संध्या 29
“बाबा, मी जाऊं ?”
“जा.”
संध्या निघून गेली. ती आजीजवळ आली. आज चुलते नारायणराव घरीं नव्हते. त्यामुळें आजी चुलीजवळ नव्हती. भिंतीजवळ माळ घेऊन ती रामनाम जपत होती. संध्याहि रामराम म्हणूं लागली. मध्येंच तिनें आजीकडे पाहिलें तों आजीच्या डोळयांतून पाणी घळघळत होतें.
“आजी, रडतेसशी ?”
“तूं मोठी झालीस म्हणजे समजेल.”
थोडया वेळाने आजीने संध्येला एकदम जवळ घेतलें. तिच्या डोक्यावरून तिनें हात फिरविला. तिला कुरवाळले.
“संध्ये, नीट जपून वागत जा. देवाला विसरूं नकोस. तुझं पुढं लग्न होईल. सासरीं सांभाळ. उल्लू नको होऊं. उतूं नको, मातूं नको. सर्वांशीं गोड बोलावं, हंसावं, खेळावं. होईल ती दुस-याला मदत करावी. रागावत नको जाऊं, रुसूंहि नको फार. एखाद वेळ रुसणं फुगणं गोड असतं. कोणतीहि स्थिति येवो. संपत्ति वा विपत्ति. समाधानानं राहा. कसेहि दिवस येवोत. आनंदी राहा. कामाला कंटाळूं नये. काम म्हणजे राम. चांगली राहा.”
“आजी, तूं आज असं कां सांगतेस, असं कां बोलतेस ? ही कसली निरवानिरव ? तूं कां कुठं जाणार आहेस ?”
“बोलावणं आलं तर तयारी असावी.”
“कुठलं बोलावणं ?”
“देवपूरचं.”
“मी येऊं तुझ्याबरोबर ?”
“इतक्यांत नको. तुझी कशाला घाई ?”
“कुठं आहे हे देवपूर ? कोण आहे तिकडे आपलं ?”
“देवपूर तिकडे वर आहे.”
“वर म्हणजे कुठं ? पुण्याच्या बाजूला ?”
“किती बोलशील व विचारशील ?”
“आजी, मी येईन हो. मला इथं कंटाळा आला आहे. कुठं तरी दूर पुण्याकडे जावं असं वाटतं. आजी, मी अजून आगगाडीसुध्दां पाहिली नाहीं. आगबोट पाहिली नाहीं. तूं देवपूरला. कशांतून जाणार ?”
“विमानांतून.”
“तूं थट्टाच करतेस मी बोलतच नाहीं मुळीं. तुझ्या मांडीवर मी डोकं ठेवून निजूं ?”
“नीज हो बाळ.”
संध्या आजीच्या मांडीवर डोकें ठेवून झोपली. दुपारची वेळ झाली. जेवायची तयारी होऊं लागली. संध्या उठली व आजीला म्हणाली, “आजी, चल.”
“नको, आज जेवण नको. आज रामनामाचं भोजन करीन.”
“त्यानं का पोट भरतं ? चल ना ग ?
“नको बेटा. तूं जा.”