संध्या 168
“माझी कुठली ही भविष्यवाणी ? ही भविष्यवाणी त्या मुलांचीच. “भविष्य राज्य तुमारा मानो । ऐ मजदूरो और किसानो” हा त्या मुलांचा मंत्र. माझा बाळ मला हे चरण शिकवी. म्हणायचा “आई, जप करायचाच असेल, तर रामनामाचा नको करूंस. किसान-कामगारांनो, तुमचं राज्य होऊं दे. तुमची क्रांति यशस्वी होऊं दे, असा जप कर.” ती माता श्रध्देनें म्हणाली.
“आई, तुम्ही आमच्याजवळच राहा ना !” संध्या म्हणाली.
“तसं कसं राहायचं, संध्ये ? तुम्हांला कांहीं लागलं सवरलं, तर मागत जा हो. उपाशी नका राहात जाऊं. हे दहा रुपये आणले आहेत ते ठेवा. उत्साहानं राहा. संध्ये, तूं आजारातूंन, बाळंतपणांतून उठलेली. जप हो. पुन्हां नाहीं तर आजारी पडायचीस.” असें सांगून आश्वासून बाळची आई गेली.
हरणीनें आतां कॉलेजमध्यें नांव घातलें. ती एक शिकवणीहि करी. तिची आई तिला मदत करी. विश्वासच्या वडिलांचीहि थोडी मदत होई. आणि संध्या काय करी ? खाटेवर पडल्या पडल्या कल्याणचीं जुनीं पत्रें काढून तीं वाची. तो तिचा मेवा होता. अवीट मेवा.
परंतु हरणीचें मन हळूहळू अभ्यासांत रमेनासें झालें. देशांत सर्वत्र धरपकडी होत होत्या. एकूण एक भाईलोक उचलले गेले. लहान लहान मुलेंहि, तीं समाजवादी असतील, क्रान्तिकारक असतील, अशा संशयावरून तुरुंगांच्या आंत नेऊन ठेवण्यांत आलीं. तेथें आतां क्रान्तीच्या शिक्षणाचे वर्ग सुरू झाले. तेथें अर्थशास्त्रावर, विरोध-विकासवादावर, स्टेट म्हणजे काय, यावर व्याख्यानें होऊं लागलीं. भाई लोकांचें काम ते जातील तेथें सुरुच आहे. ते जातील तेथें त्यांचा प्रचार आहेच.
परंतु संध्या फिरून आजारी पडली. तिला एकाएकीं खूपच ताप आला. आणि दोन दिवस झाले तरी ताप निघेना. डॉक्टर म्हणाला, “हा दोषी ताप आहे.” संध्या त्या तापांत पडून राही. हरणी जवळ असे. तिला शिकवणीला जातां येत नसे. परंतु ज्या मुलीला ती शिकवी, ती मुलगी म्हणाली.
“मी तुमच्या घरीं येत जाईन. तिथंच मला शिकवीत जा.”
“असं करशील तर किती छान होईल !”
ती मुलगी हरणीकडे येई. संध्येजवळ बसून हरणी तिला शिकवी. मध्येंच संध्येच्या तोंडांत पाणी घाली. अशी शुश्रूषा चालली होती.
एके दिवशीं संध्येनें विचारलें, “हरणे, भाईजींना अटक झाल्याचं कुठं वाचलंस का ग ?”
“नाहीं वाचलं. ते अजून बाहेरच असावेत.”
“त्यांना लिहिशील पत्र ? संध्येला एकदां भेटून जा, असं त्यांना लिही. विश्वास व कल्याण तर अडकून पडले आहेत. भाईजी
मोकळे असले तर जातील भेटून. पुन्हां थोडेच भेटणार आहेत ? मी कांहीं आतां वांचणार नाहीं, हरणे.”
“संध्ये, असं काय बोलतेस ? तूं बरी होशील. तुझ्या आईला लिहूं का पत्र ? इकडे तिला बोलावूं ?”
“आधीं भाईजींना बोलाव.”
“त्यांचा पत्ता काय ? ते कुठं फिरत असतील, देव जाणे !”
“त्यांच्या नेहमींच्या पत्त्यावर टाक पत्र. त्यांना मिळेल अशी आपण आशा करूं.”
हरणीनें भाईजींना पत्र टाकले. संध्या आतां फार बोलत नसे. परंतु एके दिवशीं राजबंदीचा अन्नसत्याग्रह म्हणून मोठया अक्षरांत वर्तमानपत्रांत बातमी आली. हरणी घाबरली. परंतु संध्येला तिनें ती बातमी कळविली नाहीं. पण संध्येला ती वार्ता शेवटीं कळलीच.