संध्या 158
विश्वास व हरणी हरणीच्या आईकडे जाण्यास निघालीं. त्यांच्या गळयांत अजून ते फुलांचे घवघवीत हार होते. अक्षता अद्याप माथ्यावर होत्या. एक प्रकारचा पूर्णतेचा आनंद उभयतांच्या चेह-यावर होता. दोघें टांग्यांत बसलीं. निघालीं.
“हरणे, तुझी आई काय म्हणेल ?”
“आपणां दोघांना आशीर्वाद देईल. आपण जाऊं व एकदम तिच्या पायां पडूं. पाय धरल्यावरहि का आई रागावेल ? तुझे वडिलहि विश्वास, प्रेमळ झाले. मग माझी आई नाहीं का होणार ? आपण श्रध्देनं जाऊं, विश्वासानं जाऊं.” आणि हरणीच्या आईचें घर जवळ जवळ येत चाललें, तसतसें दोघांचें मन खालींवर होऊं लागलें. छातीची जरा धडधड सुरू झाली. आणि टांगा थांबला. दोघें खालीं उतरलीं. दार उघडेंच होतें. फार रात्र झाली नव्हती. नवाचा सुमार होता. हरणीची आई बसलेली होती. अंथरुणावर लहान भावंडें झोंपलेलीं होतीं. दादा घरांत नव्हता.
“आई, विश्वास व मी तुझा आशीर्वाद घ्यायला आलों आहोंत. आम्हीं एकमेकांना दोन तासांपूर्वी माळ घातली. विश्वासच्या वडिलांनीं नीट विधिपूर्वक लग्न लावलं. आम्ही तुझ्या पायां पडतों. आई, आशीर्वाद दे.” असें म्हणून हरणी आईच्या पांया पडली. विश्वासहि पडला. हरणीची आई चकित झाली; स्तंभित झाली. तिला काय बोलावें कळेना. दोघें आईजवळ बसलीं.
“आई !”
“हरणे, मला कळवलंसहि नाहीं.”
“मामांची व दादाची भीति वाटे; म्हणून कळवलं नाहीं. परंतु तूं माझं हृदय जाणत होतीस. आई, मी सुखांत असावं असं तुला नाहीं वाटत ? बाबा काय म्हणत तें आठव. विश्वास दूध घालायला आला म्हणजे काय बरं ते म्हणत ? त्या बाबांच्या शब्दांनीं कधींच आमचं लग्न लावलं होतं. नाहीं का आई ? दे, तुझाहि आशीर्वाद आम्हांला दे. विश्वासच्या वडिलांनीं दिला, तूंहि दे.” असें म्हणून हरणीनें केविलवाण्या दृष्टीनें आईकडे पाहिलें.
“हरणे, विश्वास, माझा आशीर्वाद आहे हो. सुखानं राहा. तुमचा संसार सुखाचा होवो.” असें म्हणून मातेनें हरणीच्या डोक्यावरून, विश्वासच्या पाठीवरून हात फिरविला. ती उठली. त्या दोघांना तिनें दोन पेढे दिले. घरांत होतेच परीक्षेचे.
“आई, आम्ही जातों.”
“ये हो, हरणे.”