संध्या 103
स्वामीजींनीं भाषण सुरू केलें. पावसांत बसून लोक ऐकत होते. परंतु स्वामींना करुणा आली. ते म्हणाले, “छत्र्या उघडा.” आणि हजारों छत्र्या उघडण्यांत आल्या. भांडवलशाहीचा निषेध करणारीं जणूं हजारों काळीं निशाणें !
रात्रीं विश्वास, कल्याण, संध्या, बाळ सारीं घरीं आलीं. त्यांचे कपडे भिजले होते. आणि घरीं भाईजी काय करीत होते ? ते चुलीजवळ बसून स्वयंपाक करीत होते.
“हें काय भाईजी ?” संध्येनें विचारलें.
“माझा वेळ जाईना, म्हणून करमणूक सुरू केली. तुम्ही इतक्या लौकर याल असं वाटलं नाहीं.”
“पावसांत किती वेळ सभा चालणार ? परंतु आजचं दृश्य पाहून तुमचं कविहृदय नाचलं असतं.”
“पावसांत कविहृदय देवाजवळ रडण्यासाठीं.”
“तें शेतक-यांना नि कामगारांनाहि पेटवील. त्यांच्यांत वणवा पेटवील.” रागानें नि प्रेमानें विश्वास म्हणाला.
“विश्वास, ते ओले कपडे आधीं काढ. तो माझा शर्ट घाल. तुला होईल.”
“देवासाठीं रडणा-याचा शर्ट मला नको.”
भाईजींना वाईट वाटलें. त्यांची चर्या गोरीमोरी झाली.
“बरं, घालतों तुमचा शर्ट. कुठं आहे ?” विश्वास विरमून म्हणाला.
“तो तिथं आहे.”
सारी मंडळी वर्तुळाकार बसून जेवण करूं लागली.
“छान झाली आहें भाजी.” संध्या म्हणाली.
“म्हणजे रोज भाईजींनींच स्वयंपाक करावा अशी तुझी सूचना कीं काय ?” कल्याणनें हंसून विचारलें.
“इथं आहे तों खरंच करीत जाईन. तेवढा तरी उपयोग. माझं जीवन थोडं कारणीं लागेल. संध्ये, तूं सभा-मिरवणुकांना जात
जा. तूं क्रान्तिकारकाची पत्नी आहेस.”
“आणि तुम्ही क्रान्तिकारकांचे मित्र होत आहांत.”
“विश्वास, माझा पिंड आतां बनला. माझी मनोबुध्दि ठरीव सांच्याची जणूं झाली. माझ्या जीवनावरचे संस्कार आतां बदलणं कठिण आहे. माझं मडकं पक्कं झालं.”
“नाहीं भाईजी; तुम्ही लहान मुलांसारखे आहांत. क्षणांत रडतां, क्षणांत हंसतां; क्षणांत रागावतां, क्षणांत लोभावतां. तुम्हीच वाढाल. क्षणाक्षणाला वाढाल. झपाटयानं वाढाल. तुम्ही जून नाहीं झालांत. तुम्ही कोंवळे आहांत. आमच्याहूनहि तुम्ही पुढं जाल. खरंच ! “विश्वास भक्तिप्रेमानें म्हणाला.
पाऊस पडत असतांहि ती जी विराट् सभा झाली, तिचा मालकांवर फार परिणाम झाला. कामगारांत अभेद्य एकजूट आहे असें त्यांना वाटलें. तडजोड करावी असें त्यांना वाटत होतें. युनियनशीं बोलणीं सुरू झालीं. एका मोठया पुढा-याला मध्यस्थी करण्यास सांगण्यांत आलें. परंतु कामगार-पुढा-यांत द्वेष-मत्सर होते. त्या पुढा-यांची रात्रीं एक गुप्त सभा झाली. त्यांच्यांत दोन गट होते. आयत्या वेळीं कांहीं झालें तरी तडजोड करायची नाहीं असा बहुमतानें निर्णय घेण्यांत आला. कारण ज्या कार्यकर्त्यानें तडजोड सुचविली होती, त्याचें महत्त्व वाढूं नये असें दुस-यांना वाटत होतें. आपसांतील स्पर्धा नि कामगारांचें वाटोळें !