधतेंत मनोरम स्वर्ग निर्माण होईल.

चुलता व चुलती कल्याणचा बलवान आत्मा गुदमरवूं पाहात होतीं. परंतु कल्याणच्या पीळदार शरीरांतील पीळदार मन कोण मारणार ? कल्याण मुक्तपणें वागे. तो घरांतील बोलण्याला भीक घालीत नसे. तो नदींत पोहायला जाई, टेकडीवर फिरायला जाई, मैदानांत खेळायला जाई. तो अभ्यास मंडळांत जाई. व्याख्यानांना जाई. विश्वासबरोबर ओंकारेश्वराच्या घाटावर बसून चर्चा करी. त्या पेटलेल्या स्मशानाची त्यांना कधींहि भीति वाटत नसे. एके दिवशी तर त्यांनी कमालच केली. दोघे मित्र बराच वेळ रात्रीं घाटावर बोलत होते. अंगांत नुसते सदरे. एकदम त्यांना हुडहुडी भरली. अंग थरथरूं लागलें.

“भयंकर थंडी !” कल्याण म्हणाला.

“ही थंडी कीं दुसरी कांहीं बाधा ?” विश्वास हंसत परंतु जरा भीतीनें म्हणाला.

“भुताची बाधा असं का तुझ्या मनांत आलं ?”

“तसं नाहीं रे.”

“ती बघ चिता जळत आहे. चल, तिथं शेकत बसूं व पोटभर बोलूं. थंडीहि पळेल.”

“चितेजवळ ?”

“त्यांत काय झालं ?”

विश्वासचा हात धरून कल्याणनें त्याला नेलें. विश्वास भीत नव्हता. भित्रेपणाची त्याला चीड होती. परंतु त्याच्या सदभिरुचीला तें सहन होईना. विश्वासच्या भावना जरा कोमल का होत्या ? दुधें काढणारा विश्वास अधिक प्रेमळ का होता ? कल्याणनें त्याला ओढीत नेलें. चितेपासून थोडया अंतरावर ते बसले. दुरूनहि धग लागत होती.

“गेली का थंडी ?” कल्याणनें विचारलें.

“कल्याण, कांही म्हण; पण मला इथं बसणं बरं नाहीं वाटत. दुस-याच्या मरणाची ही थट्टा आहे. त्या मृताचे सखे-सोयरे काय म्हणतील ? त्यांच्या भावनांना काय वाटेल ?”

“विश्वास, अरे जगांत जीवंतपणी हेंच सर्वत्र चाललं आहे. तूं तें परवां कामगार पुढा-याचं व्याख्यान नाहीं का ऐकलंस ? या जगांत श्रमणा-यांच्या जीवनांच्या होळया पेटवून शेकत बसणं हा धर्म झाला आहे. त्यामुळं कोणाच्याहि कोमल भावनांना धक्का बसत नाहीं. जिवंत असतील त्यांना मारणें व मेलेल्यांचीं कौतुकं करणं, असा हा धर्म आहे.”

“कल्याण, त्या दिवशींचं तें व्याख्यान खरंच अपूर्व होतं. त्या व्याख्यात्यांची हुर्यो करावी म्हणून मी गेलों होतों. परंतु शेवटीं माझे हात जोडले गेले. इतिहासावर कसा निराळाच प्रकाश त्यांनीं पाडला. मराठयांच्या इतिहासांतील खरा अर्थ त्यांनीं कसा दाखवला ? त्यांनीं दाखवलेले शिवछत्रपति कसे निराळे दिसले ! त्यांच्या व्याख्यानांत त्वेष नाहीं, आदळआपट नाहीं. उगीच भ्रामक भावनांचं आकांडतांडव नाहीं. सरळ सरळ बुध्दिवाद, सरळ वस्तुस्थिति, सरळ अर्थ-शास्त्र !”

“विश्वास, आपण खूप अभ्यास केला पाहिजे. सारं सोडावं व अशा कार्यकर्त्यांजवळ जाऊन राहावं व शिकावं असं मनांत येतं. शाळा-कॉलेजांतील मरतुकडं शिक्षण नकोस वाटतं. पण खायचं काय, राहायचं कुठं ? त्या कार्यकर्त्यांवर आपला भार थोडाच घालायचा ?”

“कल्याण, चल, आतां जाऊ. मला पुन्हां पहाटे उठायचं आहे.”

संध्या

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
संध्या 1 संध्या 2 संध्या 3 संध्या 4 संध्या 5 संध्या 6 संध्या 7 संध्या 8 संध्या 9 संध्या 10 संध्या 11 संध्या 12 संध्या 13 संध्या 14 संध्या 15 संध्या 16 संध्या 17 संध्या 18 संध्या 19 संध्या 20 संध्या 21 संध्या 22 संध्या 23 संध्या 24 संध्या 25 संध्या 26 संध्या 27 संध्या 28 संध्या 29 संध्या 30 संध्या 31 संध्या 32 संध्या 33 संध्या 34 संध्या 35 संध्या 36 संध्या 37 संध्या 38 संध्या 39 संध्या 40 संध्या 41 संध्या 42 संध्या 43 संध्या 44 संध्या 45 संध्या 46 संध्या 47 संध्या 48 संध्या 49 संध्या 50 संध्या 51 संध्या 52 संध्या 53 संध्या 54 संध्या 55 संध्या 56 संध्या 57 संध्या 58 संध्या 59 संध्या 60 संध्या 61 संध्या 62 संध्या 63 संध्या 64 संध्या 65 संध्या 66 संध्या 67 संध्या 68 संध्या 69 संध्या 70 संध्या 71 संध्या 72 संध्या 73 संध्या 74 संध्या 75 संध्या 76 संध्या 77 संध्या 78 संध्या 79 संध्या 80 संध्या 81 संध्या 82 संध्या 83 संध्या 84 संध्या 85 संध्या 86 संध्या 87 संध्या 88 संध्या 89 संध्या 90 संध्या 91 संध्या 92 संध्या 93 संध्या 94 संध्या 95 संध्या 96 संध्या 97 संध्या 98 संध्या 99 संध्या 100 संध्या 101 संध्या 102 संध्या 103 संध्या 104 संध्या 105 संध्या 106 संध्या 107 संध्या 108 संध्या 109 संध्या 110 संध्या 111 संध्या 112 संध्या 113 संध्या 114 संध्या 115 संध्या 116 संध्या 117 संध्या 118 संध्या 119 संध्या 120 संध्या 121 संध्या 122 संध्या 123 संध्या 124 संध्या 125 संध्या 126 संध्या 127 संध्या 128 संध्या 129 संध्या 130 संध्या 131 संध्या 132 संध्या 133 संध्या 134 संध्या 135 संध्या 136 संध्या 137 संध्या 138 संध्या 139 संध्या 140 संध्या 141 संध्या 142 संध्या 143 संध्या 144 संध्या 145 संध्या 146 संध्या 147 संध्या 148 संध्या 149 संध्या 150 संध्या 151 संध्या 152 संध्या 153 संध्या 154 संध्या 155 संध्या 156 संध्या 157 संध्या 158 संध्या 159 संध्या 160 संध्या 161 संध्या 162 संध्या 163 संध्या 164 संध्या 165 संध्या 166 संध्या 167 संध्या 168 संध्या 169 संध्या 170 संध्या 171 संध्या 172 संध्या 173 संध्या 174 संध्या 175 संध्या 176 संध्या 177 संध्या 178 संध्या 179 संध्या 180